‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा प्राण असलेला अभिनेता!
प्राण म्हटलं की रसिकांच्या एका पिढीला छद्मी हास्य, विखारी नजर, कट कारस्थान करणारा, नायक नायिकेच्या प्रेमात बिब्बा घालणारा कपटी व्हीलन आठवतो. प्राण आणि खलनायकी यांचे नाते इतके घट्ट होते की, एकदा आपल्या मित्राच्या लग्नासाठी दिल्लीला गेला असता अनेक स्त्रिया त्यांना बघून किंचाळल्या असे किस्से प्रसिद्ध आहेत. मनोजकुमार दिग्दर्शित ‘उपकार’ (१९६७) मधील मलंग चाचा आजही अनेकांच्या लक्षात आहे. प्राणची व्हीलनगिरी अतिशय गडद झाली असतानाच्या काळात मनोजकुमारने प्राणला सकारात्मक भूमिका दिली आणि त्याच्या करियरने नवीन वळण घेतले. व्हीलन म्हणून अनेक प्रकारच्या, व्यक्तिरेखा साकारलेल्या प्राणने, आपल्या गेटअपचे वैशिष्ट्य मात्र कायम ठेवून अगणित चरित्र भूमिका साकारल्या.
प्राण म्हटलं की माझ्या पिढीला वेगळीच आठवण येते. ब्रीज दिग्दर्शित ‘व्हीक्टोरिया नंबर २०३ (१९७२) (Victoria No. 203) रिलीज झाला तेव्हा अशोककुमार, नवीन निश्चल, सायरा बानू आणि प्राण अशा पध्दतीने वृत्तपत्रात जाहिरात येई. पिक्चरचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून बाहेर पडलेल्या पब्लिककडून राजा (अशोककुमार) आणि राणा (प्राण) यांच्या धमाल अभिनयाची आणि दोघांनी पडदाभर रंगवलेल्या ‘दो बेचारे बिना सहारे देखो पुछ पुछ कर हारे….’ या गाण्याची अशी काही बेहद्द तारीफ केली की जाहिरातीत अशोककुमार, प्राण, नवीन निश्चल, सायरा बानू अशा क्रमाने नावे येऊ लागली आणि लगोलग सिनेमाची नवीन पोस्टर्स छापली जाऊन त्यावर अशोककुमार आणि प्राण यांचे फोटो मोठे दाखवले गेले.
एखाद्या कलाकाराचे यश असेही असते. हेच चांद दिग्दर्शित ‘धर्मा’ (१९७३) रिलीज होतानाही झाले. नवीन निश्चल, रेखा, बिंदू आणि प्राण (Pran)अशा क्रमाने वृत्तपत्रातील जाहिरातीत नावे आली आणि पिक्चरमध्ये प्राण आणि बिंदू यांच्यावरील ‘राज की बात कह दूं तो… ‘ या कव्वालीच्या वेळी पब्लिकने पडद्यावर पैसे उडवले, तेव्हा लगोलग जाहिरातीत प्राणचे नाव पहिले आले, इतकेच नाही तर ‘पोस्टरभर प्राण’ आला. कलाकाराच्या यशाचे हे परिमाण आहे आणि इतकेच नव्हे तर महत्त्वाचा परिणामही आहे. असं असलं तरी ‘…… आणि प्राण’ हे कायमस्वरुपी विशेष राहिलयं. त्याच्या खलनायकीच्या काळात आणि अगदी चरित्र भूमिकांच्या वाटचालीतही खूप सन्मानाने म्हटले गेले ‘…..आणि प्राण’. त्या काळातील, प्रसिद्ध चित्रपट प्रसिध्दी प्रमुख बनी रुबेन यांनी आपल्या प्राणवरील पुस्तकाला नावही दिले ‘….आणि प्राण!’
हे देखील वाचा: पाकिजा सिनेमा आणि प्राण ह्यांचे माहीत नसलेले कनेक्शन…
प्रत्येक कलाकाराचा एक वीकपॉईंट असतोच. तसाच प्राणचाही होता. प्राणने सातत्याने विविध गेटअपमध्ये भूमिका साकारल्या. अशाच एखाद्या गेटअपमध्ये ते सेटवर आले की त्यांच्या बाजूने जातांना अथवा त्यांच्या बाजूला आपण बसलो असतांना, सुरुवातीला आपण त्यांना ओळखले नाही असे दाखवायचे आणि मग थोड्या वेळाने त्यांना आपण म्हणायचे, ‘प्राणसाब आप? हमने आपको बिल्कुल पहचाना नहीं…..’ यावर प्राण खुश होत. म्हणजे आपण केलेला गेटअप इतका चांगला आहे, की त्यात आपल्याला पटकन कोणी ओळखलं नाही या भावनेने ते सुखावत असत. सदाशिव अमरापूरकर यांनी एकदा गप्पांच्या ओघात ही गोष्ट मला सांगितली होती.
प्राण किशन सिकंद ऊर्फ ’प्राण’ हे खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा प्राण होते. दमदार आवाज, विविधरंगी भूमिका, कमालीची क्षमता आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूड गाजवले. आपले अस्तित्व निर्माण करुन ते टिकवले. आपला प्रचंड चाहतावर्गही निर्माण केला. पण हा एकमेव असा लोकप्रिय कलाकार आहे की, कधीही कोणीच आपल्या मुलाचे नाव ‘प्राण’ असे ठेवले नाही. खलनायक म्हणून त्यांनी वेगळा दबदबा निर्माण केल्याचा तो परिणाम होता. म्हटले तर हेदेखील यशच!
प्राण यांचे वडील, लाला केवल कृष्णन सिकंद हे सरकारी सेवेत होते. कामामुळे वडिलांची सतत बदली होत असल्याने प्राण यांचे शिक्षण कपूरथळा, उन्नाव, मेरठ, डेहराडून आणि रामपूर या शहरांमध्ये झाले. हा अखंड भारताचा काळ होता. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर प्राण हे मुंबईत स्थायिक झाले. प्राण नशिबानेच चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी लाहोरमध्ये फोटोग्राफर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९४० साली त्यांचे नशीब पालटले. प्राण यांनी बॉलीवूड मध्ये ७० हून अधिक वर्षे काम करून ४०० हून अधिक चित्रपटांत विविधरंगी, विविधस्पर्शी भूमिका साकारल्या. सुरुवात मात्र नायक म्हणून झाली आणी तीदेखिल नूरजहान यांच्या बरोबर ‘खानदान’ (१९४२) चित्रपटातून!
प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या तब्बल १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या (त्या काळात चित्रपट निर्मितीची संख्या खूपच कमी असताना एवढ्या चित्रपटात संधी मिळाली हे विशेष कौतुकाचे आहे) त्यांना “यमला जट’ या पंजाबी सिनेमातही अभिनय करण्याची संधी मिळाली. अशा बहुपेडी प्राणला उपकार, आँसू बन गये फूल, बेईमान या चित्रपटांमधील उत्कृष्ट भूमिकांबद्दल फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
प्राणच्या उल्लेखनीय चित्रपटांची फक्त नावे सांगायची तरी भली मोठी सूची होईल. मधुमती, जिस देश मे गंगा बहती है, आह, खानदान, जब प्यार किसीसे होता है, मर्यादा, चोरी चोरी, कश्मिर की कली, बेवकूफ, साधु और शैतान, दुनिया, जाॅनी मेरा नाम, पूरब और पश्चिम, ये गुलिस्ता हमारा, जंजीर, बाॅबी, चोरी मेरा काम, जंगल मे मंगल, संन्याशी, वाॅरंट, अमर अकबर अँथनी, देस परदेस, कर्ज, डॉन या चित्रपटांमध्ये त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. मोठ्या प्रमाणावर चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि क्षमता हे प्राणचे वैशिष्ट्य होय.
व्हीक्टोरिया नंबर २०३ जबरदस्त हिट झाल्यावर (मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हात मॅटीनी शोला तब्बल साठ आठवड्यांचा मुक्काम) अशोककुमार आणि प्राण या जोडीला ‘हीरोगिरी’ देतच ‘राजा और राणा’ या चित्रपटाची निर्मिती झाली. प्राणवर चित्रीत झालेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी (जंजीर), हम बोलेगा तो बोलेगे के बोलता है (कसौटी), मायकेल दारु पीके दंगा करता है (मजबूर) वगैरे…. प्रत्यक्ष आयुष्यात प्राण अतिशय सज्जन माणूस असल्याचा अनुभव मी घेतलाय. मेहुलकुमार दिग्दर्शित ‘मृत्यूदाता’च्या सेटवर प्राणच्या दीर्घ मुलाखतीचा आलेला योग केवढा तरी सुखद. प्राणकडे सांगण्यासाठी बरेच काही आहे हे मला जाणवलं. आणि ते करताना त्यांनी कसलाही आविर्भाव वगैरे दाखवला नाही.
हे नक्की वाचा: नर्गीसची रेडिओवर मुलाखत घेताना सुनीलदत्त घाबरला होता!
पडद्यावरच्या आयुष्यापेक्षा आणि चित्रपटसृष्टीच्या ग्लॅमरस क्षेत्रापेक्षा आपण प्रत्यक्षात वेगळे असल्याचे भान प्राणकडे होते. त्याने निर्माण केलेल्या आणि त्यांचा पुत्र सुनील आनंदने दिग्दर्शिलेल्या ‘लक्ष्मण रेखा’च्या सेटवर प्राणने मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना आवर्जून शूटिंग रिपोर्टीगसाठी बोलावले. तेव्हा सेटवर नसिरुद्दीन शहा, जॅकी श्राॅफ, शिल्पा शिरोडकर होते. प्राणने आमची अतिशय उत्तम मेहमाननवाझी केली. आणि तेही अतिशय आपलेपणाने!
प्राणची रुपेरी कारकिर्द खूपच मोठी, पण आपल्या वागण्यात/विचारात तो ते कुठेही येऊ देत नसे. प्राणला फोटोग्राफी आणि अभिनयाबरोबरच खेळातही विशेष आवड होती. त्यांनी अनेक क्रिकेटपटूंना सढळ हस्ते आर्थिक मदत केली. चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी त्यांनी अनेक चित्रपट स्टार्सना एकत्र आणून क्रिकेटचा मदतनिधी सामनाही आयोजित केला होता. त्यांना फुटबॉलचीही आवड असल्याने त्यांनी एक फुटबॉल क्लबही स्थापन केला होता.
….आणि प्राण हा वेगळा अवलिया होता. त्याच्या भेटीचे काही योग मलाही आल्याने मी सुखावलोय. महत्वाचे म्हणजे, आज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्राणचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होत आहे.