जेव्हा सचिन देव बर्मन यांना तिकीट चेकरने पकडले…
कलाकारांच्या लहानपणीच्या लीला ऐकून खूप गंमत वाटते. असाच एक किस्सा संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या बाबतीतला आहे. संगीतकार सचिन देव बर्मन मोठ्या राजघराण्यात जन्माला आले. ते राजपुत्रच होते. त्रिपुरा राजघराण्यामध्ये १ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचा जन्म झाला. आज बांगला देशमध्ये असलेल्या कोमिला इथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे तिथेच त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. (Untold story of S. D. Burman)
राजघराण्यात जरी जन्मले असले तरी त्यांचे मित्रमंडळ सामान्य कुटुंबातील होते. या मित्रांसोबत त्यांची धमाल – मस्ती चालू असायची. त्यावेळी सचिन देव बर्मन यांचे वय चौदा पंधरा वर्षे असेल. एकदा सर्व मित्र रेल्वेने पिकनिकला गेले होते. मौज मजा मस्ती करून संध्याकाळी ते आपल्या घरी परत यायला निघाले. तरुण वय होतं. वयानुसार आलेली बेफिकिरी, मस्ती आणि बंडखोरीही अंगात होती. सगळ्यांनी मिळून रेल्वेने विना तिकीट प्रवास करायचा ठरलं.
कोमिला या स्टेशनवर उतरल्यानंतर मात्र समोर तिकीट चेकर उभा होता. सचिनदा आणि त्यांच्या मित्रांनी तिकीट काढले नव्हते त्यामुळे त्या तिकीटचेकरने त्यांना सर्वांना पकडले. दंडाचे पैसे भरण्याइतपत रक्कम कुणाकडेच नव्हती. स्टेशन मास्टरने स्टेशनवरील लॉकअपमध्ये त्यांना बंदिस्त केले. सर्व मित्र घाबरून गेले होते. घरी काय सांगायचे? तिकीट न काढता प्रवास केलाच कसा? असे नाना प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. रात्र होत होती. पोटाला भूक लागली होती. काय करणार? चूक तर झालीच होती. उद्या पोलीस कोर्टात हजर करणार ही एक भीती होतीच. (Untold story of S. D. Burman)
जेवण न करता काही जण झोपी गेले. पण सचिनदा यांना मात्र काही झोप येत नव्हती. आपल्या चुकीचा त्यांना पश्चाताप होत होता. ते बेचैन झाले. कोवळे संस्कारित वय. झोप येत नव्हती. अपराधीपणाची भावना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या बेचैनीत त्यांनी ईश्वराची आराधना करायला सुरुवात केली. रात्री दोन वाजता त्यांनी एक बंगाली भजन गायला सुरुवात केली. भटियाली शैलीतील हे भजन अतिशय सुरीले आणि कर्णमधुर होते. स्टेशनच्या मागेच स्टेशन मास्टरचे क्वार्टर होते.
स्टेशन मास्टरच्या बहिणीला हे सुरीले भजन ऐकून जाग आली. तिने आपल्या भावाला उठवले. हे सुंदर भजन मध्यरात्री कोण गात आहे याचा ते शोध घेऊ लागले आणि शोध घेता घेता ते लॉकअपपर्यंत येऊन पोहोचले. तिथे सचिन दा डोळे मिटून तल्लीन होऊन भजन गात होते. या दोघांना ते भजन कमालीचे आवडले. स्टेशन मास्टरने लॉकअपचे कुलूप उघडले आणि सचिनदाला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते म्हणाले “उभ्या आयुष्यात मी इतकं सुरीलं भजन ऐकलं नाही!” (Untold story of S. D. Burman)
===========
हे देखील वाचा – ‘या’ कारणासाठी किरण रावने आमिर खानला चक्क तीन आठवडे ठेवले कोंडून
===========
स्टेशन मास्टरनी सचिनदांच्या सर्व मित्रांना उठवलं आणि सचिनदांसह ते आपल्या घरी घेऊन गेले. त्यांच्यासाठी मध्यरात्री स्वयंपाक बनवला गेला. सर्वजण जेवण करून झोपी गेले आणि पहाटे मोठ्या सन्मानाने त्यांना घरी पाठवायची व्यवस्था केली. तर, असा हा सचिनदांचा आगळा वेगळा किस्सा. (S. D. Burman)