
Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते
आपण अगदी कोणत्याही कलाकाराची कुंडली मांडली, बदलती नक्षत्रे पाहिली तरी त्यात त्याचे घोषणेवरच बंद पडलेले चित्रपट म्हणा, मुहूर्तावर म्हणा अथवा काही रिळांच्या शूटिंगनंतर बंद पडलेले (पिक्चरच्या भाषेत डब्यात गेलेले) चित्रपट असतातच, तो इतिहास, त्याचा फ्लॅशबॅक भन्नाट. त्याला आमिर खान अपवाद कसा असेल ? त्याचेही दहा बारा चित्रपट असेच कुठल्या ना कुठल्या स्टाॅपवर कायमचेच थांबलेत. त्यातले दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होतेच. त्या दोन्ही चित्रपटांचे मुहूर्त मी लाईव्ह अनुभवलेत. (मिडियात असल्यानेच हे पुण्य मला लाभले आणि छान आठवणीचा ठेवा ठरलयं.) एक चित्रपट होता, शेखर कपूर दिग्दर्शित “टाईम मशीन“. (Aamir Khan)
१९९० सालची गोष्ट. त्याकाळात नवीन हिंदी चित्रपटांचे मुहूर्त म्हणजे उत्फूर्त सेलेब्रेशन. एक भारी सणच. अशा चित्रपट मुहूर्ताचे आमंत्रणाचे कार्डही देखणे असे आणि मग भव्य दिव्य सेटवर मुहूर्ताचे दृश्य चित्रित होणार. ते होताच हाती पेढा आणि शीतपेय कधी येई हे समजायचेच नाही. वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओतील “टाईम मशीन”चा मुहूर्तही असाच कडक. रेखा, Aamir Khan, Raveena Tandon यांच्यावरचे मुहूर्त दृश्य आजही मला आठवतंय. स्टेजवर मेणबत्या लावल्या होत्या आणि अंधारात त्या छान मिणमिणत होत्या. मुहूर्ताचे प्रमुख आकर्षण रेखा होती. Rekha म्हणजे बातमी. रेखा म्हणजे केन्द्रस्थान. रेखा म्हणजे आकर्षण. रेखा म्हणजे काहीही. असे म्हणण्याचे ते मंतरलेले दिवस. (Movie)
शेखर कपूर मासूम व मिस्टर इंडिया ‘या’ चित्रपटानंतर जोशिले चित्रपटाच्या दिग्दर्शनातून बाजूला झाल्यावर काही काळाने “टाईम मशीन”चा भव्य दिव्य दिमाखदार मुहूर्त हे विशेषच. (शेखर कपूरने “जोशीले” या चित्रपटाचे दिग्दर्शन सोडल्यावर निर्माता सिबते हसन रिझवी यांनी हा चित्रपट मोठ्या कष्टाने पूर्ण केला. चित्रपटात अनिल कपूर, सनी देओल, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, राजेश विवेक यांच्या प्रमुख भूमिका.) ‘टाईम मशीन’ हा सायन फिक्शन चित्रपट (Movie) असल्याचे मुहूर्तालाच लक्षात आले. (Aamir Khan)

आमिर खानचे (Aamir Khan) तेव्हाचे आम्हा मिडियाशी वागणे मैत्रीचेच (ते साठावा वाढदिवस साजरा करतानाही होते. तरी त्याच्या पीआर टीमने “कयामत से कयामत तक” च्या काळापासून आजही सक्रिय असलेल्या सिनेपत्रकारांचा शोध घ्यायला हवा होता हे सांगावेसे वाटते. आजही माझ्या कलेक्शनमध्ये आमिर खानच्या सुरुवातीच्या चित्रपटांची एक्स्युझिव्हज बुकलेट व दुर्मिळ फोटो आहेत.) रविना टंडन या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या दिवसांत नवखीच होती. दिग्दर्शक रवि टंडनची मुलगी अशीच तिची (Raveena Tandon) ओळख होती. मुहूर्तानंतर चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत “टाईम मशीन”चे एक मोठे चित्रीकरण सत्र पार पडले. त्यानंतर हा चित्रपट चक्क बंद पडला. फक्त आठवणीत राहिला त्याचा मुहूर्त.
आमिर खानचा आणखीन एक मुहूर्तापासूनच चर्चेत असलेला चित्रपट (Movie), इंद्रकुमार दिग्दर्शित “रिश्ता“. १९९३ सालची गोष्ट. पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमधील या चित्रपटाची मुहूर्ताची पार्टी आजही माझ्या डोळ्यासमोर येते. Amitabh Bachchan, आमिर खान व माधुरी दीक्षित अशी अतिशय उत्तम स्टार कास्ट. मुहूर्ताचे दृश्यही अतिशय प्रभावी. (अमिताभ व माधुरी दीक्षित यांचा टीनू आनंद दिग्दर्शित “शिनाख्त” मुहूर्तानंतर डब्यात गेल्यावर ते पुन्हा या चित्रपटासाठी एकत्र आलेले). अमिताभ व आमिर खान पहिल्यांदाच एकत्र आलेले.

रात्री उशिरापर्यंत या मुहूर्ताची पार्टी रंगली. मी तर या मुहूर्तावर केवढे तरी भरभरुन लिहिले. बरेच दिवस या मुहूर्ताची चर्चा होत राहिली. चित्रपट काही पुढे सरकेना. काही दिवसातच लक्षात आले हा चित्रपट बंद पडला. म्हणून तो विसरायला हवा असे अजिबात नाही. सुनील दर्शन दिग्दर्शित “रिश्ता द बाॅण्ड ऑफ लव्ह”चा याच्याशी काहीच संबंध नाही हेही सहज सांगायलाच हवे
आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवेच होते. शेखर कपूरच्या दिग्दर्शनात आमिर खान ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती (शेखर कपूरने त्यानंतर आणखीन काही चित्रपट मध्येच सोडलेत हा विषय वेगळाच. असतं असेही एक वैशिष्ट्य. उदा. दुश्मनी).
रेखा व आमिर खान (Aamir Khan) खरं तर वेगळ्या अर्थाने दुसर्यांदा एकत्र काम करीत होते याची आपणास कल्पना आहे? आमिर खानचे पिता ताहिर हुसेन निर्मित व रमेश अहुजा दिग्दर्शित “लाॅकेट” या चित्रपटात रेखा नायिका होती आणि आमिर खान आपल्या घरच्या टी. व्ही. फिल्म या प्राॅडक्सन्समध्ये छोट्या गोष्टींतून रस घेत होता. चित्रपटात जीतेंद्र, विनोद मेहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.) रेखाने तारखांवरुन आपले पिता ताहिर हुसैन यांना बराच त्रास दिल्याने आपण रेखा मॅडमसोबत काम करणार नाही असे आमिर खान म्हणाल्याचे गाॅसिप्स त्या काळात गाजले होते. फिल्मी गाॅसिप्सला काहीही चालते हो.
==========
हे देखील वाचा : Kishore Kumar यांनी गायलेल्या गाण्याच्या मेकिंगचा रंजक किस्सा!
==========
आमिर खानच्या बंद पडलेल्या काही चित्रपटांची नावे सांगायची तर, प्रयाग राज दिग्दर्शित नाव न ठरलेला चित्रपट (शशी कपूर, माधुरी दीक्षितसह), महेश भट्ट दिग्दर्शित आई व मुलगा नातेसंबंधांवर नाव न ठरलेला चित्रपट (आईच्या भूमिकेत मुमताज), चेतन आनंद दिग्दर्शित “तख्त तो ताज” (माधुरीसह), पद्मालय निर्मित “नया सावन”, मुकेश भट्ट दिग्दर्शित “मुलाकात” (रानी मुखर्जी व ऐश्वर्य रायसह), मणि रत्नम दिग्दर्शित “लाजो” (करिना कपूरसोबत), पियुष चक्रवर्ती दिग्दर्शित “आज अभी” वगैरे.
आमिर खान (Aamir Khan) खरं तर जाॅन मॅथ्यूज दिग्दर्शित “सरफरोश” (१९९९) नंतर अधिक चौकस आणि प्रगल्भ झालाय. त्यानंतर त्याने चित्रपट निवडीवर जास्त लक्ष केंद्रित केलेय (तरी विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित “ठग्ज ऑफ हिंदुस्थान” मध्येही तो असावा? आणि अमिताभ बच्चनही ! २०१८ ची गोष्ट) आमिर खानच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पडद्यावर न आलेल्या चित्रपटांची आठवण वेगळी ठरतेय. आमिर खानचे वेगळेपण यातही.