ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जेव्हा छोट्या वैजयंतीमालाने पोप समोर नृत्य करून शाबासकी मिळवली!
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. ती तंतोतंत खरी ठरली अभिनेत्री वैजयंतीमालाच्या बाबतीत. वैजयंतीमाला(Vaijayantimala) ज्या वेळी फक्त सहा वर्षाची होती त्यावेळी तिने चक्क व्हॅटिकन सिटी मधील पोप समोर नृत्य करून शाबासकी मिळवली होती. गंमत म्हणजे त्यावेळी तिने कुठलेही नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. पोप पियुस XII यांनी तिला आशीर्वाद तर दिलाच शिवाय एक भेट वस्तू पण दिली. छोटी वैजयंती तिथपर्यंत कशी पोचली? काय होता हा किस्सा?
अभिनेत्री वैजयंतीमालाचा (Vaijayantimala) जन्म १३ ऑगस्ट १९३६ ला मद्रास इथे झाला. तिची आई वसुंधरा देवी कुशल नृत्यांगना होती. तसेच तिने काही चित्रपटातून भूमिका देखील केल्या होत्या. लहानपणापासून वैजयंती आपल्या आईची नृत्य कला पाहत होती. एकदा म्हैसूरचे राजे युरोपच्या टूरवर जाणार होते. त्यांच्यासोबत कलाकारांचा मोठा लवाजमा देखील जाणार होता. या कलावंतांमध्ये वैजयंतीमालाचे आई वडील तसेच आजी देखील जाणार होते. वैजयंती लहानपणापासूनच आजीची खूप लाडकी होती. त्यामुळे तिला देखील त्यांनी या टूरवर नेण्याचे ठरवले. या युरोप टूरमध्ये लहानग्या वैजयंतीने म्हैसूरचे राजे आणि इतर कलाकारांची चांगली करमणूक केली. रोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी ती सर्वांना नृत्य करून दाखवत असे.कलाकारांची ती लाडकी बनली होती.
या दौऱ्याच्या दरम्यान म्हैसूरचे राजे व्हॅटिकन सिटी मधील तत्कालीन पोप पियुस XII यांना देखील भेटणार होते. तिथे पोप यांच्यासमोर भारतीय कलाकार आपली कला सादर करणार होते. पोप यांच्यासमोर सादर होणारा कार्यक्रम ‘मिनिट टू मिनिट’ चॉक आऊट झाला होता. कारण पोप यांच्याकडे असलेला वेळ आणि त्यांची सिक्युरिटी यामुळे मर्यादित काळच आपले परफॉर्मन्स सादर करण्यासाठी मिळणार होते. वैजयंती मालाची आई वसुंधरा देवी यांनी भरत नाट्यम सादर केले. त्याला सर्वांची मोठी दाद मिळाली. इतर कलाकारांनी त्यांचे परफॉर्मन्स सदर केले. आता छोट्या सहा वर्षाच्या वैजयंतीमालाने(Vaijayantimala) स्टेजवर जाऊन नृत्य करण्याचा हट्ट केला. सर्वांनी तिला समजावून सांगितले “आता शक्य नाही, तिथे फक्त मोठ्या लोकांच्याच परफॉर्मन्स होणार आहेत समोर जे पाहुणे आहेत ते खूप महान व्यक्ती आहेत त्यांच्यासमोर तुला आता जाता येणार नाही!” परंतु छोट्या वैजयंतीला यातले काहीच कळाले नाही. ती जोरजोरात भोकाड पसरून रडू लागली आणि स्टेजवर जाण्याचा हट्ट करू लागली. तिच्या रडण्याने सर्वजण चलबिचल होऊ लागले; पण नाईलाज होता. तिला समजावणार तरी कसे आणि किती? तिला चॉकलेट देऊन, वेगवेगळे आमिषे दाखवून समजावण्याचा प्रयत्न झाला. पण छोटी वैजयंतीमाला काहीच ऐकायला तयार नव्हती. तिला स्टेजवर जाऊन तिच्या आई सारखे नृत्य करायचे होते. यासाठी ती जोरजोरात ओरडत होती, रडत होती. मोठा सीन तिने क्रियेट केला होता. हा सर्व प्रकार पोप शांतपणे पाहत होते.
=========
हे देखील वाचा : … या घटनेनंतर शर्मिला टागोर कमालीची ‘डिसिप्लिन मॅच्युअर्ड’ बनली!
=========
त्यांनी त्यांच्या सहायकाला या बाबत विचारले. त्या वेळेला त्यांनी हा सर्व प्रकार सांगितला. पोप मंदपणे हसले आणि म्हणाले “त्या छोट्या मुलीला नृत्य करू द्या!” पोप यांनी नृत्य करायची परवानगी देताच ताबडतोब तिला सजवले गेले. कपडे घातले गेले. आणि मोठ्या थाटामाटात आणि स्टाईल मध्ये वैजयंतीमाला(Vaijayantimala) स्टेजवर जाऊन पोहोचली सुध्दा! तिच्या आवडती रेकॉर्ड लावण्यात आली. आणि तिने डान्स करायला सुरुवात केली. तिच्या डान्स स्टेप्स पाहून सर्व जण चकित झाले. कारण मोठमोठ्या नृत्यांगनाला देखील ज्या स्टेप्स घेताना अडचणी येतात त्यात ती सहजपणे करून दाखवत होती. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन वैजयंतीचा डान्स पाहत होते. तिला चिअर अप करत होते. वन्स मोर देत होते. तिचा परफॉर्मन्स झाल्यानंतर पोप यांनी तिला पुन्हा स्टेजवर बोलावले. तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि आपल्या जवळ येईल चांदीचा सिक्का काढून तिला भेट दिला!
अशा प्रकारे कुठलेही विधिवत शिक्षण न घेता केवळ आईच्या डान्स स्टेप्स म्हणून शिकलेली वैजयंतीमाला चक्क व्हॅटिकन सिटी मध्ये पोप यांच्यासमोर डान्स करून त्यांच्याकडून शाबासकी आणि चांदीचा सिक्का मिळवून आली. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे खरोखरच खरे ठरले आणि पुढे वैजयंतीमालाने भारतीय सिनेमांमध्ये नृत्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली!
धनंजय कुलकर्णी