‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
Movie Review Jersey – एका अहंमन्य, अयशस्वी ते उदयी क्रिकेटरचा भावनात्मक प्रवास!!
सामान्य क्रिकेटरच्या आयुष्यातील संघर्ष अनेक चित्रपटातून दाखवला गेला आहे, पण २०१९ चा तेलगू चित्रपट ‘जर्सी’ मधील हा ‘failed cricketer’, विफल पती आणि एका कंगाल पित्याची कहाणी बहुतांश स्पोर्ट्स ड्रामाच्या तुलनेत एक उत्कृष्ट कलाकृती मनावर छाप पाडून जाते. (Movie Review Jersey)
“And that’s a Six! What a wonderful shot by Arjun to grab the 1996 Ranji Trophy against Mumbai at the Wankhede Stadium…..”
१९८६ च्या दशकातील हैदराबादचा रणजीस्टार ‘जी. अर्जुन’ (नानी) सध्या उदास आणि निराशात्मक आयुष्य जगात असतो. त्याची बायको ‘सारा’ (श्रद्धा श्रीनाथ) एका हॉटेल मध्ये रिसेप्शनिस्ट असून तिने आपल्या वडिलांच्या मर्जीविरुद्ध अर्जुनशी प्रेमविवाह केलेला असतो आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा ‘नानी’ (मास्टर रोनित) त्याच्या पित्यासारखाच क्रिकेटर होण्याचे स्वप्न बाळगून असतो.
अर्जुन वयाच्या २६ व्या वर्षीच क्रिकेट विश्वातून बाहेर पडतो आणि त्याच्या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयाने सारा नाराज होते. त्याने FCI ची नोकरी सोडल्यावर त्यांचे नाते अधिक तकलादू होते आणि त्या दोघांमधील दुरावा वाढू लागतो.
दुसरीकडे त्याच्या मुलाची म्हणजेच नानीची वडिलांचे क्रिकेट करिअर पुन्हा सुरु करण्यासाठी धडपड चालू असते. आपल्या वडिलांनी वयाच्या ३६ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री घेऊन भारतासाठी खेळावं यासाठी तो शक्य ते सर्व प्रयत्न करत असतो. तर कोच, मूर्ती (सत्यराज) अनाथ असलेल्याला अर्जुनची १० वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुनरावृत्ती होण्यासाठी अहोरात्र झटत असतात. (Movie Review Jersey)
नानी आपल्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अर्जुनकडे इंडियन टीमची जर्सी मागतो, हीच जर्सी मिळविण्यासाठीचा अर्जुनचा संघर्ष आणि त्याची आयुष्याची झुंज देण्याची ताकद दिग्दर्शक गौतम तिन्ननुरीने खूप प्रेरणादायी आणि सुरेखरित्या मांडली आहे.
एका ३६ वर्षाच्या गेम वापसी करणाऱ्या विलंबित क्रिकेटरबद्दलच्या अनपेक्षित, अपमानकारक आणि निराशाजनक घडणाऱ्या घटना ओढून ताणून घडवून आणल्यासारख्या न वाटता नैसर्गिक वाटतात आणि सहजरित्या क्लिक करून जातात. (Movie Review Jersey)
अर्जुन २६ व्या वर्षीच क्रिकेट का सोडतो? काय कारण असेल? ह्या प्रश्नांचे उत्तर चित्रपटाच्या शेवटी अत्यंत गंभीररीत्या मांडले आहे. मुळात हा चित्रपट नुसताच प्रेरणात्मक, मनोरंजनात्मक आणि संघर्षमय कथानक नसून एका गंभीर विषयाला स्पर्श करून जातो.
जर्सी अतिशय उत्कृष्टरित्या मांडलेला विषय आहे आणि यातील सर्व कलाकारांनी सुरेख काम केले असून, प्रत्येक दृश्यांमधील भावनांचा तोल अतिशय सूक्ष्मरीत्या सांभाळलेला आहे. यातील क्रिकेटच्या स्पर्धा वास्तववादी वाटतात, सिनेमा मंद गतीने पुढे सरकतो तरी क्षणभरही डॉक्युमेंटरी बघत असल्याचा मुळीच अनुभव येत नाही.
अभिनयाच्या कारकिर्दीतील नानीचा हा सगळयात सुपरस्टार परफॉर्मन्स आहे. अर्जुनची भूमिका नानीने अव्वलरित्या पार पाडली आहे. त्याच्या भावातील भिन्नता, डायलॉग डिलिव्हरी आणि चेहऱ्याचे हाव भाव त्याला अप्रतिम जमले आहेत. (Movie Review Jersey)
एका स्टयलिश, अहंमन्य क्रिकेटरची सुरुवात, त्याची विफलता, कंगालपणा, मुलाबरोबर असलेले प्रेमळ नाते आणि बायकोबरोबरचा घटस्फोटाचा वाद आणि त्यामध्ये गुरफुटतून गेल्यापासून ते त्याच्या क्रिकेट पुनरावृत्तीचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायक आहे. ‘नानी’ ने ह्या चित्रपटासाठी घेतलेले कष्ट, त्याचा क्रिकेटचा सराव हा त्याच्या चित्रपटातील क्रिकेट शॉट्स आणि देहबोलीमधून दिसून येतो. (Movie Review Jersey)
श्रद्धा श्रीनाथने जर्सीद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून हा तिचा सुपर परफॉर्मन्स म्हणू शकतो. नानी बरोबरची तिची केमिस्ट्री फारच उत्कृष्ट आहे. ज्येष्ठ अभिनेते सत्यराज यांच्या अभिनयाला तोड नाही आणि कोच मूर्तींचा ‘स्क्रीन प्रेझेन्स’ खूप महत्वपूर्वक ठरतो.
=====
हे देखील वाचा: काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी
=====
दिग्दर्शक गौतम तिन्ननुरीने चित्रपटाचा लगाम कुठेही भरकटवला नाहीये आणि त्याचं कथानक, स्क्रीनप्ले प्रेक्षकाला खिळवून ठेवतं. गौतमने सिनेमातील सीन्स संतुलित ठेवले असून कुठेही त्यांची रसमिसळ झालेली दिसून येत नाही. चित्रपटातील ‘खैरातबाद’ रेल्वे स्टेशनवरील अर्जुनचा तो सीन अप्रतिम तर आहेच, पण सामान्य माणसाच्या आयुष्यातील दैनंदिन संघर्षावर मिळवलेल्या विजयची ती पोच पावती आहे.
नवीन नुलीचे कलात्मक संपादन ते सानू वर्गीसचे छायांकन आणि अनिरुद्ध रविचंदरचे संगीत जर्सीला अजून मजबूत बनवतं. फक्त क्रिकेट स्पर्धांची वेळेची लांबी थोडी कमी करता आली असती, पण ती शेवटी तांत्रिक बाब आहे आणि पूर्णतः दिग्दर्शकाचा निर्णय आहे.
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
क्रिकेटचे डाय हार्ड फॅन असाल, तर हा चित्रपट परविवारासोबत पाहायला हरकत नाही कारण एखाद्या स्पोर्ट्स ड्रामा कथा इतक्या सुरेख आणि सहजरित्या मांडायला आजपर्यंत खूप कमी दिग्दर्शकांना जमलं आहे.
– पुष्कराज शिरगुरकर
चित्रपट: जर्सी (तेलगू), एप्रिल २०१९
स्टार कास्ट: नानी, श्रद्धा श्रीनाथ, सत्यराज, प्रवीण संपत, मास्टर रोनित कामरा आणि इतर
पटकथा, लेखक आणि दिग्दर्शक: गौतम तिन्ननुरी
संगीत: अनिरुद्ध रविचंदर
संपादक: नवीन नुली
छायांकन: सानू वर्गीस
निर्माते: सूर्यदेवरा नागा वामसी