
Vin Doghatali Hi Tutena: मकरसंक्रांतीचा सण की नात्यांची कसोटी?; मालिकेत येणार नवा ट्विस्ट !
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ (Vin Doghatali Hi Tutena) सध्या वेगवेगळ्या भावनांचा संगम दाखवत आहे. गोव्यात पार पडलेल्या भव्य विवाहसोहळ्यानंतर घरात आनंदाचं वातावरण असावं, अशी अपेक्षा असताना कथा मात्र वेगळ्याच वळणावर जाताना दिसते. स्वानंदी-समर आणि अधिरा-रोहन या दोन्ही नवदांपत्यांसाठी हा पहिला सण असला, तरी सगळं काही मनासारखं घडताना दिसत नाही.(Vin Doghatali Hi Tutena Serial)

पहिली संक्रांत म्हटली की नव्या सुरुवातीचा, आनंदाचा आणि एकत्र येण्याचा सण. मात्र अधिरा आणि रोहनच्या नात्यात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे या सणाचा उत्साह कमी झालेला दिसतो. नेहमी प्रत्येक सणात पुढाकार घेणारी अधिरा यावेळी मात्र शांत आणि उदास भासते. तिचा हा बदल समर आणि स्वानंदीच्या लक्षात येतो आणि ते ठरवतात की या संक्रांतीच्या निमित्ताने दोघांमधील गैरसमज दूर करायचे. मात्र घरातील काकूंना हा निर्णय अजिबात रुचत नाही.

दुसऱ्या बाजूला कथानकाला आणखी गडद वळण देत अंशुमन रोहनविरोधात टोकाचं पाऊल उचलतो आणि त्याच्या अपघाताची सुपारी देतो. घरात संक्रांतीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना सगळ्यांना रोहनची आतुरतेने वाट पाहावी लागते. तो वेळेवर न आल्याने काकू अर्पिता आणि अधिरावर टोमणे मारायला सुरुवात करते. मात्र त्याच क्षणी स्वानंदी रोहनला सुखरूप घरी घेऊन येते. एका मोठ्या अपघातातून बचावलेला रोहन घरी परतल्याने घरात पुन्हा एकदा श्वासात श्वास येतो आणि संक्रांतीची पूजा पार पडते. पण पूजा शांततेत संपेल असं वाटत असतानाच रोहनची आई अपघाताचा मुद्दा काढून गोंधळ घालते, ज्यामुळे घरातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण होतं. एकीकडे सणाचा आनंद, तर दुसरीकडे वाढणारे संशय आणि संघर्ष असा भावनिक खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतो.(Vin Doghatali Hi Tutena Serial)
=========================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: ८०० खिडक्या ९०० दारं; बिग बॉस मराठीच आलिशान घर पाहिलं का?
=========================
या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे सुबोध भावे (Subodh Bhave) , तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि इतर सहकलाकार आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. स्वानंदी आणि समरच्या भूमिकांमध्ये तेजश्री आणि सुबोध यांची केमिस्ट्री विशेष भावते. गंभीर प्रसंग, हलकीफुलकी गंमत, नात्यांमधील गुंतागुंत आणि सतत येणारे अनपेक्षित ट्विस्ट यांचा सुरेख मिलाफ या मालिकेला वेगळी ओळख देतो. एकंदरीत, ‘वीण दोघातली ही तुटेना’ सध्या भावनांनी भरलेली कथा मांडत असून, पुढे आणखी कोणते नाट्यमय वळण येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.