जुम्मा चुम्मा दे दे … चुम्मा या गाण्याची पहिली पसंती किमी काटकर नाही, तर ‘ही’ अभिनेत्री होती
सन १९९१ साली आलेला हम हा चित्रपट आठवतोय का? बाकी कोणाला आठवो न आठवो, पण 90’s मधल्या ‘किड्स’ना मात्र ‘हम’ आणि त्यामधलं आणि ‘जुम्मा चुम्मा दे दे.. ” हे गाणं नक्कीच आठवत असेल. उडत्या चालीचं हे गाणं त्यावेळेला ‘तुफान हिट’ झालं होतं.
किमी काटकर तशी काही टॉपची अभिनेत्री नव्हती. इंडस्ट्रीमधल्या गर्दीत ती कधी हरवून गेली हे कोणाला कळलं देखील नाही. तरीही इतर हरवलेल्या कलाकारांसारखी ती लोकांच्या विस्मृतीत गेली नाही. किमी आजही लोकांच्या स्मरणात आहे ते ‘जुम्मा चुम्मा दे दे या गाण्यामुळे.
या गाण्याने किमी काटकरला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. हे गाणं हीच तिची ओळख बनली. पण तुम्हाला माहिती आहे का, की किमी काटकर या गाण्यासाठी शेवटची निवड होती. जर सर्व गणितं बरोबर जुळून आली असती, या गाण्यात किमी काटकर नाही, तर श्रीदेवी दिसली असती.
मुळात हे गाणं हम चित्रपटासाठी नाही तर, दुसऱ्याच एका चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. या चित्रपटाचं चित्रीकरणही सुरु होतं. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी दोघेही प्रमुख भूमिकेत होते आणि गंमत म्हणजे यामध्ये दोघांचेही ‘डबल रोल’ होते. या चित्रपटाचं नाव होतं ‘राम कि सीता श्याम कि गीता’ आणि दिग्दर्शक होते रमेश शिप्पी. या चित्रपटासाठी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी ‘जुम्मा चुम्मा दे दे चुम्मा” हे गाणं तयार केलं होतं. परंतु, दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झाला नाही.
हे कळल्यावर हा चित्रपट पूर्ण न झाल्याची रुखरुख अनेकांना वाटत असेल. कारण अमिताभ आणि श्रीदेवी दुहेरी भूमिकेत आणि त्यातही ‘जुम्मा चुम्मा दे दे…’ या गाण्यात अमिताभ आणि श्रीदेवीला बघणं हा एक सुखद अनुभव ठरला असता. पण असो. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
त्यावेळी दिग्दर्शक मुकुल आनंद ‘अग्निपथ’ हा चित्रपट बनवत होते. अमिताभ बच्चन आणि मिथुन असे त्या काळातले दोन आघाडीचे नायक यामध्ये एकत्र काम करत होते. हा चित्रपट मल्टीस्टारकास्ट चित्रपट होता. मुकुल आनंद यांना या चित्रपटामध्ये कोणतीही उणीव ठेवायची नव्हती. याच दरम्यान ‘जुम्मा चुम्मा दे दे चुम्मा’ हे गाणं या चित्रपटात समाविष्ट करावं ही कल्पना त्यांना सुचली.
आपल्या कल्पनेला आकार देण्यासाठी मुकुल आनंद यांनी रमेश सिप्पी यांना या गाण्यासाठी विनंती केली. रमेश सिप्पी यांनी होकार दिल्यावर मुकुल आनंदनी अमिताभ आणि अर्चना पुरणसिंग या जोडीवर हे गाणं चित्रित करायचं ठरवलं. परंतु, अचानक त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. याचं कारण होतं अमिताभ.
====
हे देखील वाचा: हा अभिनेता करीत असे स्वतःच्याच चित्रपटांची तिकीट विक्री!
====
‘अग्निपथ’ या चित्रपटात अमिताभ बच्चन ‘विजय दीनानानाथ चौहान’ ही भूमिका साकारत होते. अमिताभच्या भूमिकेचा विचार करता मुकुल आनंद यांना वाटलं की, या ‘विजय दीनानानाथ चौहान’ या व्यक्तीरेखेसाठी हे गाणं योग्य ठरणार नाही.
कारण ही व्यक्तिरेखा तशी धीरगंभीतर स्वरूपाची व्यक्तरेखा होती. या व्यक्तिरेखेच्या तोंडी “जुम्मा चुम्मा…” सारखं गाणं अगदीच ‘मिसमॅच’ वाटेल. त्यामुळे मग विजय आनंद यांनी हे गाणं अग्निपथमध्ये घेतलं नाही.
अग्निपथनंतर पुढच्याच वर्षी त्यांनी हम हा चित्रपट बनवला. यावेळी मात्र त्यांनी या चित्रपटामध्ये हे गाणं आवर्जून घेतलं. अखेर हे गाणं अमिताभ बच्चन आणि किमी काटकर या दोघांवर चित्रित करण्यात आलं. हम चित्रपटाच्या यशामध्ये या गाण्याचाही मोठा वाटा आहे.
तसं बघायला गेलं तर, नियतीने “जुम्मा चुम्मा दे दे…” हे गाणं सुरुवातीपासून अमिताभवर चित्रित होणार हे निश्चित केलं होतं. म्हणूनच तर चित्रपट बदलले तरी त्या प्रत्येक चित्रपटाचा नायक एकच होता, पण नायिका मात्र प्रत्येकवेळी बदलत गेल्या. ना श्रीदेवी, ना अर्चना पुरणसिंग, दिग्दर्शक काहीही ठरवूदेत, पण या गाण्याला प्रतीक्षा होती ती किमी काटकरची! बाकी काहीही म्हणा पण किमी काटकरने देखील या गाण्याला पूर्ण न्याय दिला. हे नाकारून चालणार नाही.