दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
The Fame Game Review: अनामिकाची रहस्यमय ‘मिसिंग’ केस
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने वेबसिरिजच्या दुनियेत प्रवेश केला आहे. नुकतीच तिची ‘द फेम गेम’ ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. वेबसिरीज प्रदर्शित होण्यापूर्वी ‘द फेम गेम’चे निर्माते-लेखक-दिग्दर्शक श्री राव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, त्यांनी या शोची कथा केवळ माधुरीला डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे. (The Fame Game Review)
या वेबसिरीजमध्ये माधुरीने ‘अनामिका आनंद’ हे पात्र साकारले आहे. खूप मोठ्या काळानंतर माधुरी एका सशक्त भूमिकेत दिसली आहे. ही एक सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज असून एकूण ४० ते ५० मिनिटांच्या सहा भागांमध्ये विभागली आहे.
बॉलिवूडची सुपरस्टार अनामिक (माधुरी दीक्षित) तिचा पती निखिल (संजय कपूर), मुलगी अमू (मुस्कान जाफेरी), मुलगा अविनाश (लक्षवीर सिंग सरन) आणि तिची आई (सुहासिनी मुळे) यांच्यासह सुखाने (?) आयुष्य जगत असते. परंतु, अचानकपणे अनामिका गायब होते आणि कथा सुरु होते. (The Fame Game Review)
अचानक गायब झालेल्या अनामिकाची केस साहजिकच पोलिसांसाठी ‘हाय प्रोफाइल’ केस असते. अनामिकाला शोधण्यासाठी पोलीस जेव्हा तिच्या घरी जातात तेव्हा नातेसंबंधांमधील गुंतागुंत, सेलिब्रेटींच्या रील आणि रिअल आयुष्यामधला फरक अशा अनेक गोष्टी समोर येतात.
बॉलिवूडच्या सुपरस्टारचं असं अचानक गायब होणं ही मीडियासाठी ब्रेकिंग न्यूज असते आणि मीडिया ती उचलून धरते. ब्रेकिंग न्यूज, क्लिकबीट आर्टिकल्स मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या मीडियाचा खरा चेहराही या सिरीजमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.
प्रत्येक भागात एकामागून एक विचित्र घटना घडत जातात. वेगवेगळे ‘ट्विस्ट अँड टर्न्स’ येतात. प्रत्येक वेळी आपण (प्रेक्षक) रहस्य शोधायचा प्रयत्न करतो, पण पुढच्याच भागात, “जाना था जापान, पहुँच गए चीन” अशी अवस्था झाल्याचं लक्षात येतं आणि आपण (प्रेक्षक) या सिरीजमध्ये गुंतत जातो. अखेर सीरिजच्या शेवटी जेव्हा रहस्य उलगडतं तेव्हा आपल्या लक्षात येतं, “असं काही असेल हा विचारच आपण केला नव्हता…”
या वेबसिरीजचे नाव आधी ‘फायनडींग अनामिका’ ठेवण्यात आलं होतं. परंतु, नंतर ते बदलून ‘द फेम गेम’ असं करण्यात आलं. कलाकारांच्या ‘रील आणि रिअल लाईफ’ मधली अस्पष्ट रेषा स्पष्ट करणाऱ्या या सीरिजला हे नाव अगदी साजेसं आहे. (The Fame Game Review)
सिरीजची पटकथा दोन भागात विभागली आहे. आधी वर्तमानकाळ आणि नंतर भूतकाळ. फ्लॅशबॅक मध्ये अनामिकाच्या यशाचा प्रवास प्रवास, तिची दुःख, तिच्या वेदना सारं काही दाखविण्यात आलं आहे. अनामिकाच्या भूमिकेमध्ये माधुरीने अगदी जीव ओतला आहे. फिल्मोग्राफीचा परिपूर्ण वापर केल्यामुळे सिरीज बघताना अनामिका ही माधुरी नाही, ही गोष्ट प्रेक्षकांच्या लक्षातही राहत नाही. संजय कपूर, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे यांच्या भूमिकाही अप्रतिम जमून आल्या आहेत.
अनामिकेच्या कुटुंबाव्यतिरिक्त या सिरीजमध्ये अजून एक महत्वाची व्यक्ती आहे, ती म्हणजे अनामिकाचा ‘चाहता’. अनामिकाचा ‘चाहता’ तिच्या मुलीच्या आयुष्यात येतो. तो कशासाठी येतो, त्याचा उद्देश काय या प्रश्नांची उत्तरं इथे सांगितली, तर सिरीज बघायला मजा येणार नाही. परंतु, सिरीज बघताना (आणि संपल्यावरही) ही व्यक्तिरेखा अनावश्यक असल्याचं वाटत राहतं. शिवाय अनामिकाच्या मुलीचं वागणंही न पटण्यासारखं. (The Fame Game Review)
दिग्दर्शक श्री राव’, बेजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी अनामिकाचं आयुष्य दाखवताना कुठेही तडजोड केलेली दिसत नाही. वेबसिरीजमध्ये नात्यांची गुंतागुंत, ट्विस्ट अँड टर्न्स यांच्या जोडीनेच प्रशस्त बंगला, व्हॅनिटी व्हॅन, लॅव्हिश कार, मीडिया कव्हरेज सर्व काही ठळकपणे दाखविण्यात आलं आहे. परंतु, ‘सबकुछ’ अनामिक दाखविण्याच्या आणि सीरिजला अधिकाधिक रहस्यमय बनविण्याच्या नादात काही प्रसंगांमधली गुंतागुंत पाहून प्रेक्षकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
थोडक्यात सांगायचं तर, तुम्ही माधुरी फॅन असाल, तर तिच्यासाठी ही वेबसिरीज नक्की बघा (अर्थात तुम्ही बघालच!). जरी माधुरी आवडत नसेल तरी एक छोटी आणि चांगली सस्पेन्स थ्रिलर सिरीज बघितल्याचं समाधान नक्की मिळेल.
जाता जाता महत्वाचं म्हणजे, वेबसिरीजच्या प्रचलित प्रथेनुसार शेवटच्या भागाच्या शेवटी दुसरा भाग येणार याची हिंट द्यायला दिग्दर्शक विसरले नाहीयेत. (The Fame Game Review)
वेबसिरीज: द फेम गेम (The Fame Game)
ओटीटी प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
दर्जा: चार स्टार