रमेश देव (Ramesh Deo)काळाच्या पडद्याआड
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Actor Ramesh Deo) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. नुकताच त्यांनी ३० जानेवारी रोजी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. साठच्या दशकातील मराठी चित्रपटातील राजबिंडा नायक अशी त्यांची ओळख होती.
रमेश देव (Ramesh Deo) यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ चा मूळचे कोल्हापूरचे, मूळ आडनाव ठाकूर. पदार्पणातच निर्माते आणि दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या ‘रामराम पाव्हणं’ (१९५०) या चित्रपटात रमेश देव यांना छोटीशी भूमिका मिळाली होती आणि टायटलमध्ये त्यांचे नावही आले. त्यानंतर सिनेमाची लांबी वाढतेय म्हणून त्यांची भूमिका कापली गेली. पण श्रेयनामावलीत त्यांचे नाव मात्र आले.
त्यानंतर दिनकर पाटील यांच्याच ‘पाटलाचा पोर’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारत त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि मग त्यांची अनेक वळणे घेत घेत वाटचाल सुरु झाली आणि गुणवत्ता, दूरदृष्टी, माणुसकी आणि व्यावसायिकता यांच्या केमिस्ट्रीने त्यांच्या बहुरंगी वाटचालीचा प्रवास आकार घेत घेत सुरु राहिला.
त्यांच्या मराठी व हिंदी चित्रपटांची नावे जरी सांगायचे ठरवले तरी मोठीच सूची होईल. एकीकडे अभिनयाचा प्रवास आणि दुसरीकडे सीमाताईंशी लग्न (त्या मुळच्या नलिनी सराफ), संसारात दोन मुले (अजिंक्य आणि अभिनय), या मुलांची कारकिर्द आणि लग्ने, त्यांची मुले (म्हणजे रमेश देव यांची नातवंड) असा त्यांचा परिवारही वाढत होता.
रुपेरी पडद्यावरील अभिनयासोबत गाण्यांनीही रसिकांच्या मनावर अधिराज गाजवले. उदा. अपराध’ ( गाण्याचे बोल, सूर तेची छेडता, सांग कधी कळणार तुला, स्वप्नात पाहिले मी रुप तेच होते, असेच जुळले गीत सुरात), भाग्यलक्ष्मी (चंद्र दोन उगवले), तीन बहुरानिया (आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या), शेवटचा मालुसरा (तुझे रुप राणी कुणासारखे गं), वरदक्षिणा (एक हात पंखावरुन फिरुन), कसौटी (बेबी हो गई जवान).
मूळ चित्रपट ‘राम और श्याम ‘मध्ये प्राणने साकारलेली भूमिका रिमेकमध्ये रमेश देव यांनी साकारली. तसंच, अनेक मराठी चित्रपटात रमेश देव यांनी व्हीलन साकारला म्हणून त्यांना मराठीतील प्राण असे म्हणत. लक्ष्मण रेषा (शपथ या ओठांची), आनंद (मैने तेरे लियेही सात रंग के सपने चुने, राजेश खन्नावरील या गाण्यात रमेश देव आणि सीमाताई यांचाही सहभाग आहे) मोलकरीण (हसले आज कुणी तू का मी) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी साकारलेला ‘भिंगरी’तील खलनायक आजही रसिकांच्या समरणात आहे.
आपल्या कार्यविस्तारात त्यांनी राजदत्त दिग्दर्शित ‘सर्जा’, गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित ‘वासुदेव बळवंत फडके’ या चित्रपटांची निर्मिती आणि ‘चोर चोर’, ‘जिवा सखा’, ‘चल गंमत करु’ इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
रमेश देव (Ramesh Deo) अत्यंत साधे होते. ‘सर्जा’ची राज्य चित्रपट महोत्सवात पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटात निवड न झाल्याने आश्चर्यचकित झालेले रमेश देव याच चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाल्याने तेवढेच सुखावले होते. एका शाळेत ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेले असता, विद्यार्थ्यांना वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी फारशी माहितीही नाही, हे लक्षात आल्याचे त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी त्याच नावाच्या चित्रपटाची निर्मिती करताना राजाबाई टॉवरमध्ये मुहूर्त केला. गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य देवने शीर्षक भूमिका साकारली होती.
रमेश देव कोणत्याही चित्रपटासाठी अथवा व्यक्तिरेखेसाठी नाही म्हणत नसत. समजा, काही गोष्टी पटत नसतील तर त्यातून ते मध्यममार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करत. जिद्द, मेहनत, व्यावसायिक वृत्ती या गुणांवर ते कलेच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरले.