खरं खरं सांगा, पंचवीस वर्षात “सूर्यवंशम” कितीदा पाह्यला?
काही काही पिक्चर कसला तरी भन्नाट विक्रमासाठी ओळखले जातात आणि ते महाविक्रम कधी मोडले जातील असं वाटतही नाही…. “सूर्यवंशम” (suryavanshi) असाच रेकाॅर्ड ब्रेक करणारा पिक्चर. हाऊसफुल्ल गर्दीचा रेकाॅर्ड या चित्रपटाने करणे शक्यच नव्हते. कारण मुंबईत २१ मे १९९९ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट पडद्यावर आला तोच फ्लाॅप झाला. ( या विक्रमाला चक्क पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून हा खटाटोप) मला आठवतय, मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना मेन थिएटर लिबर्टीचे पहिल्याच खेळाचे तिकीट दिले असता भर उन्हात घामाघूम होत लिबर्टीवर पोहचलो तर करंट तिकीट विक्रीची खिडकी चक्क उघडी होती ( त्या काळात कोणत्याही चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगला पहिल्याच आठवड्यात बुकिंग नसेल तर मनात येई, पिक्चरचं काही खरं दिसत नाही.. पब्लिकला हे अगोदरच कसे समजते याला उत्तर नाही. हेच कोडे महत्वाचे आहे.)
हळूहळू हा पहिला खेळ हाऊसफुल्ल झाला. अमिताभ बच्चनचा हा ‘दुसरा पडता काळ’ होता ( पहिला पडता काळ गंगा जमुना सरस्वती, तुफान, अजूबा, इंद्रजित, तुफान, जादुगर फ्लाॅप झाले तो होता) ‘खुदा गवाह‘ (१९९२) नंतर अमिताभ काही काळ चित्रपटापासून दूर होता ( या काळात त्याने दाढी वाढवली व त्यावरुन त्याला कोणी ‘शांतीदूत’ ही म्हटलं). पुन्हा कामाला सुरुवात केल्यावर ‘मेजरसाब’ वगळता मृत्युदाता, कोहराम, लाल बादशाह, बडे मिया छोटे मिया या चित्रपटात त्याने काम का करावे असाच प्रश्न होता. ‘सूर्यवंशम’ने तर सगळेच विक्रम मोडले.
दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाच्या रिमेकमध्ये त्याने भूमिका साकारणे नवीन नव्हतेच. टी. रामाराव दिग्दर्शित ‘इन्कलाब‘ (१९८४), के. भाग्यराज दिग्दर्शित ‘आखरी रास्ता‘ (१९८६) अशा रिमेकमध्ये त्याने काम केले होतेच. ‘सूर्यवंशम‘ (suryavanshi) हा मुळात तमिळ चित्रपट. त्याची तेलगू भाषेत आणि मग कन्नड भाषेत रिमेक झाली. त्या चित्रपटांना उत्तम यश लाभल्याने त्याची हिंदीत रिमेक व्हायला हवी होतीच. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे आहे. तेच पुन्हा पुन्हा वापरले जाते. अमिताभला ही खणखणीत कमबॅक करायचा होता. चित्रपटाचा जोरदार शोरदार मुहूर्त चेन्नईत झाला. नागार्जुनने मुहूर्त क्लॅप दिला. व्यंकटेश, निर्माता व दिग्दर्शक एस. रामनाथन ( बाॅम्बे टू गोवा, महान वगैरे) हजर होते. शूटिंग मात्र गुजरातमधील बनारसकोठी या हवेलीत ( ही ठाकूर भानूप्रताप सिंगची हवेली दाखवलीय), राजस्थानातील भरतपुर रेल्वे स्टेशन आणि परिसरात झाले.
मूळ चित्रपटातील साऊथ इंडियन रंग काढण्याचा हा मोठाच आटापिटा होता. शूटिंग स्पाॅटमध्ये वेगळेपण आणले. दिग्दर्शक इ. व्ही. व्ही. सूर्यनारायण यांनी ही चतुराई केली तरी ‘हा चित्रपट पोस्टरपासूनच दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटासारखा’ दिसत होता. पोस्टर जास्त बोलते. अमिताभ पिता व पुत्र अशा दुहेरी भूमिकेत. हीरा ठाकूर हे मुलाचे नाव. अभिषेक बच्चन पुत्राची भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार अशी हवा आली आणि गेली.
ठाकूर भानूप्रताप सिंगच्या पत्नीच्या भूमिकेत जयासुधा तर हीरा ठाकूरच्या पत्नीच्या भूमिकेत त्या काळातील दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटातील टाॅपची अभिनेत्री सौंदर्या ( सुरुवातीस पूजा बत्रा ही भूमिका साकारणार होती) विशेष उल्लेखनीय गोष्ट, रेखाने जयासुधा व सौंदर्या या दोघींचेही हिंदीत डबिंग केले. रेखा की आवाज अपनी एक पहेचान है. अमिताभ व रेखा जोडीचा असाही एक चित्रपट म्हणायचा. अमिताभ, कादर खान व अनुपम खेर यांनी ‘सूर्यवंशम’मध्ये रंग भरला. यासह चित्रपटात शिवाजी साटम, बिंदू, मुकेश रिशी, इम्रान खक्कर, राजेश खक्कर, नीलिमा आझमी, इशान खक्कर, बालकलाकार आनंद वर्धन इत्यादी. समीरच्या गीतांना अन्नू मलिकचे संगीत. दोन गाणी लोकप्रिय झाली. चोरी से चोरी से, कोरे कोरे सपने ही ती गाणी. (suryavanshi)
=========
हे देखील वाचा : …. ती हळहळ वाटत नाही का?
=========
अमिताभ बच्चनची पिता व पुत्र अशी दुहेरी भूमिका नरेंद्र बेदी दिग्दर्शित ‘अदालत‘, एस. रामनाथन दिग्दर्शित ‘महान‘ ( यात तर पिता व दोन पुत्र अशी तिहेरी भूमिका), के. भाग्यराज दिग्दर्शित ‘आखरी रास्ता‘ वगैरत आपण पाहिली. मोठ्या पडद्यावर फ्लाॅप ठरलेला हा चित्रपट छोट्या पडद्यावर इतक्यांदा दाखवला गेलाय की चॅनेल सर्फिंग करताना सोनी सेटमॅक्स उपग्रह वाहिनीवर हमखास ‘सूर्यवंशम’ (suryavanshi) दिसणारच. कोणीतरी कंडी पिकवली की हा चित्रपट छोट्या पडद्यावर दाखवायचा शंभर वर्षांचा करार आहे म्हणे. काहींनी तर ‘पुरे झाला सूर्यवंशम म्हणत पत्र’ लिहिली. कोणी विनोद केले. कोणी मिम्स केले. डायलॉगवर मिमिक्री केली. सोशल मीडियावर अनेकांनी काय काय लिहिलंय. कदाचित, ‘सूर्यवंशम’चा हाही एक मोठाच विक्रम असेलही कदाचित. काहींचे डायलॉग पाठ झाले तर काहींची दृश्य. पुन्हा पुन्हा चित्रपट पाहिल्याशिवाय हे होईल का?
अमिताभचे पुन्हा पुन्हा पहावेत असे टाॅप फाईव्ह चित्रपट म्हणजे, प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर‘ व ‘शराबी‘, यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार‘, मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘अमर अकबर ॲन्थनी‘ आणि आर. बल्की दिग्दर्शित ‘पा‘ हे आहेत ही माझी निवड. त्यात ‘सूर्यवंशम‘चा (suryavanshi) विक्रम काही वेगळाच. पिक्चरला पंचवीस वर्ष पूर्ण झाली हो.