सहकुटुंब बघता येतील अशा टॉप ५ वेबसीरिज
वेबसीरिज म्हटलं की बोल्ड सीन्स, अर्वाच्च आणि शिवराळ भाषा, सूड, हाणामारी, खून असंच चित्र समोर येतं. पण काही वेबसीरिज अशा असतात ज्या आपण सहकुटुंब सहपरिवार एकत्र बघू शकतो. आजच्या लेखात आपण अशाच काही वेबसीरिजची माहिती घेणार आहोत.
१. कोटा फॅक्टरी (Kota Factory)
सहकुटूंब बघता येण्यासारख्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव आवर्जून घ्यायला हवं ते म्हणजे ‘कोटा फॅक्टरी’. ही वेबसीरिज TVF वर अगदी मोफत बघता येईल. तसंच ही वेबसीरिज युट्यूब आणि नेटफ्लिक्सवर देखील उपलब्ध आहे.
कोणतेही धक्कादायक ‘ट्विस्ट अँड टर्न्स’ नाहीत, एक साधं, सरळ, वास्तववादी कथानक ही या वेबसीरिंजची सर्वात जमेची बाजू. राजस्थानमधील कोटा शहरात ‘आयआयटी’च्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जेईई परीक्षेच्या कोचिंग क्लासमध्ये दाखल झालेला वैभव नावाच्या मुलाभोवती हे कथानक फिरतं. ही वेबसीरिज कोचिंग क्लास म्हणजे परीक्षेची फॅक्टरी, अभ्यासाचा दबाव, जीवघेणी स्पर्धा, तारुण्यातली स्वप्न, इच्छा आकांक्षा अशा अनेक मुद्द्यावर भाष्य करते. तसंच परिस्थिती नसताना मुलांच्या कोचिंग क्लाससाठी वारेमाप खर्च करणारे पालक आणि गोष्टीचा मुलांवर असणारा भावनिक दबाव सिरीजमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.
एकीकडे तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे इफेक्टस कलाकृती तयार होत असताना या सीरिजला ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात दाखवण्याचा निर्मात्यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. सीरिजचे एकूण ५ भाग आहेत आणि एकूण २ सिझन प्रदर्शित झाले आहेत. IMDB वर या सीरिजला ९.१ रेटिंग देण्यात आलं आहे.
२. स्कॅम १९९२ – द हर्षद मेहता स्टोरी (Scam 1992 – The Harshad Mehta Story)
ही सीरिज १९९२ साली झालेल्या शेअर मार्केट घोटाळ्यावर आधारित आहे. या घोटाळ्यामागचा मास्टरमाईंड खरंच हर्षद मेहता होता का, की त्याला यामध्ये गोवण्यात आलं होतं? यामध्ये बरीच मोठमोठी नावं सामील होती, पण नंतर त्याबद्दल पुढे काहीच ऐकिवात आलं नाही. हा घोटाळा नक्की काय होता? अशा अनेक प्रश्नाची उत्तरं ही सीरिज देते.
या सीरिजमध्ये नव्वदच्या दशकातील शेअर बाजार आणि तिथली कार्यपद्धती अनुभवता येते. तसंच शेअर बाजाराबद्दल शून्य माहिती असणाऱ्यांनाही ही सीरिज अगदी सहज समजेल. सीरिजमध्ये हर्षद मेहतांची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रतीक गांधी या सीरिजमुळे एका रात्रीत स्टार झाला. या सीरिजचे एकूण १० भाग असून, ही सीरिज सोनी LIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. IMDBवर या सीरिजला ९.३ रेटिंग देण्यात आलं आहे.
३. अस्परन्ट (Aspirants)
यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या अभिलाष, गौरी आणि एसके या तिघांची ही कहाणी आहे. तिघांची कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी वेगळी, विचार वेगळे, परिस्थिती वेगळी; पण तिघंही एकत्र येतात त्यांच्यात मैत्री होते. यूपीएससीची परीक्षा देताना येणाऱ्या अडचणी त्या दरम्यानची मानसिक स्थिती, स्पर्धा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. सीरिज बघताना कधी दिल चाहता है, कधी थ्री इडियट, तर कधी जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटांची आठवण येते. पण ही सीरिज या चित्रपटांवर अजिबातच आधारित नाही.
ही सीरिज TVF आणि युट्यूबवर अगदी ‘फ्री’मध्ये बघता येईल. सीरिजचे एकूण ५ भाग असून IMDBवर या सीरिजला ९.१ रेटिंग देण्यात आलं आहे.
४. बोस – डेड ऑर अलायू (Bose: Dead/Alive)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित असणारी ही वेबसीरिज ऐतिहासिक विषय असूनही कुठेही कंटाळवाणी होत नाही. सीरिज सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे सीरिजचं दिग्दर्शन हा आव्हानात्मक भाग होता. परंतु दिग्दर्शकाने अतिशय उत्तमरीत्या हे आव्हान पेललं आहे.
मुळात नेताजी बोस यांचं आयुष्य आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी रहस्यमय असल्यामुळे या विषयावर सीरिज तयार करणं हेच धाडसाचं काम होतं. पण ‘बोस’ ही वेबसीरिज सर्वच बाबतीत शंभर नंबरी सोनं ठरली आहे. राजकुमार राव या अभिनेत्याने साकारलेले नेताजी बोस निव्वळ अप्रतिम! सीरिजचे एकूण ९ भाग असून, ही सिरीज ALT Balaji या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. IMDBवर या सीरिजला ८.७ रेटिंग देण्यात आलं आहे.
========
हे देखील वाचा – आवर्जून पाहायलाच हवेत असे टॉप ५ मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट
========
५. गुल्लक (Gullak)
मध्यमवर्गीयांचं आयुष्य तसं साधं सरळ असतं. त्यांच्या आयुष्यात अकल्पित भव्य दिव्य असं काही सहसा घडत नाही. (आणि समजा घडलंच तर तो माणूस मध्यवर्गीय राहत नाही.) मध्यवर्गीय लोकांची स्वप्नही अगदी साधी असतात पण जेव्हा कुटुंबातली लोक भव्यदिव्य स्वप्न बघू लागतात, त्यांच्या आकांक्षा वाढतात तेव्हा नाराजी, निराशा अशा गोष्टी कुटुंबात शिरकाव करतात पण त्याचवेळी कुटुंबातील प्रेम आणि एकोपा दिसून येतो. गुलकमध्ये अशाच एका मध्यमवर्गीय ‘मिश्रा’ नावाच्या कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे.
वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये एकूण १५ भाग असून IMDB वर या सीरिजला ९.१ रेटिंग देण्यात आलं आहे. या वेबसीरिजचे एकूण तीन सीझन प्रदर्शित झाले असून तिन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ही वेबसीरिज सोनी LIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल.