
जेव्हा बॉलीवूडवर भारी पडली Maherchi Sadi इतका पैसा कमावला की…
आजपासून ३५ वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटाने तब्बल १२ कोटी रुपये कमावले होते. हो… आज जिथे १०-१५ कोटी कमावण्यासाठी मराठी इंडस्ट्रीला थोडीफार धडपड करावी लागते, त्याच धर्तीवर या मराठी चित्रपटाने ३५ वर्षांपूर्वी इतक्या कोटींचा गल्ला जमवला होता, तो चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’… म्हणजे याच वर्षी हिंदी आणि साउथचे मोठमोठे चित्रपट आले होते पण आपली माहेरची साडी त्यांच्यावर भारीच पडली. अवघ्या तीन महिन्यांमध्येच ‘माहेरची साडी’ने कोटींच्या कोटीची उड्डाणे घेतली होती. १९ सप्टेंबर १९९१ ला रिलीज झालेला ‘माहेरची साडी’ हा त्या काळातला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. त्याच्या आधी हा रेकॉर्ड अशी ही बनवा बनवीच्या नावावर होता.
पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? की सुरुवातीला लक्ष्मीचा रोल भाग्यश्री पटवर्धनला ऑफर झाला होता, पण तिच्या बीजी शेड्युलमुळे तिने नकार दिला. त्यानंतर अलका कुबल यांना ही भूमिका मिळाली. त्यामुळे या चित्रपटात अलका कुबल, उषा नाडकर्णी , रमेश भाटकर , विजय चव्हाण आणि अजिंक्य देव यांसारखी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळाली. तसेच हा चित्रपट विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केला होता. अलका कुबल तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरातल्या फेव्हरेट झाल्या होत्या. ‘माहेरची साडी’ सर्वप्रथम इचलकरंजीत झळकला. नंतर महाराष्ट्रभर गाजला.

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांन या चित्रपटाला इतकंच प्रेम दिलं की काही अंध प्रेक्षकही या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. ते प्रेक्षक चित्रपट पाहायला यायचे आणि फक्त संवाद ऐकायचे, इतकी याची क्रेज होती. रिलीजनंतर केवळ तीन महिन्यांतच ‘माहेरची साडी’ने १२ कोटींपेक्षा पेक्षा जास्त कमाई केली. या कमाईमुळे तो १९९१ चा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आणि ही त्या काळातील मराठी चित्रपटासाठी अभूतपूर्व गोष्ट होती. यावेळी TOPवर होता साजन चित्रपट ज्याने १८ कोटी रुपये कमावले होते. पुण्याच्या प्रभात टॉकीजसारख्या थीएटरमध्ये तर तो सलग ७५ आठवडे हाऊसफुल्ल चालला आणि जवळपास दोन वर्ष थिएटरमध्ये टिकून राहिला.
================================
हे देखील वाचा : Alka Kubal : ‘माहेरची साडी’ चित्रपट आधी ‘या’ हिंदीतील अभिनेत्रीला झालेला ऑफर!
================================
या चित्रपटाचा रेकॉर्ड तब्बल १६ वर्षं कुणीही मोडू शकला नाही. याशिवाय, त्याकाळी गावखेड्यातून प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या चित्रपटासाठी शहरांमध्ये प्रवास केला. एसटी, टेम्पो, सायकल, स्कूटरने लोक थिएटरपर्यंत पोहोचत होते, हे त्या काळात फार दुर्मिळ होतं. खर तर ‘माहेरची साडी’ हा १९८८ साली आलेला राजस्थानी चित्रपट ‘बाई चली सासरिया’ याचा मराठी रिमेक होता. पुढे त्याच कथानकावर आधारित १९९४ साली जुही चावला आणि ऋषी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट ‘साजन का घर’ आला. पण तो काही चालला नाही. ‘माहेरची साडी’चं बजेट फक्त २५ लाख होतं, पण त्याने कमावले तब्बल १२ कोटी. चित्रपटाने फक्त प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर विक्रमी कमाई करून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. त्यामुळेच ‘माहेरची साडी’ केवळ एक चित्रपटाच नव्हता तर तो एक सांस्कृतिक phenomenon बनला होता.
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi