‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
टिकटिक वाजते डोक्यात
हे गाणे ‘दुनियादारी’ चित्रपट संपूर्ण चित्रित झाल्यानंतर निर्माण झाले आहे. संपूर्ण सिनेमा चित्रित झाला आणि बॅकग्राऊण्ड स्कोअर साठी संगीतकार पंकज पडघन यांच्याकडे हा चित्रपट आला होता. पंकजच्या घरातच स्टुडिओ सेटअप असल्याने रोज सकाळी दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या घरी यायचे आणि मग चित्रपटाच्या बॅकग्राऊंड स्कोअरचे काम सुरु व्हायचे. दिवसभर असे चालत होते. या चित्रपटात श्रेयस (स्वप्नील जोशी) आणि शिरीन (सई ताम्हणकर) यांच्यातील काही मोंटाजेस चित्रित झाले होते. त्यावर बॅकग्राऊंड स्कोअर करताना काहीतरी वेगळे हवे, असा विचार पंकज आणि संजयदादा करत होते. या मोंटाजेस मधून त्यांच्यातील प्रेम दाखवणाऱ्या काही दोन ओळी किंवा गुणगुणणे असे काही करता येईल का, असा विचार सुरु होता. पंकजने विचार केला आणि त्याचा मित्र गीतकार मंगेश कांगणे याला दूरध्वनी केला. त्याला त्याने दोन ओळी लिहायला सांगितले, तर मंगेशने काही वेळात संपूर्ण गाणे लिहून दिले. रात्री गाणे मिळाल्यावर पंकज त्यावर चाल देत होता, पियानो वाजवत होता आणि या क्षणाची साक्षीदार होती पंकजची पत्नी सायली पंकज. पंकजने सायलीच्या आवाजात गाणे रेकॉर्ड केले. तेव्हा ते फोनवर रेकॉर्ड केले होते. दुसऱ्या दिवशी पंकजने ते रेकॉर्डिंग संजयदादांना ऐकवल्यावर त्यांना ते खूप आवडले. हे गाणे युगुलगीत म्हणून रेकॉर्ड करायचे ठरले.
सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड झाले. अजून एक गोष्ट अशी की आधी सोनूजींचे रेकॉर्डिंग झाले. त्यांच्याकडून ते गाणे पूर्ण ध्वनिमुद्रित करण्यात आले, तसेच सायलीच्या स्वरात सुद्धा ते संपूर्ण गाणे रेकॉर्ड झाले. स्वप्नील आणि सई यांचे मोंटाजेस चित्रित झालेले होतेच, ते थोडे एडिट करून मग तिथे गाणे इन्सर्ट झाले. दुनियादारी साठी हे रोमँटिक गाणे एक सरप्राईज ठरले. ‘शिंपल्याचे शो पीस नको, जीव अडकला मोत्यात’ ही ओळ संजय जाधव यांना विशेष आवडली होती. या गाण्यातून चित्रपटाचे कथानकही पुढे सरकते, असे आपण म्हणू शकतो.
‘दुनियादारी’मधील हे युगुलगीत खूप लोकप्रिय ठरले.
गणेश आचवल