‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ज्या गाण्याला निर्माते बकवास म्हणाले; तेच गाणं ठरलं सुपरहिट !
कलावंताचे मन खूप संवेदनशील असते. आपल्या कलाकृतीवर तर त्याचे विलक्षण प्रेम असतं आणि कुणी कळत नकळत जरी आपल्या कलाकृतीवर टीका केली तर त्याला ते आवडत नाही. असाच काहीसा प्रकार गीतकार योगेश यांच्याबद्दल झाला होता. एका चित्रपटाच्या निर्मात्यांनी गीतकार योगेश यांना “तू अतिशय बकवास गाणे लिहिले आहेस आणि अशा या निरर्थक गाण्यामुळे माझा चित्रपट फ्लॉप होईल!” असे म्हटले होते. पण ज्या गाण्याला निर्मात्याने बकवास म्हटले होते तेच एकमेव गाणं या चित्रपटाची ओळख राहीली आहे. कोणता होता तो चित्रपट? कोणतं होतं ते गाणं? आणि काय झाला होता नेमका किस्सा? (Priyatama)
१९७७ साली बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रियतमा’ (Priyatama) या चित्रपटाची गाणी गीतकार योगेश लिहित होते. चित्रपटाला संगीत राजेश रोशन यांचे होते. या चित्रपटात जितेंद्र, नीतू सिंग, राकेश रोशन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बासू चटर्जी यांच्या चित्रपटाचा जॉनर त्या काळात ठरलेला असायचा. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाला साजेशी गाणी लिहिण्याचा आव्हान योगेश यांच्याकडे होते. गीतकार योगेश आणि संगीतकार राजेश रोशन यांच्या परस्पर समन्वयातून गाणं तयार झालं. बासूदा यांना खूप आवडलं आणि लगेच त्यांनी किशोर कुमारच्या आवाजामध्ये त्याची रेकॉर्डिंग देखील केले. गाण्याचे बोल होते ‘कोई रोको ना दिवाने को मन मचल रहा…’ गाणं अतिशय सुंदर बनलं होतं. बासू चटर्जी गीतकार योगेश यांना म्हणाले, ”आता पुढची गाणी लिहायला घ्या …!”
पण मधेच माशी शिंकली. चित्रपटाचे निर्माते टी सी दिवान यांना मात्र ते गाणं अजिबात आवडलं नाही. एक तर त्या दिवशी त्यांचा मूड देखील खराब होता आणि त्याच काळात हे गाणं त्यांना ऐकवलं गेलं. त्यांनी योगेश यांना लगेच बोलावून आणि सांगितलं, ”किती फालतू गाणे लिहिलं आहे. अगदी बकवास शब्द आहेत गाण्यामध्ये !” त्यावर योगेश म्हणाले की, ”बासू चटर्जी यांच्या चित्रपटाचे कथानक आणि त्यांचा चित्रपटाचा आशय लक्षात घेऊनच मी हे गाणं लिहिलं आहे.” त्यावर चित्रपटाचे निर्माते टी सी दिवान आणखी भडकले आणि म्हणाले, ”या असल्या बकवास गाण्यामुळे माझा चित्रपट फ्लॉप होईल मला या गाण्याची गरज नाही.” योगेश नाराज झाले आणि म्हणाले, ”ठीक आहे. माझी या सिनेमाची इतर गाणी अशीच आहेत. तुम्हाला ती पण आवडणार नाहीत. बेटर वे मी या सिनेमातून बाहेर पडतो. तुम्ही दुसरा गीतकार बघा.” आणि ते बाहेर पडले.
निर्मात्यांनी झाला प्रकार बासूदा यांना ऐकवला. त्यांना खूप आश्चर्य वाटले आणि निर्मात्याचा राग आला. ते लगेच निर्माते टी सी दिवान यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ”जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून, संगीतकार राजेश रोशन म्हणून गायक किशोर कुमार यांना गीतकार योगेश यांचे हे गाणं आवडलेलं असताना त्यावेळेला तुम्ही आमचा विचार न घेता योगेश यांच्या एकट्यावर अशी टीका करणे बरोबर नाही. त्यांना तुम्ही असं बोलणं मला अजिबात आवडलं नाही. एका कलावंताचा तुम्ही अपमान करीत आहात. तुम्ही त्यांची माफी मागा नसता हा चित्रपट मी देखील सोडतो!” (Priyatama)
=========
हे देखील वाचा : सलीम आणि जावेद यांची ‘पहली मुलाकात‘ कुठे आणि कशी झाली?
=========
आता मात्र निर्माते टी सी दिवान चपापले त्यांचे डोळे खाडकन उघडले. आपली चूक लक्षात आली लगेच त्यांनी योगेश यांना फोन केला आणि झालेल्या प्रकाराची जाहीर माफी मागितली आणि पुन्हा चित्रपटाच्या टीममध्ये यायला सांगितले. त्यावर गीतकार योगेश हसत हसत म्हणाले, ”होतं असं कधीकधी. ओके.” योगेश असं म्हणाले खरे पण ते आतून खूप दुखावले होते. त्यामुळे त्यांनी या चित्रपटातून स्वतःला बाजूला केलं! नंतर या चित्रपटातील उरलेली सर्व गाणी अंजान यांनी लिहिली.
आज ‘प्रियतमा’ (Priyatama) हा चित्रपट कितीजरी आठवायचा म्हटलं तरी कुणालाच आठवत नाही! “पण या तुझ्या बकवास शब्दामुळे माझा चित्रपट फ्लॉप होईल” असं निर्माते म्हणाले होते. त्यांची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली. सिनेमा फ्लॉप झाला. पण ज्या गाण्यावर त्यांनी इतकी वाईट टीका केली होती ते गाणं मात्र अजून कल्ट क्लासिक म्हणून आज देखील ओळखलं जातं. तुम्ही हे गाणं ऐकलं आहे का? चित्रपटात राकेश रोशन यांच्यावर हे गाणे चित्रित झालं होतं.
गीताचे बोल होते ‘कोई रोको ना दिवाने को मन मचल रहा…’