‘या’ अभिनेत्रीला ‘बिग बीं’सोबत भूमिका करण्याचा योग आला
शीर्षक वाचूनच अनेक चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर एव्हाना
मेरे प्यार का रस जरा चखना
होये मखना होये मखना
ऐसे तो चुरा अब ऑख का
होये मखना होये मखना
हे गाणं (गीतकार समीर, संगीत विजू शहा) आणि या गाण्यातील अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि गोविंदा यांचा अतिशय स्टायलिस्ट, ठुमकेदार, रंगतदार आणि विशिष्ट स्टाईलने साकारलेला डान्स आला असेल. होय वासू भगनानी निर्मित आणि डेव्हिड धवन दिग्दर्शित “बडे मिया छोटे मिया” (रिलीज १६ ऑक्टोबर १९९८) मधील हे गाणे आहे आणि हे गाणं बघता बघता चक्क पंचवीस वर्षाचं कधी झालं हे समजले देखील नाही. काय आहे की, ज्या दिवशी यश जोहर निर्मित व करण जोहर दिग्दर्शित धर्मा प्रोडक्शनचा “कुछ कुछ होता है” (तोही रिलीज १६ ऑक्टोबर १९९८ त्याचीही पंचविशी) आम्ही मुंबईतील चित्रपट समीक्षकांनी लिबर्टीमध्ये सकाळी बाराचा शो पाहिला आणि तो संपल्यानंतर मध्ये आम्हाला थोडा वेळ मिळाला आणि तिथून आम्ही नाॅव्हेल्टीला “बडे मिया छोटे मिया” पाहायला आलो. या चित्रपटाचे मेन थिएटर ते होतं. बडे मियाचा एकूणच जो काही पोस्टरवरुन राग रंग दिसत होता, त्याच्यावरनं हा चित्रपट हा डेव्हिड धवन गोविंदा या दिग्दर्शक व हीरो या जोडीचा आणखीन एक मसालेदार मनोरंजक चित्रपट असणार हे जरी स्पष्ट असलं तरी आता ही जोडी नवीन काय देणार असा प्रश्नच होता.(Big B) मला या चित्रपटाचा जुहूच्या एकापंचतारांकित हॉटेलमधील पूल साईटवरचा एका रात्री शानदार पार्टीत झालेला मुहूर्त आठवतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमिताभचा (Big B) तो चक्क पडता काळ होता. कोहराम, लाल बादशहा, मृत्यूदाता, सूर्यवंशम अशा चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चनसारख्या कसलेल्या अभिनेत्यांने भूमिका का साकारावी असा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाला जणू उत्तर मिळू नये म्हणून रसिकांनी त्याचे हे चित्रपट पाहिलेच नाहीत. अशातच त्याने ‘बडे मिया छोटे मिया’ स्वीकारल्यावर म्हटलं गेलं, तो परिस्थितीला शरण गेला असावा. एकदा का कोणी अपयशाच्या गर्तेत सापडतं, त्याचे अनेक अर्थ काढले जातात.
डेव्हिड धवन व गोविंदा ही जोडी त्या काळामध्ये जबरदस्त फॉर्मात होती. दिग्दर्शक व अभिनेता यांच्या सुपरहिट जोडीपैकी ती एक जोडी होती. (विजय आनंद व देव आनंद, शक्ती सामंता व राजेश खन्ना वगैरे हिट जोड्या) आणि अशातच अमिताभने त्या जोडीमध्ये स्वतःला जोडून घेणं हे एक प्रकारचं ठिगळ लावण्यासारखं तर नाही ना असा अनेकांना प्रश्न पडला. निर्माता वासू भगनानी हा एक प्रकारचा शोभनशिप करण्यात एक्स्पर्ट. आपल्या चित्रपटाचा मुहूर्त, प्रीमियर, पार्टी अतिशय ग्लॅमरस करण्यात उत्साही. या मुहूर्ताला चक्क ऐश्वर्या राय आपली आई वृंदा राय यांच्यासोबत आल्याचे आठवतय. तोपर्यंत ऐश्वर्याला फक्त दक्षिणेकडील मणि रत्नम दिग्दर्शित “इरुवर” या तमिळ चित्रपटामध्ये दुहेरी भूमिका मिळाली होती आणि हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये ती अधिकाधिक कॉन्टॅक्ट्स वाढवण्यासाठी, चित्रपट मिळण्यासाठी धडपडत होती. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अनेक नवीन हिंदी चित्रपटाच्या मुहूर्त आणि इव्हेंट्सला ती सदिच्छा भेटी देत असल्याचे मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. (Big B)
चित्रपटसृष्टीतील भटकंतीमध्ये अशा पद्धतीचे फंडे पाहायची मला अगोदरपासूनची सवय. हा मुहूर्त झाला आणि त्यानंतर या चित्रपटासाठी रविना टंडन आणि रमय्या या दोन नायिका निश्चित झाल्या. अमिताभ बच्चन (Big B) आणि रमय्या हे कॉम्बिनेशनसुद्धा थोडसं अजब होतं. चित्रपट पूर्ण होता होता बातमी आली, चित्रपटांमध्ये एक गाणं आहे आणि त्याच्या एखादी पाहुणी कलाकार हवी आहे. कोण बरं असेल ही पाहुणी यावर खूप चर्चा रंगली झाली आणि नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून नाव आलं माधुरी दीक्षित! माधुरी त्यावेळेला खरं तर ती लग्न कधी करणार या मिडियाच्या प्रश्नांमध्ये गुंतलेली होती आणि तोपर्यंत तिचा अमिताभ बच्चनसोबत भूमिका साकारण्याचा योग हुकत होता. दोनदा तसा योग आला होता एकदा आर. के. स्टुडिओत टीनू आनंद दिग्दर्शित “शिनाख्त”च्या मुहूर्तातील अमिताभ आणि माधुरीचे मालगाडीच्या डब्यातील थरारक दृश्य आजही आठवतेय. त्याबरोबर रजनीकांत, माधवी यांच्याही यात भूमिका होत्या. अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इंद्रकुमार दिग्दर्शित ‘रिश्ता’चा ग्लॅमरस मुहूर्त झाला. त्यात अमिताभ; माधुरी आणि आमिर खान अशी स्टार कास्ट. दोन्ही चित्रपटाच्या मुहूर्तापासून चर्चा झाली. पण चित्रपट मात्र बनू शकले नाहीत. मग माधुरी दीक्षितला अमिताभ बच्चनसोबत भूमिका करण्याचा योग कधी येणार होता? तो योग आला या “मखना” गाण्याच्या वेळी.
गाणं विदेशामध्ये चित्रित झालं आणि हे गाणं या चित्रपटाचं हायलाईट ठरलं. त्याकाळात उपग्रह वाहिन्यांवर नवीन चित्रपटाच्या प्रसिद्धीचं युग आलेलं. ऑडिओची जागा व्हिडिओ घेतलेली आणि त्यात ‘बडे मिया…’च्या मखना आणि गोविंदा व रविना टंडनच्या ‘किसी डिस्को मे जाए’ (पार्श्वगायक उदीत नारायण व अलका याज्ञिक) या गाण्यांनी लोकप्रियता संपादन केली आणि केवळ आणि केवळ या गाण्यांसाठीच हा चित्रपट सुपरहिट ठरला. तसं म्हटलं तर या चित्रपटांमध्ये काय गोष्ट होती, विजय निगम म्हणजे इन्स्पेक्टर अर्जुन सिंग (अमिताभ बच्चन) व सुनील निगम म्हणजे मोहन भार्गव (गोविंदा) यांची मौज, मजा आणि धमाल मस्ती. कुठली तरी एक गोष्ट घ्यायची आणि त्याच्याभोवती मसाला पेरायचा ही डेव्हिड धवनची खासियत होती. चित्रपटांत रवीना टंडन, रमय्या, अनुपम खेर, परेश रावल, शरद सक्सेना, महावीर शहा, कादर खान, सतीश कौशिक, सुषमा शेठ, दिव्या दत्ता, राकेश बेदी, असरानी अवतार गिल, रझाक खान, विजू खोटे असे लहान मोठे कलाकार लहान मोठ्या भूमिकेत. चित्रपट मला तरी फारसा जमलेला कुठे वाटला नाही जी रंगत डेव्हिड धवन व गोविंद यांच्या कॉमेडी चित्रपटाना नेहमी यायची तशी काही भट्टी या चित्रपटात जमल्यासारखी मला वाटली नाही. (Big B)
फक्त मखना व डिस्को मे जाऐ या गाण्यांनी रंगत आणली. चित्रपटाचे संकलन ए. मुथ्यू याने चित्रपटाची गती अतिशय चांगली ठेवली. अमिताभला मात्र तात्कालीक पडत्या काळातून सावण्यासाठी ‘ बडे मिया छोटे मिया’च्या यशाचा टेकू मिळाला. अन्यथा अमिताभला आणखीन चार पायऱ्या दुर्देवाने खाली यावे लागले असते अर्थात त्याचं जबरदस्त फायटिंग स्पिरीट, अफाट गुणवत्ता, पॉझिटिव एटीट्यूड आणि आपल्या कामावरचा फोकस लक्षात घेता त्याच्यातूनही तो बाहेर पडला असता. अर्थात २००० साली “कौन बनेगा करोडपती: आणि त्याच वर्षीच्या दिवाळीत आदित्य चोप्रा दिग्दर्शित यशराज फिल्मचा ‘मोहब्बते’ या दोन हुकमी नाण्याच्या जोरावर अमिताभ बच्चन (Big B) पुन्हा एकदा जबरदस्त टेक ऑफ घेतला, त्याची गोड फळ आणि त्यातलं सातत्य तो आजही राखून आहे. बडे मिया छोटे मिया चित्रपट जरी फारसा रंगला नसला तरी अमिताभ बच्चनला त्या वेळेस आपली अडचणीत असलेली करिअर सांभाळण्यासाठी उपयोगी पडला. दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि गोविंदा हे “ताकतवर” (१९८४) या चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र आले. तो एक मारधाडवाला सिनेमा होता. डेव्हिड धवन चित्रपट संकलनातून पुढचं पाऊल म्हणून दिग्दर्शनामध्ये आला. त्याची आणि गोविंदाची जोडी जमली आणि स्वर्ग, शोला और शबनम, ऑखे, राजा बाबू , कुली नंबर वन, साजन चले ससुराल, बनारसी बाबू, दीवाना मस्ताना, हीरो नंबर वन, हसीना मान जायेगी, कुंवारा, क्यूकी मै झूठ नही बोलता, एक और एक ग्यारह, पार्टनर, डू नॉट डिस्टर्ब आणि अर्थातच बडे मियां…या चित्रपटांसाठी ते एकत्र आले. त्यातील काही चित्रपट अतिशय धमाल होते. विशेषतः एस. रामनाथन दिग्दर्शित “दो फुल” (१९७३) मेहमूदचा डबल रोल तसेच विनोद मेहरा, अरुणा इराणी व अंजना यांच्याही भूमिका असलेल्या अतिशय मजेशीर चित्रपटाची “ऑखे’ (१९९३) ही रिमेक फुल्ल टाईमपास होती. ‘दो फुल’ मध्ये मेहमूदने डबल रोल साकारताना कुठेही विनोदाची पातळी सोडली नव्हती.”ऑखे’तही गोविंदाने तशी पातळी सोडली नसली तरी आता कॉमेडी नायक म्हणून तो प्रेक्षकांसमोर आला. (Big B)
चित्रपटाने नव्वदच्या दशकात इतकं धुवाधार यश मिळवलं की, तोपर्यंतच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील टॉप टेन व्यवसायिक यशस्वी चित्रपटांमध्ये “ऑखे’ होता. या जोडीची लोकप्रियता, त्यांचा फॅन फॉलोईंग आणि त्यांच्या चित्रपटामध्ये नक्कीच काहीतरी मस्त मनोरंजन असणार असा असलेला विश्वासही त्यात दिसतोय. बडे मियां…नंतर डेव्हिड धवनच्या दिग्दर्शनात अमिताभ बच्चन कधी आला? तर “हम किसीसे कम नही” या कामेडीत. त्यात ऐश्वर्या राय देखील होतीम अमिताभ तोपर्यंत पुन्हा एकदा सावरला होता. अर्थात अमिताभची अफाट प्रतिभा, गुणवत्ता, मेहनत घ्यायची तयारी, वक्तशीरपणा पाहता एवढेच म्हणायला हवे, फाॅर्म टेम्पररी असतो, तो येत जात असतो. गुणवत्ता कायम असते.
अमिताभ ऑलवेज ग्रेट.
=============
हे देखील वाचा : विद्या बालन : एकेकाळी बॅड लक समजली जाणारी हिरोईन !
=============
“मखनाला” पंचवीस वर्षे झाली. आता एकूण जर प्रगती पुस्तक पाहिलं, स्कोर कार्ड पाहिला तर अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे एकत्र येण्याचा योग इतक्या वर्षांमध्ये फक्त आणि फक्त या एकाच गाण्यापुरता यावा,अहो हे आश्चर्य नाही का ?आता या दोघांच्या गुणवत्ता लोकप्रियता पोझिशनचा विचार करता एकाही पटकथा लेखकास अथवा दिग्दर्शकाला त्यांना एकत्र आणावसं का वाटलं नसेल ? तशा पठडीतला चित्रपट ते निर्माण का झाला नसावा ? ट्रेड पेपरमध्ये एकदा बातमी आली होती, दिग्दर्शक यश चोप्रा हे असा चित्रपट प्लॅन करताय ज्याच्यामध्ये अमिताभ आणि माधुरी पती-पत्नी असून अभिषेक बच्चन (Big B) मुलाच्या भूमिकेत आहेत. परंतु ती फक्त बातमीच राहिली. अशी कुजबूज झाली की माधुरी अभिषेकच्या आईच्या भूमिकेमध्ये भूमिका साकारण्यामध्ये तयार नाहीये अर्थात स्वतःच्या प्रतिमेच्या व लोकप्रियतेच्या प्रेमात असलेली व्यक्ती चौकट म्हणून तसं काही स्वीकारणे सहजी शक्य नसतं अथवा असे वाटलं असेल की जर आपण अशी भूमिका साकारली तर त्याच पद्धतीतल्या भूमिका आपल्याला ऑफर होतील. प्रत्येक कलाकार आपापल्या जमेच्या बाजूने विचार करत असतो. त्यामुळे माधुरीचं काही चुकलं असं वाटत नाहीये. जे काय असेल ते असो. अमिताभ माधुरी अर्थात एबी आणि एमडी हे एकत्र येण्याचा ‘ मखना’ आहे आणि त्यात गोविंदाचा जो चकना आहे त्याला तब्बल पंचवीस वर्षे होऊनही त्याची लोकप्रियता कायम हे मात्र रसिक तुम्हालाही माहितीये.