बिग बी यांचा हा सिनेमा तब्बल ३७ वर्षानंतर प्रदर्शित झाला !
तुम्हाला माहिती आहे कां ? बिग बी अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट तब्बल ३७ वर्षानंतर प्रदर्शित झाला. १९७१ साली शूटिंग सुरु झालेला हा सिनेमा तब्बल ३७ वर्षानंतर २००८ साली प्रदर्शित झाला. एवढा मोठा गॅप पडल्यामुळे साहजिकच या चित्रपटाला व्यवसायिक यश अजिबात मिळाले नाही. पण निर्मात्याने धाडसाने हा चित्रपट प्रदर्शित केला हीच एकमेव जमेची बाजू. हा चित्रपट इतका का रखडला? दिग्दर्शकाने कोणत्या आयडिया वापरून हा चित्रपट पूर्ण केला आणि प्रदर्शित केला? मोठी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. (Amitabh Bachchan)
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन आणि शत्रुघन सिन्हा दोघेही स्ट्रगलिंग ऍक्टर होते. दोघेही स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी जीव तोडून काम करत होते. याच काळात राजेश खन्ना, आशा पारेख यांचा ‘आन मिलो सजना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. या सिनेमाचे दिग्दर्शक मुकुल दत्त यांनी आपला पुढचा चित्रपट निर्माण करायला घेतला या चित्रपटाचे नाव ठेवले ‘यार मेरी जिंदगी’. दोन मित्रांच्या मैत्री वरील या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शत्रुघन सिन्हा या दोघांना साईन केले. चित्रपटाची नायिका दाक्षिणात्य अभिनेत्री शारदा होती. सर्व काही व्यवस्थित चालू होतं चित्रपटाचे जवळपास ७० टक्के शूटिंग पूर्ण देखील झाले होते. परंतु नंतर हा चित्रपट बंद पडला.
मुकुल दत्त यांचा देखील सिनेमातील इंटरेस्ट संपला. सिनेमा चक्क डब्यात गेला. आता अमिताभ बच्चन आणि शत्रुघन सिन्हा आता दोघे इस्टॅब्लिश स्टार तर झालेच होते शिवाय ते परस्परांचे स्पर्धक देखील झाले होते. त्यामुळे दोघेही आता त्या जुन्या चित्रपटात काम करायला तयार नव्हते. नसीब, काला पत्थर, शान या चित्रपटानंतर या दोघांनी परस्परांसोबत काम करणे देखील बंद केले होते. या सर्व प्रकारात वीस वर्षे गेली . १९९१ साली दिग्दर्शक अशोक गुप्ता यांनी या सिनेमाचे राईटस स्वत: कडे घेतले आणि हा अर्धवट सिनेमा पूर्ण करायचे ठरवले. पण दोन्ही प्रमुख कलाकारांचे इगो पुन्हा आडवे आले. यात खरी अडचण झाली अशोक शर्मा यांची.
कारण त्यांनी हा चित्रपट मोठी किंमत देऊन निर्मात्याकडून खरेदी केला होता. त्यांनी शत्रुघन सेना ला ऍप्रोच केले शत्रुघ्न सिन्हा शूटिंगसाठी तयार झाले परंतु अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी शत्रुघ्न सोबत काम करायला नकार दिला आणि जर शत्रुघ्नला ड्रॉप करून दुसरा अभिनेता घेतला तरच मी सिनेमा करेन असे त्यांनी अशोक गुप्ता यांना सांगितले. दिग्दर्शकाला हा पर्याय अजिबात पटला नाही. त्यांनी आता तीस टक्के उरलेले शूटिंग वेगळ्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शत्रुघ्न सिन्हांनी या कामी त्यांना चांगली मदत केली. आता त्यांनी कथानक बदलले काही पात्र वाढवली. सुधाचंद्रन या अभिनेत्रीचा यामध्ये समावेश झाला.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ऐवजी आता बॉडी डबल चा वापर केला गेला. १९९२ साली त्यांनी संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण संपवले. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता निर्माण झाली पण पुन्हा काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या. चित्रपटाच्या हक्काबाबत काही प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे पुन्हा हा एकदा चित्रपट डब्यात गेला. या चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांनी दिले होते. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपूर यांनी लिहिली होती. नव्याने शूट झालेल्या भागासाठी गीतकार सुरेंद्र सारथी यांची निवड केली गेली. चित्रपट एडिटिंग करणे महाकठीण काम होऊन बसले होते. कारण वीस वर्षांपूर्वी झालेले चित्रीकरण आणि त्यानंतर झालेले चित्रीकरण यांना एकमेकांत मिसळणे खूप अवघड प्रकार होता. परंतु दिग्दर्शक अशोक गुप्ता यांनी एडिटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने केले. परंतु कायदेशीर अडचणीमुळे हा चित्रपट प्रदर्शित व्हायला उशीर झाला. असे करता करता २००८ साल उजाडले.
=============
हे देखील वाचा : जे गाणे गायला किशोरजी भीत होते तेच गाणं गाऊन केलं हिट
=============
अनेक अडचणींना मात करत शेवटी २२ एप्रिल २००८ या दिवशी ‘यार मेरी जिंदगी’ या सिनेमाचे लिमिटेड रिलीज करण्यात आले. या चित्रपटाला संगीत दिलेले आर डी बर्मन यांचे पंधरा वर्षांपूर्वीच निधन झाले होते. या सिनेमा जलाल आगा आणि इफ्तेकार कार यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांच्या चित्रपटातील भूमिकांचे शूटिंग सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी झाले होते. प्रदर्शित झाला तेव्हा हे दोघेही या दुनियेत नव्हते या चित्रपटातील अनेक कलाकार चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी हयात नव्हते. आज हा चित्रपट युट्युब वर उपलब्ध आहे. चित्रपटात उणीवा भरपूर आहेत परंतु अनेक अडचणींना मात करत अशोक गुप्ता यांनी हा चित्रपट तब्बल ३७ वर्षानंतर प्रदर्शित केला त्याबाबत त्यांचे कौतुक करायलाच पाहिजे!