‘झी मराठी’वरच्या या लोकप्रिय मालिकेची जागा घेणार ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका
‘तू तेव्हा तशी’ म्हणत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतायत. या मालिकेच्या निमित्ताने स्वप्नील तब्बल १० वर्षांनी झी मराठीवरील दैनंदिन मालिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो मुक्ता बर्वे हिच्यासोबत ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत दिसला होता. त्यानंतर मधल्या काळात त्यानं स्टार प्रवाहवरील मालिकेत त्याने काम केलं होतं आणि सध्या आपण त्याला ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पाहतोय. तर, शिल्पा तुळसकरने यापूर्वी झी मराठीवरीलच ‘तुला पाहते रे’ मालिकेत राजनंदीनीची मुख्य भूमिका साकारली होती.
स्वप्नील जोशी आणि प्रेमकथा यांचं नातं तसं जुनं आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर, अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहे. चाळीशी पार केलेल्या सौरभ – अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी आपल्याला ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी, तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी, अशी ही मालिका आहे, असं स्वप्नील म्हणाला.
मालिकेचा गाभा फार गंभीर नसून हलकी फुलकी प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा टीझर समोर आलाय. नव्याने प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये मालिका कधी सुरु होणार याबद्दल कोणताही खुलासा झालेला नाहीये. पण सुत्रांच्या माहितीनुसार झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे त्या मालिकेच्या जागी रात्री ८ वाजता स्वप्नील-शिल्पाची ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.
=====
हे देखील वाचा: सुख म्हणजे नक्की हेच असतं… कपिल होनराव सांगतोय आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी.
=====
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला आजवर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आलंय. अन्वीता आणि शालवाने साकारलेल्या स्वीटू आणि ओमची हटके लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर हल्लीच स्वीटू आणि ओमचं लग्न झालं होतं. त्यात सध्या शकुंतला मावशीच्या तब्येतीला घेऊन मालिकेत जरा तणाव सुरु आहे. अशात मालिका लवकरच निरोप घेणार म्हटल्यावर, पुढे मालिकेत काय होणार, स्वीटू-ओमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स संपणार का, मालविका आणखी काय काड्या करणार, मालिकेचा शेवट कसा होणार? याबद्दल उत्सुकता आहे.
दैनंदीन मालिका वाहिन्यांवर रात्री ८ ही वेळ ‘प्राईम टाइम’ समजली जाते. त्यामुळे प्रत्येक वाहिनी रात्री ८ वाजताची जागा त्यांच्या बेस्ट मालिकेसाठी ठेवते. स्वीटू आणि ओमला तर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, आता ‘तू तेव्हा तशी’ या नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येणारे सौरभ आणि अनामिका प्रेक्षकांना किती आवडतात हे पाहावं लागेल.
– वेदश्री ताम्हणे