Sikandar : सलमानच्या चित्रपटाने ‘छावा’ला मागे टाकलं? काय आहे आकडेवारी?

अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’
रमेश सिप्प्पी यांचा ‘शोले’(१९७५) हा चित्रपट आज ‘कल्ट क्लासिक’ म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अजरामर झालेला आहे. या चित्रपटातील ‘गब्बर सिंग’ची भूमिका करणाऱ्या अमजद खानने पहिल्याच सिनेमात ‘जबरा’ भूमिका करून प्रमुख खलनायकांच्या यादीत मानाचे स्थान पटकावले.
अमजदची चित्रपट कारकीर्द तशी छोटीच. अवघ्या पंधरा वर्षांची! वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी १९९२ साली त्याचे निधन झाले. या काळात त्याने तब्बल सव्व्वाशेहून अधिक चित्रपटातून भूमिका केल्या. जेष्ठ सिने-दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्यांच्या ‘शतरंज के खिलाडी (१९७७)’ या चित्रपटात त्याला मोठी भूमिका दिली होती.
अमजद खान एक दिलदार व्यक्तीमत्व होते. अभिनेता प्राण प्रमाणेच पडद्यावरचा आणि पडद्यामागचा अमजद यात जमीन अस्मान एवढे अंतर होते. आज अमजदवर लिहिताना त्याच्या आयुष्यातील एका वेगळ्या पैलूवर लिहायचं आहे. हा किस्सा फारसा कुणाला माहिती नाही. त्या काळातील मिडियामध्ये आलेल्या बातम्यांवरूनच आपण या घटनेचा ‘अन्वयार्थ’ काढू शकतो. हा किस्सा आहे अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्या मैत्रीचा!

त्या काळात बॉलीवूडमध्ये या दोघांची ‘यारी’ खूप प्रसिद्ध होती. या दोघांनी दशकभरात एक डझनहून अधिक चित्रपटात एकत्र काम केले. रुपेरी पडद्यावर एकमेकांच्या विरोधात असलेले हे दोघे प्रत्यक्ष जीवनात मात्र एकमेकांचे जीवश्चकंठश्च मित्र होते. पण याच मैत्रीला दुर्दैवाने पुढे कुणाची तरी दृष्ट लागली. गैरसमज वाढत गेले आणि या मैत्रीचा करुण शेवट झाला. काय नेमकं घडलं? अशी कोणती गोष्ट घडली त्यामुळे या दोघांच्या मैत्रीमध्ये ‘इतके’ वितुष्ट आले? ‘यारी’ चक्क ‘बेईमानी’ मध्ये कशी परावर्तीत झाली? काय होती याची कारणं?
तत्पूर्वी, आपण अमजद खान या अभिनेत्याचा जीवनालेख थोडक्यात पाहूया. हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण युगातील लोकप्रिय कलावंत ‘जयंत’ यांचे चिरंजीव म्हणजे अमजद खान. आजच्या पिढीला कदाचित ‘जयंत’ आठवतही नसतील, पण तुम्ही जर राजेश खन्नाचा ‘दो रास्ते’ हा चित्रपट पाहिला असेल, तर त्यातील बलराज सहानीच्या मित्राची अप्रतिम भूमिका जयंत यांनी केली होती.
अमजद खान यांचे शालेय शिक्षण बांद्रा मुंबईच्या ‘सेंट आंड्र्यूज स्कूल’ मध्ये झाले. ‘आर डी नॅशनल कॉलेज’मधून त्यांनी पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांमध्ये ते जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून देखील आले होते.
के आसिफ यांची चित्रनिर्मिती अतिशय भव्य दिव्य दर्जेदार असायची, पण त्यांच्या लहरी स्वभावामुळे ती खूप संथ देखील चालायची. त्यामुळे हा चित्रपट निर्मिती अवस्थेतच तब्बल दहा वर्षे होता होता. १९७१ मध्ये दिग्दर्शक के असिफ यांचे निधन झाल्यानंतर अमजद खान यांनी अभिनयाच्या क्षेत्रात लक्ष द्यायला सुरुवात केली.
रुपेरी पडद्यावर त्यांनी ‘नाजनीन’ या १९५१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर ‘अब दिल्ली दूर नही’, ‘माया’ या चित्रपटात ते रुपेरी पडद्यावर दिसले. पुढे ख्यातनाम दिग्दर्शक के असिफ यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अमजदची ‘Love and God’ या चित्रपटात वर्णी लागली.
१९७३ सालच्या ‘हिंदुस्तान की कसम’ या चित्रपटापासून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम (सलीम-जावेद या जोडीपैकी एक) यांनी अमजद खान यांचे नाव रमेश सिप्पी यांना, त्यांच्या शोले चित्रपटासाठी सुचवले. अमजद खान यांच्यासाठी ही फार मोठी संधी होती आणि त्यांनी या संधीचे सोने केले. त्यांच्यासाठी ही भूमिका ‘लार्जर दान लाईफ’ ठरली. त्यानंतर त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास प्रशस्त झाला.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची मैत्री इथेच जमली. १९७७ हे वर्ष अमजद खानसाठी मोठं दुर्दैवी ठरलं. आपल्या कुटुंबीयांसमवेत गोव्याला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यात अमजद खान गंभीर जखमी झाले. नेमका त्याच वेळेला अमिताभ बच्चनच्या ‘द ग्रेट गॅम्बलर’ या चित्रपटाचे चित्रीकरण तिकडे चालू होती. अमजद खान यांच्या अपघाताची बातमी कळताच अमिताभ ताबडतोब शूटिंग सोडून तिकडे पोहोचला आणि पुढचे काही दिवस तो अमजद खान सोबत रुग्णालयातच राहीला.
आपल्या मित्राला त्याच्या आजारपणात अमिताभने हर तऱ्हेने मदत केली. त्याच्या ऑपरेशनच्या वेळी घरचा नातेवाईक म्हणून कागदपत्रावर सही केली. यानंतर त्यांची मैत्री आणखी गहिरी झाली. परवरीश, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, लावारिस, बरसात की एक रात, याराना, कालिया, देश प्रेमी, नास्तिक, महान असे एकाहून एक सरस चित्रपट दोघांनी दिले. यांची मैत्री लक्षात घेऊन दिग्दर्शक राकेश कुमार यांनी ‘याराना’ (१९८१) हा चित्रपट बनवला होता.
पुढे १९८२ साली बेंगलोरला मनमोहन देसाई यांच्या ‘कुली’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना, एका फाईट सीनमध्ये अमिताभ गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या आजारपणात अमजद खान ताबडतोब धावून तिथे गेला आणि कायम त्याच्या सोबत राहिला. त्यांची ही मैत्री अशीच बहरत असताना अनपेक्षितरीत्या त्यांच्या मैत्रीला कोणाची तरी नजर लागली आणि एकमेकांसाठी जीव देणारे दोघे मित्र पुढे एकमेकाला चक्क टाळू लागले.

हा किस्सा आहे १९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘चोर-पोलिस’ या चित्रपटाच्या वेळेचा. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अमजद खान यांनी केले. दिग्दर्शनातील हा त्यांचा प्रदर्शित झालेला पहिलाच चित्रपट. या चित्रपटात खरंतर अमिताभ बच्चन यांना नायक म्हणून घेण्याची इच्छा होती, पण त्याच्या व्यस्त शेड्युलमुळे शत्रुघ्न सिन्हा या चित्रपटात आले. हा चित्रपट पूर्ण झाला, पण ‘सेन्सॉर बोर्डा’मध्ये अडकला. चित्रपटात दाखवलेली पोलिसांची व्यक्तिरेखा मुंबई पोलिसांच्या इमेजला तडा जाणारी आहे, असा आक्षेप सेन्सॉर बोर्डाने घेतला. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांची मैत्री शिखरावर होती.
अमिताभ राजकारणात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले होते. अमजद खान यांनी अमिताभला आपला चित्रपट सेन्सॉर बोर्ड कडून पास करून घेण्याची विनंती केली. अमिताभची त्या काळातली लोकप्रियता आणि राजकीय वजन पाहता अमिताभला हे सहज शक्य आहे, असं अमजदला वाटणं स्वाभाविक होतं, पण घडलं नेमकं उलटं.
एक दिवस अमिताभ बच्चनने अमजद खानला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले आणि एक नियतकालिक त्याच्यासमोर ठेवले. त्या नियतकालिकात, “वादग्रस्त ‘चोर-पोलिस’ सिनेमा अमिताभ सेन्सॉर बोर्डाकडून पास करवून घेणार?” अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाले होते. या बातमीने आपल्या ‘भावी राजकीय इमेजला’ धक्का बसण्याची शक्यता आहे, अशी भीती अमिताभच्या जवळच्या मित्रांनी व्यक्त केली.
https://youtu.be/9dcBy2uXL7E (तेरे जैसा यार कहां)
अमिताभने देखील तो ‘फुकटचा आणि चुकीचा सल्ला’ ऐकून मदत करायला चक्क नकार दिला. अमजद खानला मात्र हे ऐकून धक्का बसला. कारण ही बातमी या दोघांव्यतिरिक्त कुणालाही माहिती नव्हती. मग बातमी मिडियात लिक कशी झाली?
अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ त्यावेळी चालूच होते. याचा या घटनेशी काही संबंध होता का? या सगळ्या प्रकारात नेमकं दोषी कोण होतं? या प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत, पण यामुळे अमजद खानला खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले.
अखेर काटछाट करून कसा बसा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून पास झाला आणि ३ जून १९८३ ला प्रदर्शित झाला. नेमका याच दिवशी राजेश खन्नाचा ‘सौतन’ देखील प्रदर्शित झाला होता. ‘सौतन’ हा चित्रपट धो धो चालला, पण ‘चोर-पोलिस’ मात्र फ्लॉप झाला. पुढे अमिताभ बच्चन राजकारणात गेला.

अमजद खानने यानंतर सर्व काही विसरून आपल्या ‘लंबाई चौडाइ’ या नव्या सिनेमात अमिताभला घेण्याचा विचार केला. तशी विनंती देखील त्याला केली, पण अमिताभने ती देखील अमान्य केली. अमजद खानने मग या चित्रपट निर्मितीचा विचार सोडून दिला. आजारपणाने त्याचे वजन प्रचंड वाढत चालले होते. यातूनच २७ जुलै १९९२ रोजी हृदय विकाराने त्याचे निधन झाले.
हे ही वाचा: एक असा संगीतकार ज्याच्यामुळे बिग बी बनले गायक!
पंचमच्या ‘पार्श्वगायना’चे अज्ञात पैलू
समज-गैरसमजातून दोस्तीला तडा गेला. अमिताभने त्याच्या ब्लॉग मध्ये याचा ओझरता उल्लेख ‘Very difficult time’ म्हणून केला. अमिताभला या प्रकरणाचा पश्चाताप झाला का नाही माहित नाही, पण ब्लॉग लिहिताना अमजदच्या मैत्रीबाबत त्याने चांगले भाष्य केले होते.