तेरी प्यारी प्यारी सूरतको किसीकी नजर ना लगे
’संगम’च्या दणदणीत यशानंतर राजकपूर त्याच्या टिमला युरोपच्या दौर्यावर घेवून गेला होता.एकदा एका पॅरीसच्या नाईट क्लब मध्ये ते डांस पहायला गेले.तिथली मदमस्त नृत्यांगना चमकणार्या टिकल्या टिकल्यांचे वस्त्र परीधान करून आली होती. तिच्या नृत्यात एक नशा होती,नजरेत मादकता होती.एकेक करून ती अंगावरील वस्त्राचा त्याग करीत ’कॅबरे’करीत होती.दोन चारदा ती नाचत नाचत यांच्या जवळून गेली.वातावरण धुंद नशीलं होतं.
अशा वेळी राज कपूरने हसरत जयपुरी कडे पाहत त्याची तंद्री भंग करीत विचारले ” काय कवी राज काही सुचतय कां?’ तिथल्या तिथे हसरत ने पेन काढले व त्या मदहोशी माहोल व डान्सर च्या अदा बघत लिहून काढले ’बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तो चैन आ जाये…’ पुढे १९६९ साली आलेल्या ’प्रिन्स’ सिनेमात हे गाणं घेतलं.हसरतची प्रतिभा हि अशी.
१९६१ साली टी प्रकाशराव एक सिनेमा बनवित होते.तो एका गाजलेल्या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक असल्याने त्यातील गाण्याच्या जागा, सिच्युएशन ठरलेल्या होत्या. राजेंद्र कुमार नायक होता तर नायिका बी सरोजा देवी होती.तिच्या सौंदर्याची (?) तारीफ करणारं गाणं हसरत ला लिहावयाच होतं.हिरोईन कडे बघून हसरतला काही खास ओळी सुचेनात.खरं तर असली गाणी लिहायला त्याला अडचण यायला नको होती पण त्याला काही शब्द सुचेनात.
त्याच वेळी हसरत यांची बायको डिलिव्हरी साठी दवाखान्यात अॅडमीट झाली होती. त्यामुळे कवीराजांच मनही थार्यावर नव्हतं. या अशा आणीबाणीच्या वेळी लिहिणार कसं? आणि चमत्कार झाला.हॉस्पिटल मधून मुलगा झाल्याचा फोन आला. बाप झाल्याचा आनंदाने बेभान होवून हसरत तिकडे गेले.आपल्या गोर्यापान,राजबिंड्या बाळाला बघून त्यांनी मनातल्या मनात दोन ओळी लिहून टाकल्या.
’तेरी प्यारी प्यारी सूरतको किसीकी नजर ना लगे चष्मेबद्दूर’ अरेच्या हेच तर आपल्याला लिहायच होतं असं म्हणत त्यांनी ते गाणं ही पूर्ण करून टाकलं.बी सरोजादेवीच्या सौंदर्याची तारीफ करणारं हे गीत वस्तुत: त्यांच्या मुलाकडे अख्तर कडे बघून हे गाणं लिहिलं होतं.रफीने गायलेलं हे गाणं इतकं गाजलं की १९६२ च्या बिनाका गीतमालचं ते टॉपच पहिल्या नंबरचं गाणं होतं