“शिकायला वय नसतं” – गुरु दिवेकर…!
सध्या कलर्स मराठीवरील (Colors Marathi) “शुभमंगल ऑनलाईन” ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. या मालिकेत शर्वरीच्या भावाची म्हणजे हर्षदची भूमिका करणारा कलाकार म्हणजे गुरु दिवेकर. (Guru Divekar) गुरू स्वतः इंजिनिअर आहे. तो कॉलेजला असताना त्याने ‘मिस्टर सिंहगड’ स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि त्यातल्या टॉप थ्री मध्ये त्याने स्थान मिळवले होते. त्याला मॉडेलिंग आणि नृत्य या कलांची आवड आहे. एकदा ‘प्रशांत दामले टी स्कुल’ (T-School – Prashant Damle Fan Foundation) ची जाहिरात त्याने पाहिली आणि तिथे त्याने प्रवेश घेतला.
आनंदाची गोष्ट ही की तेथील प्रशिक्षण सुरु असताना त्याला तेथे शिष्यवृत्ती मिळाल्याने अजून काही कालावधीसाठी त्याला तिथे शिकायला मिळाले. मग तो ऑडिशन्स देखील देऊ लागला. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तो मेहनत करू लागला. त्याने स्वतःचा पोर्टफोलिओ केला, तो काही निर्मिती संस्थांकडे पाठवला.
हे देखील वाचा: संतोषने का मानले अवधूतचे आभार? जाणून घ्या खरं कारण
मग शशांक सोळंकी यांच्या निर्मिती संस्थेच्या “सारे तुझ्याचसाठी” या मालिकेसाठी त्याने ऑडिशन दिली. मग लूक टेस्ट झाली आणि त्याची निवड झाली. या मालिकेच्या निमित्ताने “गंधार” ही व्यक्तिरेखा साकारताना त्याला अविनाश नारकर यांच्या बरोबर काम करताना खूप शिकायला मिळाले.
अविनाश नारकर म्हणजे ‘अविदादा नावाचे एक विद्यापीठ’ आहे, असेही गुरु सांगतो. “सारे तुझ्याचसाठी” या मालिकेत “दिशा” ची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे मधुरा जोशी. “सारे तुझ्याचसाठी” म्हणता म्हणता गुरु आणि मधुरा या दोघांची खऱ्या आयुष्यातही जोडी जमली आणि गुरू आणि मधुरा यांचे लग्न ऑक्टोबर २०२० मध्ये झाले. लॉकडाऊनच्या काळाबद्दल गुरु सांगतो, “आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक येथे गेलो होतो आणि लॉकडाऊन जाहीर झाल्याने आम्ही नाशिकमध्येच अडकलो होतो.
हे वाचलंत का: असा घडला बाल कलाकार ते संगीतकार आशिष गाडे…
पण या लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचे असे मी ठरवले. मी ऑनलाईन फिल्म मेकिंगच्या कार्यशाळेत सहभागी झालो. त्यातूनही खूप शिकता आलं. व्हॉइस ओव्हरची कार्यशाळा केली. घरी शॉर्ट फिल्म चित्रित कशी करायची, हे शिकलो. शिवाय मला स्वतःला शिकवण्याची देखील आवड आहे. या कालावधीत मी ऑनलाईन ट्युशन्स घेतल्या. “याच दरम्यान गुरूला “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेत ‘हर्षद’ म्हणजे शर्वरीच्या भावाची भूमिका मिळाली. पण त्या काळात शूटिंग सुरु व्हायला वेळ असल्याने मालिकेतील भूमिका, त्या भूमिकेचा आलेख या संदर्भात ऑनलाईन वर्कशॉप्स झाली होती.
मग प्रत्यक्ष शूटिंगला अनलॉक नंतरच सुरुवात झाली. मुळात कलर्स सारखी वाहिनी आणि ‘मंजिरी सुबोध भावे’ यांची निर्मिती संस्था आणि दिग्दर्शक निशांत सुर्वे शिवाय अनेक सुप्रसिद्ध कलाकार अशी उत्तम टीम “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेची असल्याने गुरूला या मालिकेत काम करताना अर्थातच आनंद होत आहे. मालिकेच्या सेटवरचे वातावरण देखील खूप सकारात्मक ऊर्जा देणारे असते, असेही तो म्हणतो. गुरुची पत्नी म्हणजे अभिनेत्री मधुरा जोशी (Madhura Joshi) ही देखील सध्या “श्रीमंताघरची सून” या सोनी मराठीवरील (Sony Marathi) मालिकेत महत्वाची भूमिका करत आहे.