Banjara Marathi Movie: सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला ‘बंजारा’!

“हेरा फेरी” ची हास्यस्फोटक पंचविशी
“हेरा फेरी” (Hera Pheri) म्हणताच चित्रपट रसिकांच्या एका पिढीला प्रकाश मेहरा दिग्दर्शित १९७६ सालचा मसालेदार मनोरंजक चित्रपट पटकन आठवतोच. अमिताभ बच्चन व विनोद खन्ना यांनी क्लबमध्ये तीन पत्ते खेळात चलाखीने, लबाडीने असरानीला घातलेला गंडा आणि त्यात दारु पिऊन आऊट झालेल्या राम सेठीचे पुन्हा पुन्हा क्लबमध्ये येणे हा मजेशीर प्रसंग आज यू ट्यूबवरही भरपूर व्ह्यूज आणि लाईक्स मिळवतोय. त्या काळात अनेक प्रसंग असे छान सविस्तर रंगवले जात. हा चित्रपट अतिशय धमाल होता. दिग्दर्शक मनमोहन देसाई एकदा मला एका मुलाखतीत म्हणाले, हेरा फेरी पाहूनच अमर अकबर ॲन्थनीमधील Amitabh Bachchan ला आपण विनोदी प्रसंग द्यावेत हे सुचले.

असो. या “हेरा फेरी” (Hera Pheri) ने मुंबईत मेन थिएटर इंपिरियलमध्ये रौप्य महोत्सवी यश संपादले. त्यानंतर याच नावाचा पण यातील कशाशीच संबंध नसलेला प्रियदर्शन दिग्दर्शित चित्रपट २००० साली पडद्यावर आला. नेमके सांगायचे तर, ३१ मार्च २००० रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पंचवीस वर्ष पूर्ण झालीदेखील. किती वेगाने काळ सरला.
प्रियदर्शन हा दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट दिग्दर्शक, पण हिंदीतही त्याने केवढी तरी विविधता व सातत्य कायम ठेवलय. हा hera pheri १९८९ चा मल्याळम भाषेतील चित्रपट “रामजी राव स्पीकिंग” वर बेतलेला. नीरज वोराने भरपूर पंचेस टाकत टाकत लिहिलेला. निर्माता फिरोझ नडियादवाला याने आपल्या अनेक चित्रपटातील आणखीन एक चित्रपट अशा पध्दतीनुसार या चित्रपटाची निर्मिती सुरु केली. (चित्रपट निर्मितीमागे अनेकांच्या अनेक गोष्टी असतात. चित्रपटसृष्टी अशाच अनेक गोष्टींसह वाटचाल करतेय.) हा चित्रपट निर्माण करायचे ठरले तेव्हा त्याचे नाव “रफ्तार” असे होते आणि महेश भट्ट दिग्दर्शन करणार असे ठरले होते. चित्रपटाच्या नावात बदल होत ते प्रियदर्शनकडे आले. (दक्षिणेकडीलच “थेवर मगन” या बहुचर्चित चित्रपटावरुन हिंदीत “विरासत” बनला तेव्हाही असेच घडले.)

चित्रपटात सुरुवातीस संजय दत्त होता. त्याच्या जागी सुनील शेट्टी आला. तसेच करिश्मा कपूरच्या जागी तब्बू आली. चित्रपट निर्मितीत असे अनेक अदलाबदल होतच असतात. त्याच्या बातम्या काही वर्षानंतर रंगतदार वाटतात. प्रियदर्शनची कामाची पद्धत ज्याचे काम आहे, त्यानेच सेटवर थांबायचे अन्यथा निघून जायचे अशी आणि तासनतास काम करीत अधिकाधिक चित्रीकरण करायचे. एकदा सेटवरच काही काळ एका बाजूस परेश रावल व अक्षयकुमार वृत्तपत्राच्या कागदावर झोपले, प्रियदर्शनने आपल्या चित्रपटात असे दृश्य रंगवून वापरले.
हिंदी चित्रपटात पहिल्यांदाच हमर गाडी या चित्रपटात दिसली. याला उंची निर्मिती मूल्ये म्हणायचं तर म्हणा. चित्रपटातील अक्षय कुमार व रंभा यांच्यावरचे मुझसे मिलती है एक लडकी रोजाना हे ट्रेलरमध्ये असलेले गाणे चित्रपटाची लांबी फारच वाढल्याने चित्रपटात ठेवले नाही. एकूण तीन तास एकेचाळीस मिनिटांचा चित्रपट तयार झाला याचे आश्चर्य वाटते. कारण प्रियदर्शन तसा फोकस्ड दिग्दर्शक. पण कधी चित्रपट बनता बनता नवीन कल्पना सुचतात. अनेक कलाकार असतील तर काहींना सांभाळून घेत घेत चित्रपट आकार घेत जातो. Akshay Kumar चा हा पहिला विनोदी चित्रपट मानला जातो. (Entertainment mix masala)

“खिलाडी” रुपापेक्षा वेगळा. तो राजूच्या भूमिकेत. सुनील शेट्टी श्याम तर परेश रावल बाबुराव गणपतराव आपटे अर्थात बाबू भय्या. या तिघांच्या शाब्दिक कोट्या जमल्या, रंगल्या. त्यासह तब्बू, असरानी, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, गुलशन ग्रोव्हर, रजाक खान, मुकेश खन्ना, सुलभा आर्य, काश्मिरा शहा असे अनेक कलाकार. खरी गंमत पहिल्या तिघांत. त्यातही परेश रावल फुल्ल फाॅर्मात. शब्दांवर हुकुमत असलेला कलाकार. कोणत्याही व्यक्तीरेखेत फिट्ट बसणारा. मेहनतीने स्वतःला छान घडवले.
“हेरा फेरी” (Hera Pheri) सुपरहिट म्हटल्यावर त्याचा सिक्वेल येणारच.
============
हे देखील वाचा : Dulhan Hum Le Jayenge चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण
============
तो २००६ साली “फिर हेरा फेरी” या नावाने आला. त्याच्या मढ येथील कॅप्टन बंगल्यातील चित्रीकरण चित्रपट वेळेस मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टींगसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी ही जमलेली त्रिमूर्ती पुन्हा एकदा. साहजिकच तेव्हा सुनील शेट्टीची मुलाखत घेताना “हेरा फेरी”चा (Hera Pheri) उल्लेख येणारच. आमचे एका गोष्टीवर एकमत झाले, कोणत्याही दृश्यापासून आणि कधीही “हेरा फेरी” पहावा, तीच धमाल तीच मनोरंजनाची हमी…
मी तर म्हणतो, अमिताभ व व्हीकेचाही “हेरा फेरी” कुठूनही पहावा. मस्त कलरफुल मनोरंजन… हिंदी चित्रपट म्हणजे काय तर एंटरटेंमेंट एंटरटेंमेंट एंटरटेंमेंट. ती “पैसा वसूल ” असायला हवी…