ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
तो चित्रपट स्वीकारला असता, तर अक्षयसमोर मोकळेपणाने वावरूच शकले नसते….
अक्षय कुमार! बॉलिवूडमध्ये ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay kumar) आजही पूर्वीइतकाच लोकप्रिय आहे. साधारणतः १९९० नंतर जवळपास दीड दशक बॉलिवूडवर शाहरुख, सलमान आणि आमिर या तीन खानांनी राज्य केलं. परंतु या खानांच्या राज्यांमध्येही अक्षयने आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अक्षय कुमार ॲक्शन आणि अफेअर्स या दोन गोष्टींमध्ये जास्त चर्चेत होता. तो बॉलिवूडमध्ये आला तेव्हाच त्याच्या आणि पूजा बत्राच्या अफेअर्सची चर्चा रंगली. पुढे खिलाडी चित्रपटाच्या यशानंतर त्याची आणि आयेशाची ऑनस्क्रीन जोडी जमली आणि सोबतच या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चाही रंगू लागल्या. पण अचानक आयेशा आणि अरमान कोहलीच्या अफेअर्सच्या बातम्या येऊ लागल्या आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्याच दरम्यान त्याचा रविना टंडन सोबत ‘मोहरा’ सुपरहिट ठरला होता. या दोघांच्या अफेअर्सची केवळ चर्चाच झाली नाही तर गोष्ट अगदी लग्नापर्यंत पोहोचली होती. या दोघांनी मंदिरात लग्न केल्याची अफवाही त्यावेळी उठली होती.
रवीनाने तर उघड उघड त्यांचं नातं मान्य केलं होतं. इतकंच नाही तर, ज्या दिवशी ‘मोहरा’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं त्या दिवशी अक्षयने (Akshay kumar) तिला लग्न करण्याचे वचन दिल्याचंही तिने ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. परंतु नंतर मात्र हे नातं संपुष्टात आलं. ‘खिलाडीओं का खिलाडी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि रेखामध्ये निर्माण झालेली जवळीक रविनाला खटकत होती. मीडियामध्येही अक्षय-रेखाच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अर्थात, या चर्चा कितपत खऱ्या होत्या याबद्दल शंकाच होती. पण यामुळे रवीना अक्षयपासून दुरावली आणि एकाकी अक्षयला सावरलं ते त्यांच्या नवीन मैत्रीणने, म्हणजेच शिल्पा शेट्टी हिने!
रविनानंतर अक्षयचं (Akshay kumar) नाव रेखा आणि शिल्पा शेट्टी या दोघींशी जोडलं गेलं. अक्षय आणि शिल्पाचं अफेअर बराच काळ चालू होतं. परंतु नंतर इंटरनॅशनल खिलाडी चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि ट्विंकल खन्ना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. दोघं एकमेकांच्या जवळ आले. अक्षय ट्विंकलच्या प्रेमात पडला. यानंतर त्याचं शिल्पा शेट्टीशी असलेलं नातं संपुष्टात आलं. शिल्पाला या गोष्टीमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्या दरम्यानच्या कित्येक मुलाखतींमध्ये शिल्पाने अक्षयबद्दल उघउघड नाराजी व्यक्त केली होती.
अक्षय आणि ट्विंकलच्या बहरणाऱ्या नात्यामुळे डिंपल मात्र चिंतेत पडली. डिंपलचा स्वतःचा संसार कधी बहरला नाही. कदाचित त्यामुळेच अक्षय आणि ट्विंकलच्या नात्याच्या वेळी ती जास्त गंभीर झाली. अक्षयची एवढी अफेअर्स झाली होती की, तिला या नात्याबद्दल शाश्वती वाटत नव्हती. अखेर डिंपलने अक्षयला भेटून त्याची कानउघडणी केली. अक्षय त्याच्या आणि ट्विंकलच्या नात्याचा गंभीरपणे विचार करतोय, हे जाणवल्यावर डिंपलने त्याचं आणि ट्विंकलचं लग्न ठरवून टाकलं. अक्षय ट्विंकलच्या बाबतीत खरोखरच ‘सिरिअस’ होता. अखेर १७ जानेवारी २००१ रोजी दोघेही विवाहबंधात अडकले. आज २० वर्षांनंतरही दोघांचा संसार सुरळीत चालू आहे. आरव आणि नितारा या दोन मुलांसह सुखाने आयुष्य जगत आहेत.
अक्षय (Akshay kumar) आणि ट्विंकलचा सुखी संसार पाहून डिंपलही आता चिंतामुक्त झाली आहे. पण एक गोष्ट मात्र डिंपल आवर्जून सांगते, ती म्हणजे एका चित्रपटाला दिलेल्या नकाराची. या नकारामुळेच ती आणि अक्षय एकमेकांसमोर बिनधास्तवावरू शकतात. हा चित्रपट होता खिलाडीओं का खिलाडी.
‘खिलाडीओं का खिलाडी’ या चित्रपटातील रेखाची भूमिका आधी डिंपलला ऑफर करण्यात आली होती. मात्र त्यावेळी डिंपलने नुकतंच रुदालीचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. रुदालीमधील तिच्या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे तिला एका ब्रेकची गरज होती. याच कारणासाठी तिने ‘खिलाडीओं का खिलाडी’ हा चित्रपट नाकारला.
==========
हे देखील वाचा – सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण…
==========
‘खिलाडीओं का खिलाडी’ या चित्रपटात अक्षय (Akshay kumar) आणि रेखाची काही ‘इंटिमेट’ दृश्य आहेत. जर डिंपलने ही भूमिका स्वीकारली असती तर, या दृश्यांमध्ये रेखाऐवजी डिंपल दिसली असती. आज अक्षय तिचा जावई आहे. जर हा चित्रपट डिंपलने स्वीकारला असता, तर आयुष्यभर तिच्या मनाला त्या दृश्यांमुळे टोचणी लागून राहिली असती. परंतु तिने या चित्रपटाला नकार दिल्यामुळे आज ती आणि अक्षय एकमेकांसमोर अगदी सहज वावरू शकतात. बॉलिवूड कितीही मॉडर्न असलं तरीही काही नात्यांच्या बाबतीतल्या मर्यादा इथेही पाळल्या जातात. त्यामुळेच कदाचित तिथले काही संसार व्यवस्थित टिकून राहतात.