विद्या बालन चं हे वेगळेपण नक्की भावून जाईल
‘डर्टी पिक्चर’ची पब्लिसिटी ऐन रंगात आली होती. २०११ सालची ही गोष्ट. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात आपल्या बोल्ड इमेज आणि धक्कादायक मृत्यू यामुळे वादग्रस्त ठरलेल्या सिल्क स्मिथा हिच्या बेधडक आयुष्यावर आधारित हा चित्रपट म्हणून मिडियात चर्चा रंगली होती. अशाच बहुचर्चित पर्सनालीटीवर आधारित चरित्रपटाना उत्तम व्यावसायिक यश मिळत असते असाही त्यात एक जबरा सूर. त्यात हा अनेकदा ‘नकारात्मक व्यक्तिरेखा’ साकारल्याने वेगळी इमेज असलेल्या अभिनेत्रीच्या आयुष्यावर दिग्दर्शक मिलन लुथरिया याने टाकलेला फोकस. हिंदी चित्रपटाच्या रसिकांनी ‘सदमा’ वगैरे चित्रपटात सिल्क स्मिथाला पाहिले होते. पण तिचा जबरा परफार्म तेलगू तमिळ चित्रपटात.
अशी चित्रपटाची हवा तापत असतानाच एका पंचतारांकित हॉटेलमधील झी मराठीच्या एका इव्हेन्टसला विद्या बालन येणार आहे हे तेथे गेल्या गेल्या समजताच कुतूहल वाढले आणि मराठी अभिनेत्रींचे डान्स रंगात आले असतानाच विद्या बालनचे आगमन झाले. तिला पाहताच आश्चर्य आणि कौतुक वाटले. साऊथ इंडियन लालचुटूक लालभडक साडीत ती चक्क सिल्क स्मिथा बनून आली होती. त्या भूमिकेत शिरुन आल्याने साहजिकच ‘डर्टी पिक्चर’ आणि त्यातील सिल्क स्मिथाच्या भूमिकेतील विद्या बालन एवढ्या मोठ्या शोमध्ये भाव खाऊन गेली. स्पॉटवरचा मिडिया, झीवरचे या शोचे कव्हरेज या सगळ्यातून/होय सगळ्यातून मिळाले.
हा पब्लिसिटीचा थेट फंडा झालाच, पण आपला चित्रपट प्रेक्षकांच्या माईंडमध्ये पक्का फिट्ट करण्याची ही सकारात्मक चाल आहे हे माझ्या लक्षात आले आणि मनोमन विद्या बालनला मानले. (काही म्हणा, पण सिल्क स्मिथाची भेदक नजर तेवढी विद्या बालन दाखवू शकली नाही. पटलं का)
आपला चित्रपट पूर्वप्रसिध्दीतून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच्या विद्या बालनच्या मेहनतीचा चांगला प्रत्यय सुजोष घोष दिग्दर्शित ‘कहानी’ (२०१२) च्या वेळेस पुन्हा एकदा आला. तिने एक दिवस पक्का केला. चित्रपटाच्या पीआरओकडून मिडियात विद्याच्या मुलाखतीसाठी मेसेज जाताना प्रत्येकाला वेळ भिन्न होती. ‘हा ग्रुप इंटरव्हयू नाही’ (जे आजचे फॅड आहे) हे त्यातून स्पष्ट झाले. मी स्पॉटवर पोहचलो तेव्हा समजले की, विद्या सकाळी नऊ वाजल्यापासून एकेका पत्रकाराशी संवाद साधतेय (वन टू वन पध्दतीने, हीच खरी आणि जुनी मुलाखतीची पध्दत) आणि थोडा वेळ थांबल्यावर माझीही भेट झाली. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, सकाळपासून सतत एकेक मुलाखत दिल्याने अजिबात कंटाळेली नाही. व्यावसायिकता म्हणतात ती हीच. खरं तर चित्रपटाच्या प्रमोशनच्या मुलाखतीत प्रश्न आणि उत्तर हे अनेक मुलाखतीत सारखेच असते. त्यात कस लागत नाही. पण तरीही विद्या शांतपणे ऐकून घेई आणि उत्तर देई.
दोनच दिवसांनी Times of India च्या बॉम्बे टाईम्समध्ये बातमी आली की, विविध भाषांमधील प्रिन्ट मिडिया आणि चॅनल असे मिळून तिने चाळीस (फक्त) मुलाखती दिल्या. आपला चित्रपट आणि आपले काम लोकांपर्यंत पोहोचवायचे माध्यम म्हणजे मिडिया आहे, आणि त्यातून रसिकांच्या मनात चित्रपट आकार घेऊ लागतो आणि मग प्रत्यक्ष चित्रपट पाहताना तो जोडलाही जातो हे यामागचे तिचे प्रयत्न.
आणखी एक धक्का बसलाच…. या चित्रपटाच्या पीआर टीमला मी काही दिवसांनी विचारले, या चाळीसपैकी किती मुलाखतीचे कव्हरेज विद्याने पाहिले? यावर उत्तर आले, सगळे…. इतके व्यवस्थित पाहिले की एका पंजाबी वृत्तपत्रात काही चुकीचे प्रसिद्ध झाले हेदेखील तिने लक्षात आणून दिले.
विद्या बालनशी झालेली आपली ही ‘पहिली भेट’ चांगली सार्थकी लागल्याचे हे समाधान मला मिळाले. अन्यथा, अनेक कलाकार आपण नेमकं कोणाला मुलाखत देतोय हे जाणून घेत नसल्याचे दिसते आणि अशा मुलाखतीने काय मोठा फरक पडतोय असेही त्यांचे उघडपणे मत असते. विद्या बालन यापेक्षा वेगळी, म्हणूनच यशस्वी.
मोनिष बाबरे निर्मित आणि शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘एक अलबेला’ या भगवानदादांच्या आयुष्यावर आधारित मराठी चित्रपटात विद्या बालन गीता बालीची भूमिका साकारणार अशी बातमी आली तेव्हा सुरुवातीला आश्चर्य आणि कौतुकही वाटले. कौतुक अशासाठी होते की, विद्याची चित्रपटाची निवड खूप विचारपूर्वक असते आणि आश्चर्य याचे की, ती मराठी चित्रपटात भूमिका साकारणार?
भगवानदादांची भूमिका साकारलेल्या मंगेश देसाईची प्रतिक्रिया भारी होती. त्याला तर या चित्रपटात विद्या बालन भूमिका साकारणार आहे यावर शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास नव्हता. तिने ऐनवेळी नकार दिला असे तद्दन फिल्मी उत्तर ऐकायला मिळेल अशी त्याने मनाची तयारी करून ठेवली होती. पण विद्या बालन खरोखरच तयार होऊन सेटवर आली आणि तो आपल्या भूमिकेत शिरला….
जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चित्रपटाच्या इव्हेन्टसपूर्वी विद्या बालनच्या ‘वन टू वन’ अशा मुलाखतीचे आयोजन असताना पुन्हा एकदा तिच्या भेटीचा योग आला (हा फोटो तेव्हाचाच आहे) आपल्या घरात (आता तिचे लग्न झाले होते) ‘अलबेला’ इत्यादी जुन्या चित्रपटांची पोस्टर आवर्जून लावली आहेत, हे तिने आवर्जून सांगताच या माध्यम व व्यवसाय याकडे तिचा पाहण्याचा दृष्टिकोन आवडला. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्याचा इतिहास आपण विसरता कामा नये याकडे तिचा कल दिसला. अनेक मोठ्या स्टार्समध्ये अशा अनेक छोट्या परंतु महत्वाच्या गोष्टी असतात, त्या कळत नकळत दिसून येतात.
‘मिशन मंगल’च्या यशानंतरही एका छोट्या गेटटुगेदर मध्येही विद्या बालनशी भेट झाली.
ती स्टार आहेच. पण त्या वलयात तिला आपल्या चित्रपटासाठी आपण आपल्या पध्दतीने मेहनत घ्यायला हवी याची चांगली जाणही आहे. मला त्या गुणाचे जास्त कौतुक आहे…