मल्टीप्लेक्स संस्कृती रुजू लागली आणि चित्रपटाच्या लांबीला अवाजवी महत्व येत गेले…
‘जोधा अकबर’ (२००८) रिलीज होऊन फार तर आठवडा होऊन गेला असता एका चित्रपटाच्या पार्टीत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर भेटला. गप्पांच्या ओघात मला म्हणाला, चित्रपट कसा आहे, यापेक्षा ‘जोधा अकबर’ ची लांबी खूप आहे, इतकी कशाला असे अनेक जण मला सांगताहेत. मला एक समजत नाही की, एकादी थीम तपशीलवार साकारायची असते. काही प्रसंग खोलवर खुलवायचे असतात हे ते का विचारात घेत नाहीत? आशुतोष गोवारीकरच्या या मताशी मी पूर्ण सहमत झालो आणि आजही आहेच….
मल्टीप्लेक्स संस्कृती रुजू लागली आणि चित्रपटाच्या लांबीला अवाजवी महत्व येत गेले. एका दिवसात अधिकाधिक शो व्हावेत असे जणू गणित सांभाळून अनेक चित्रपट १३० ते १४० मिनिटांचे झाले….
याउलट एकेकाळी चक्क एका चित्रपटाला चक्क दोन मध्यंतर असे घडले आहे. दिग्दर्शकांनी आपली थीम आणि पटकथा साकारण्यासाठी अजिबात ‘वेळेचे बंधन’ घालून घेतले नाही. (त्या काळात सेन्सॉर प्रमाणपत्रावर रिळे किती हे म्हटले जाई हे तुम्ही जुने चित्रपट पाहताना लक्षात येईल. कालांतराने त्या ऐवजी वेळ दिली जाऊ लागली. तात्पर्य, सिनेमा असादेखिल बदलला).
असे दोन मध्यंतरचे चित्रपट खरं तर मूळात तीन आणि नंतर मात्र एकच.
राज कपूर निर्मित, दिग्दर्शित, संकलित आणि अभिनित ‘संगम’ (रिलीज १८ जून १९६४) आणि ‘मेरा नाम जोकर’ (रिलीज १८ डिसेंबर १९७०) आणि सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (रिलीज ५ ऑगस्ट १९९४).
आणि यापैकी फक्त आणि फक्त ‘संगम’ फस्ट रनला रौप्यमहोत्सवी यशाच्या आठवड्यापर्यंत दोन मध्यंतरचा चित्रपट म्हणूनच रसिकांनी एन्जॉय केला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर अप्सरा होते. खरं तर मूळ लॅमिन्टन थिएटर पाडून त्या जागी उभे राहिलेल्या अप्सराचे ‘संगम’च्या राज कपूर ‘शोमनशीप स्टाईल’ प्रीमियरने भव्य उदघाटन झाले. त्या काळात अशा मोठ्या चित्रपटांच्या प्रीमियरच्या वेळी थिएटरबाहेर आणि अगदी पलीकडच्या फुटपाथवरही ‘फिल्म दीवाने’ आपल्या आवडत्या स्टारचे दूरुन का होईना पण दर्शन घडावे म्हणून पोलिसांची लाठी खावूनही खचाखच गर्दी करीत.
राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्रकुमार या तीन स्टारभोवतीचा प्रेमाचा श्रवणीय गीत संगीतमय उत्कट आणि असोशीने भरलेला त्रिकोण. त्यातच युरोपचे दिलखुलास आणि भरभरून दर्शन हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले आणि आर. के. फिल्मचा हा पहिला रंगीत चित्रपट सुपर हिट ठरला. एकूण चोवीस रिळांचा चित्रपट आहे. म्हणजे २३८ मिनिटे. पडद्यावर पहिल्या मध्यंतराला आले, First Intermission आणि नंतरच्या मध्यंतराला आले, Second Intermission. दोन मध्यंतरामुळे थिएटरचे कॅन्टीग अधिक फायद्यात राहिले असेल, थिएटरबाहेरचा वडापाववाला अधिक सुखावला असेल असा काही निष्कर्ष तुम्ही काढलात तरी चालेल. याचे कारण म्हणजे, चालणारा चित्रपट अशा आजूबाजूच्या लहान मोठ्या उद्योगानाही जगवतो. त्या काळात याच सिंगल स्क्रीन थिएटर्समधील वेफर किती महाग यावर चर्चा होत नसे. चित्रपटावर भरभरून बोलण्याचे ते युग होते.
या यशानंतर ‘चोवीस तास सिनेमामय’ असलेले व्यक्तिमत्व असे कौतुकाने म्हटले जाते त्याच राज कपूरने ‘मेरा नाम जोकर’ घडवला. पुन्हा लांबी खूप मोठी आणि त्यामुळे पुन्हा दोन मध्यंतरचा चित्रपट. एक तर ‘संगम’च्या यशाने राज कपूरचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला, त्यातच ‘जोकर’ त्याचा खूप महत्वाकांक्षी चित्रपट आणि चित्रपटाच्या थीममध्ये सर्कसला भरपूर फूटेज, जोडीला एकाच चित्रपटात तीन प्रेमकथा (एक शालेय वयातील, ती भूमिका ऋषि कपूरने साकारलीय) इतके सगळे असल्यावर चित्रपटाची लांबी खूप वाढणारच.
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नॉव्हेल्टी होते. पण फस्ट डे फर्स्ट शोपासूनच पब्लिक रिपोर्ट नरम आला (तसं कसं घडलं? याचे उत्तर कोणाकडेही नाही) आणि पहिला आठवडा संपताच ‘जोकर’मधील काही दृश्ये आणि गाणी कापली गेली आणि तो एकाच मध्यंतरचा करण्यात आला. पण तोपर्यंत ‘जोकर पडला’ अशी हवा पसरल्याने फस्ट रनला तरी गर्दी झाली नाही.
‘हम आपके है कौन’ आम्हा समिक्षकांना लिबर्टी थिएटरमध्ये पब्लिकसोबतच फर्स्ट डे फर्स्ट शो दाखविला. राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट असल्याने फॅमिली क्राऊड खूप होता. वातावरणात उत्साह होता. मला पूर्वापार नवीन चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगचा चार्ट पाहायची सवय, येथे बघतोय तर शनिवार रविवार बाल्कनी तिकीट दर चक्क सव्वाशे रुपये. इतर दिवशीही चढते दरच होते. राजश्री प्रोडक्शनच्या वतीने सुरुवातीला प्रत्येक शहरात एकाच थिएटरमध्ये सिनेमा रिलीज केला होता. ही सकारात्मक बिझनेस टॅक्टीज होती. सिनेमा सुरु होताना सेन्सॉर प्रमाणपत्रावर सवयीनुसार नजर टाकली आणि २३ रिळे असे वाचून आश्चर्य वाटलं. दिग्दर्शक सूरजकुमार बडजात्या याने इतके काय बरे मांडलय हा प्रश्न कुतूहल वाढवणारा होता. आणि तासाभराने पडद्यावर आले ते First Intermission यावरुन ओळखले या चित्रपटाला दोन मध्यंतर आहेत. म्हणजे प्रोडक्शनकडून आम्हा मिडियाला दोनदा नाश्ता मिळणार. चित्रपटाला फस्ट डे फर्स्ट शोपासूनच हायफाय अथवा नवश्रीमंत रसिकांची पसंती मिळाली आणि सिनेमा सुपर हिट झाला. पण लांबी जरा जास्त आहे हे लक्षात आले आणि थोडे एडिटींग करुन काही काळाने चित्रपट एका मध्यंतरचा करण्यात आला. पण हा चित्रपट जाणीवपूर्वक ३ तास २६ मिनिटांचा करण्यात आला, याचे कारण म्हणजे, व्हिडिओ कॅसेटमध्ये सामावू शकत नाही अशीही एक चर्चा रंगली. म्हणजे हा चित्रपट व्हिडिओ चोरीला गेला तरी तो सेफ राहिल, असे व्यावसायिक गणित. म्हणजे, एकेका सिनेमामागे किती गोष्टींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचार केलेला असतो हे बघा आणि तेच खरे सिनेमाचे जग आहे.
‘संगम’ काही वर्षांनी सेकंड रनला अथवा मॅटीनी शोला रिलीज होताना मात्र त्यातील काही भाग कापून एका मध्यंतरचा करण्यात आला होता. आणि एकदा यशस्वी ठरलेला चित्रपट कायमस्वरुपी लोकप्रिय असतोच. ‘जोकर’ला काही वर्षांनी पुन्हा पुन्हा रिलीज होताना अतिशय चांगली गर्दी होऊ लागली. ‘हीना’ (१९९१) च्या निमित्ताने रणधीर कपूरच्या मुलाखतीचा योग आला असता त्याने ‘जोकर’ने नंतरच्या काळात रिलीज होताना उत्तम व्यावसायिक यश मिळवले असे मला अगदी उत्साहात सांगितल्याचे आठवतेय. ‘हम आपके है कौन’ चा काळ चॅनलच्या जगाची हळूहळू वाढ होत असतानाचा होता. अनेकदा तरी तो चॅनलवर येत असताना त्याचा टीआरपी भारी असतोच.
या तीन चित्रपटात एक कॉमन गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात आले का? तीनही चित्रपटात गीत संगीताला भरपूर स्कोप आहे (हम आपके.. तर संगीत की भाषा में बोलो चित्रपट आहे. पटकथेत गाण्यांना विशेष स्थान आहे) या लोकप्रिय गाण्यांनी हे एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही फोकसमध्ये ठेवलेत…
खूप मोठ्या लांबीचे आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ (३ तास ४४ मिनिटे), संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (३ तास ६ मिनिटे) असे अनेक चित्रपट रसिकांनी एन्जॉय केले/स्वीकारले. पण आजच्या गतीमान काळात इतक्या लांबीचे (त्यात एकादा दोन मध्यंतरचा चित्रपट) रसिकांना आपलासा वाटेल का? इतकी लांबी ही थीमनुसार आहे आणि दिग्दर्शकाची ती गरज आहे असे ते मानतील का? ‘सिनेमाचा अभ्यास’ करताना त्यात हा मुद्दाही महत्त्वाचा आहेच….
-दिलीप ठाकूर