
तेजाब: चित्रीकरणादरम्यान ब्रेक घेऊन कलाकार रेस्टॉरंटमध्ये गेले आणि…
बॉलिवूड मधले काही चित्रपट हिट असले तरीही त्यातली गाणी मात्र त्याहीपेक्षा जास्त हिट झाली आहेत. यापैकीच एक चित्रपट म्हणजे तेजाब (Tezaab). तेजाब हा चित्रपट इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा ‘एक..दो..तीन’ या गाण्यामुळे जास्त ओळखला जातो. या चित्रपटातूनच आपल्या मराठमोळ्या माधुरीच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. डिंग….डाँग.. डिंग म्हणत ती अशी काही थिरकली की प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.
तेजाब हा तसं म्हटलं तर मसालापट होता. प्रेम, विरह, हाणामारी या साऱ्या गोष्टी यामध्ये होत्या. महेश देशमुख उर्फ मुन्ना आणि त्याची कॉलेजच्या दिवसातली प्रेयसी मोहिनी या दोघांची झालेली ताटातूट, महेश देशमुखचा मुन्ना होईपर्यंतचा आणि झाल्यानंतरचा प्रवास, मोहिनीचे स्वार्थी आणि मद्यपी वडील, मुन्ना – मोहिनीची प्रेमकहाणी यांच्या जोडीला एक ‘खतरनाक’ गुंड लोटिया पठाण असा सगळा मालमसाला या चित्रपटात आहे.
तेजाब मधलं एक, दो, तीन हे गाणं सुपरहिट झालं असलं तरीही यातलं, कह दो कि तुम.., सो गया ये जहाँ…, ही गाणीही कर्णमधुर होती आणि ती देखील तेव्हा लोकप्रिय झाली होती. एन चंद्रा दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, किरण कुमार, अनुपम खेर, चंकी पांडे, अन्नू कपूर, सुपर्णा आनंद, इ कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. तसंच या चित्रपटात ‘राम तेरी गंगा मैली’ फेम ‘मंदाकिनी’ ही अभिनेत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती.

१९८८ साली आलेला हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला एकूण ४ फिल्मफेअर पुरस्कार आणि १२ नॉमिनेशन्स मिळाली होती. ‘एक दो तीन’ गाण्यासाठी अलका याज्ञिकला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, तर सरोज खान यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी; तसंच अनिल कपूरला मुन्नाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि कमलेश पांडे याना सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
महेश आणि मोहिनीची कॉलेजच्या दिवसातली रोमँटिक प्रेमकहाणी, त्यानंतर झालेली ताटातूट, विरह, आयुष्याचा बदललेला ट्रॅक, मोहिनीच्या वडिलांचा कपटीपणा, लोटिया पठाणचा खुनशीपणा, अखेर चित्रपटाचं गोड गोड शेवट आणि या साऱ्याचा दरम्यान मधुर गाणी. बस! अजून काय हवं? चित्रपट तर मसालेदार आहेच. पण चित्रपटाच्या मेकिंगच्या कथाही तितक्याच भन्नाट आहेत. त्याबद्दलच थोडंसं (Unknown facts about Tezaab)
हॉटेलच्या लोकांना वाटलं कलाकारांना अपघात झालाय
‘सो गया ये जहाँ’ या गाण्यामध्ये सर्वजण जखमी अवस्थेत दाखवलेले आहेत. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांनी काहीवेळ ब्रेक घेतला आणि आणि ते मेकअप न काढता जवळच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांना बघून तेथील कर्मचार्यांना धक्का बसला. त्यांनी काळजीने त्यांना विचारले की, तुमचा अपघात झाला आहे का? (Unknown facts about Tezaab)

चित्रपटात अनुपम खेर राहत असलेला बंगला आज आहे किंग खानच्या मालकीचा
प्रसिद्ध वेबसाईट IMDB नुसार चित्रपटातील अनुपम खेर यांच्या मालकीचा बंगला सध्या किंग खानच्या म्हणजेच शाहरुख खानच्या मालकीचा आहे.
नाना पाटेकर साकारणार होते भूमिका
एन चंद्रा तेव्हा आमिर खान आणि नाना पाटेकर यांना घेऊन राजकारणावर आधारित ‘तेजाब’ नावाचा चित्रपट बनवणार होते. नाना पाटेकर यांनी काही दृश्यांसाठी चित्रीकरणही केलं होतं. परंतु नंतर एन चंद्रा यांनी तो चित्रपट रद्द केला. यानंतर अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्यासोबत नवीन कथानकासह नवीन चित्रपट सुरू केला. परंतु चित्रपटाचे शीर्षक ‘तेजाब’ असंच ठेवलं. लोटिया पठाणच्या भूमिकेसाठी नानांना साइन केलं होते. पण नंतर काही कारणांनी त्यांच्या जागी किरण कुमार यांची वर्णी लागली. (Unknown facts about Tezaab)
माधुरी नव्हती पहिली पसंती
नायिकेची भूमिका आधी मीनाक्षी शेषाद्रीला ऑफर करण्यात आली होती. परंतु तिने जास्त मानधन मागितल्यामुळे ही भूमिका माधुरीला मिळाली आणि माधुरीच्या करिअरची घोडदौड सुरु झाली.

बबनची भूमिका गोविंदाला ऑफर करण्यात आली होती
चित्रपटातील बबनची भूमिका आधी गोविंदाला ऑफर करण्यात आली होती. परंतु त्यावेळी तो इतर चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे त्याने नकार दिला आणि ती भूमिका चंकी पांडेला मिळाली.
=======
हे देखील वाचा – ‘या’ चित्रपटासाठी अनिल कपूरने केला आपल्या प्राणप्रिय ‘मिशांचा’ त्याग; पण तरीही…
=======
एका गाणं, तीन शहरं आणि १७ रात्री
‘सो गया ये जहाँ’ हे गाणं तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये १७ रात्रींमध्ये चित्रित करण्यात आलं होतं. (Unknown facts about Tezaab)
‘तेजाब’ हा अनेकांना ‘नॉस्टॅल्जीक’ करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईम आणि युट्यूबवर उपलब्ध असून IMDB वर या चित्रपटाला ६.९ रेटिंग देण्यात आलं आहे.