दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
असं काय घडलं की, जया भादुरीला दुसऱ्या नायिकांसाठी डबिंग करावं लागलं
सत्तर आणि ऐशीच्या दशकातील व्यावसायिक हिंदी सिनेमात बऱ्याचदा अतार्किक, न पटणाऱ्या अशा गोष्टींचा बोलबाला असायचा. काहीतरी चमत्कारीक, अवैज्ञानिक आणि केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नसते उपद्व्याप करण्याची चढाओढच धंदेवाईक, मसाला सिनेमांमध्ये लागलेली होती. यामुळे हिंदी सिनेमा पहायचा तर डोके बाजूला ठेवून पहा, असं म्हणण्याची पद्धत सुरु झाली. मनोरंजनाच्या नावाखाली काहीच्या काही खपवण्याची जणू स्पर्धाच लागली होती. पण अशाही वातावरणात काही अभिनव प्रयोग केल्याचं लक्षात येतं. (Jaya Bhaduri)
हे चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या जरी चालले नसले तरी त्यांच्यातील या प्रयोगाचं कौतुक करायला हवं. कौतुक यासाठी कुणीतरी ‘मिनिंगफुल एक्सपेरिमेंट’ केला असेल, तर त्याची दखल घ्यायला हवी. आज तांत्रिकदृष्टीने सिनेमा बहरला आहे, पण ही परिस्थिती तीस चाळीस वर्षांपूर्वी नव्हती. त्यामुळे ‘लॉजिकल थिंकिंग’ करून त्याचा वापर सिनेमात झाला याची दखल घ्यायला हवी. (Jaya Bhaduri)
१९८२ साली रमेश बहल यांनी ‘ये वादा रहा’ हा चित्रपट बनविला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश बहल यांचे सहाय्यक कपिल कपूर यांनी केले होते. हा सिनेमा डॅनियल स्टील्स यांच्या ‘द प्रॉमिस’ या कादंबरीवर आधारित होता. याच कथानकावरील याच नावाचा एक अमेरिकन चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. ‘ये वादा रहा’ या सिनेमाचे कथानकातील ट्विस्ट भारतीय सिनेमा प्रेक्षकांसाठी नवीन होता. (Jaya Bhaduri)
या सिनेमातील नायिका एका मोठ्या अपघातात जायबंदी होते. तिचा चेहरा जखमांनी भरून जातो. नंतर तिच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाते. प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर तिच्या चेहऱ्यात आमूलाग्र बदल होतो. त्यामुळे या सिनेमात अपघातानंतरची नायिका बदलली गेली. या सिनेमाचा नायक ऋषी कपूर असतो. त्याचं पूनम धिल्लनवर प्रेम असतं. पुनम एका अपघातात जखमी होते. प्लास्टिक सर्जन (शम्मी कपूर) तिच्यावर शस्त्रक्रिया करतात. तिचे प्राण तर वाचतातच पण तिच्या चेहऱ्याला नवं रंग रुप मिळतं. चित्रपटात अपघातानंतर मेक ओव्हर झालेली अभिनेत्री रंगवली आहे टीना मुनीम या अभिनेत्रीने. त्यामुळे रुपेरी पडद्यावर एकाच चित्रपटात एकच व्यक्तिरेखा दोन विभिन्न अभिनेत्रींनी साकारली. (Jaya Bhaduri)
====
हे देखील वाचा – ..तर बिग बी दिसले असते ‘खलनायक’!
====
चित्रपट तयार झाला त्याचा प्रीव्ह्यू देखील झाला. त्यावेळी एक गोष्ट खटकली. प्लास्टिक सर्जरीनंतर चेहऱ्यामध्ये बदल होतो ही गोष्ट प्रेक्षकांच्या पचनी पडू शकते. परंतु त्या कॅरेक्टरचा आवाज कसा काय बदलतो? हा प्रश्न प्रेक्षक विचारू शकतात. कारण अभिनेत्री पूनम धिल्लन आणि टीना मुनीम यांची संवादाची शैली आणि आवाज ‘टोटली डिफरंट’ होता. मुद्दा बरोबर होता.
इथे लॉजिकली विचार करण्यात आला. यावर उपाय काय ? याची चर्चा सुरू झाली. आणि त्यातून एक उपाय असा निघाला की, चित्रपटात पूनम धिल्लन आणि टीना मुनीम या दोघींसाठी एक तिसरी अभिनेत्री डबिंग करेल. म्हणजे चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींचा आवाज सारखाच राहील. तिसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू झाला.
बहल आणि बच्चन परिवाराचे चांगले संबंध होते. त्यांनी जया भादुरीला याबाबत विचारलं. जयाने आनंदाने हे काम स्वीकारलं आणि या चित्रपटातील दोन्ही अभिनेत्रींना तिने स्वतःचा आवाज दिला. म्हणजेच तिच्या आवाजात डबिंग करण्यात आलं. हा प्रकार भारतीय सिनेमासाठी सर्वस्वी नवीन होता.(Jaya Bhaduri)
अर्थात एवढे सायास करूनही या चित्रपटाला फारसं यश मिळाले नाही. परंतु आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आणि अलीकडच्या रिमिक्सच्या काळात प्रचंड गाजली. यातील ‘तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा’ हे टायटल सॉंग तर प्रचंड गाजलं. त्याचप्रमाणे ‘इश्क मेरा बंदगी है’ हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालं होतं. जया भादुरीने त्यानंतर (स्मिता पाटीलच्या अकाली निधनानंतर) ‘वारीस’ या सिनेमात स्मिता पाटील करिता तर, ‘आखरी रास्ता’ या सिनेमात श्रीदेवी करिता डबिंग केलं होतं. ‘ये वादा रहा’ हा सिनेमा यु ट्यूब वर उपलब्ध आहे.