‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची कारकीर्द
ऋषि कपूरच्या (Rishi Kapoor) (३० एप्रिल २०२०) निधनाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच राजीव कपूरचे (Rajiv Kapoor) काल ९ फेब्रुवारी रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शोमन राज कपूरच्या तीन मुलांपैकी सर्वात मोठा रणधीर (डब्बू), मधला ऋषि (चिंटू) आणि सर्वात धाकटा राजीव (चिंपू). पहिले दोघे कपूर खानदानाच्या परंपरेप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात आले तसाच राजीव कपूरही आला. त्याचा पहिला चित्रपट राजीव मेहरा (Rajiv Mehra) दिग्दर्शित ईगल फिल्मचा ‘एक जान है हम’ (१९८३). त्यात त्याची नायिका होती, दिव्या राणा. पण कपूर सन्स चित्रपटसृष्टीत प्रवेश करतोय म्हणून या चित्रपटाच्या पब्लिसिटीचा सगळा फोकस राजीव कपूरवर होता. (Actor Rajiv Kapoor Dies At 58)
त्या सुमारास अनेक स्टार्स सन्स एकेक करत हिंदी चित्रपटसृष्टीत आले होते. त्यामुळे राजीव कपूरचे रुपेरी आगमन दणक्यात होणे स्वाभाविक होतेच. ‘एक जान है हम’ने मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हात शंभर दिवसांचे यश संपादल्याने राजीव कपूरच्या कारकिर्दीची सुरुवात सुखद झाली आणि मग त्यात घरचाच चित्रपट ‘राम तेरी गंगा मैली‘ (Ram Teri Ganga Maili) (१९८५) च्या खणखणीत यशाने भर पडली.
खुद्द पिता राज कपूर (Raj Kapoor) दिग्दर्शक आणि चित्रपटाची भरभरून पब्लिसिटी. जोडीला नवतारका मंदाकिनी आणि चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच गाणी सुपर हिट. म्हणजे सगळं कसं जमून आलं होतं. चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत राजीव कपूर आणि मंदाकिनी यांच्या चुंबन दृश्याचा फोटो सगळीकडे प्रसिद्ध करताना चित्रपट चर्चेत राहिल याचा विशेष प्रयत्न केला होता. मुंबईतील सिनेपत्रकारांना मात्र मिनर्व्हा थिएटरमध्ये फस्ट डे फर्स्ट शोला हा चित्रपट पब्लिकसोबतच दाखवला. (अन्यथा आर. के. फिल्मचा चित्रपट आर. के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आम्हाला दाखवला जाई). बहुतांश समिक्षकांना न आवडलेला हा चित्रपट रसिकांनी स्वीकारला आणि त्याच मिनर्व्हात या चित्रपटाने खणखणीत पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला.
हे देखील वाचा: ऋषी कपूर यांची शेवटची आठवण
आता एवढे मोठे यश म्हणजे राजीव कपूरची तो निकल पडी असे व्हायला हवे होते. पण…. हा पणच महत्वाचा असतो. राजीव कपूरच्या स्क्रीन प्रेझेंन्सवर त्याचा काका शम्मी कपूरचा खूपच प्रभाव असल्याचे जाणवले. ती शैली साठच्या दशकात शम्मी कपूरला जमली आणि शोभली. पण राजीव कपूरला मात्र ती जमली नाही. केवल शर्मा दिग्दर्शित ‘जिम्मेदार’ चा वांद्र्याच्या एका पंचतारांकित हाॅटेलमधील मुहूर्त आजही आठवतोय. राजीव कपूरच्या वावरण्यात एक कपूर लूक होता. सगळ्यांच्या नजरा आपल्यावर आहेत याने तो सुखावल्यासारखा वाटला. या चित्रपटात टीना मुनिम आणि अनिता राज अशा दोन नायिका होत्या. पण हा चित्रपट रखडत रखडत पूर्ण झाला. राजीव कपूरने लव्ह मॅरेज, झलझला, लाव्हा, जिम्मेदार, हम तो चले परदेस, आसमान, शुक्रिया वगैरे चित्रपटात भूमिका साकारल्या. पण या चित्रपटांना रसिकांनी नाकारले आणि राजीव कपूरची वाटचाल अवघड होत गेली.
त्या काळात नागाभोवती गोष्ट असलेले चित्रपट हमखास हिट होत म्हणून त्याने ‘नाग नागिन ‘ या चित्रपटातही भूमिका साकारली. पण तोही प्रयत्न फसला. राज कपूरच्या निधनानंतर आर. के. फिल्मच्या चित्रपटांचे निर्माते म्हणून या तीन कपूर बंधूंची नावे येऊ लागली आणि राजीव कपूरचे अस्तित्व कायम राहिले. आपल्या घरच्याच बॅनरसाठी त्याने ‘प्रेम ग्रंथ’ (१९९६) चे दिग्दर्शन केले. सुरुवातीला चित्रपटात संजय दत्त व जुही चावला अशी जोडी होती. पण संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी पुन्हा अटक झाली होती आणि हा चित्रपट रखडला. राजीव कपूरने मग ऋषि कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीला घेऊन पुणे जिल्ह्यातील लोणी येथील राज बागमध्ये शूटिंग सुरु केले. बराचसा भाग तेथेच चित्रीत केला आणि मग आर. के. स्टुडिओत (R. K. Studio) सेट लावून इनडोअर्स शूटिंग करताना आम्हा काही सिनेपत्रकाराना आवर्जून शूटिंग रिपोर्टीगसाठी सेटवर बोलावले आणि मनसोक्त गप्पा केल्या. त्याच्या बोलण्यातून या चित्रपटावर त्याने खूपच मेहनत घेतली आहे हे जाणवलं. त्याच्या आत्मविश्वासाचा प्रत्यय मग पडद्यावरही आला. पण या चित्रपटानंतर पुन्हा तो दिग्दर्शनात उतरला नाही. आपल्या दोन भावांसोबत त्याने ‘आ अब लौट चले’ (१९९९) च्या निर्मितीत भाग घेतला इतकेच.
हे नक्की वाचा: चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
राजीव कपूर मग आर. के.च्या श्रीगणेशोत्सवात, विशेषतः विसर्जन मिरवणूकीत हमखास दिसू लागला. एव्हाना तो सिनेमापासून बराच दूर गेला होता. दरम्यान, त्याचा घटस्फ़ोट झाल्याने त्याचे तसे एकाकीपणाचे आयुष्य सुरु झाले होतेच. दोन वर्षांपूर्वी आर. के. स्टुडिओच्या विक्रीची बातमी आली तेव्हा एकदा हे तीनही कपूरबंधू मिडियासमोर आले. राज कपूरचा मुलगा म्हटल्यावर जे पुरुषी सौंदर्य अपेक्षित होते ते गोरागोमट्या राजीव कपूरमध्ये निश्चित होते. ऋषि कपूर हा स्वतंत्र बाण्याचा असल्याने त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आणि यशस्वी ठरला. त्याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच त्याचा धाकटा भाऊ राजीवही असा अचानक धक्का देऊन जातो हे खूप क्लेशकारक असेच आहे.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने (Ashutosh Gowariker) खूप दिवसांनी राजीव कपूरला आपल्या तुलसीदास ज्युनियर या आगामी चित्रपटात संधी दिली होती. पण दुर्दैव!
कपूर खानदानाने चित्रपटसृष्टीला बरेच काही दिले आहे, त्यांना हा धक्का पचवायचे सामर्थ्य लाभू दे इतकीच प्रार्थना.