Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Waheeda Rehman : ‘दिवार’,’कभी कभी’ आणि ‘त्रिशूल’ यश चोप्रांच्या या सिनेमातील वहिदा कनेक्शन!
हिंदी सिनेमा मध्ये नायक पन्नास पंचावन्न वर्षाचा झाला तरी त्याला हिरोचे रोल मिळत राहतात पण नायिकेने तिशी ओलांडली रे ओलांडली की तिच्याकडे हीरोइन च्या ऐवजी आईच्या भूमिका ऑफर होवू लागतात. (अर्थात याला काही रेखा सारखे काही सन्माननीय अपवाद आहेत!) त्यामुळे मधल्या काळात अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी ज्या नायका सोबत नायिके ची भूमिका केली होती त्याच हिरोंची आई होण्याची वेळ त्यांच्यावर आली!! आपल्याकडील प्रेक्षकांची मानसिकता अशी झाली आहे की तो तिशी नंतरच्या नटीला नायिका म्हणून स्वीकारत नाही आणि हे सर्वथा चुकीचे आहे. प्रेक्षकांच्या या विचित्र मानसिकतेच्या भोवऱ्यात अनेक हिरोइन्स सापडल्या होत्या. त्यात एक होती वहिदा रहमान. (Waheeda Rehman)

सत्तरच्या दशकाच्या मध्यावर वहिदाने चरित्र भूमिका करायला सुरुवात केली होती. त्या वेळेचा हा एक गमतीदार प्रसंग आहे. साधारणता १९७४ साली यश चोप्रा आपल्या ‘कभी कभी’ या चित्रपटाचे प्लॅनिंग करत होते. त्याचवेळी ते गुलशन राय निर्मित ‘दिवार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करत होते. दोन्ही सिनेमाची निर्मिती एकाच काळात सुरु झाली होती. ‘कभी कभी’ या चित्रपटाचे निर्माते स्वतः यश चोप्रा होते. ‘कभी कभी’ या चित्रपटात त्यांनी वहिदा रहमानला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सोबत हीरोइन म्हणून साइन केले होते. त्याच वेळी गुलशन रॉय ‘दिवार’ या चित्रपटात अमिताभ आणि शशी कपूरच्या आईच्या भूमिकेसाठी वहिदा रहमानकडे गेले . (Untold stories)

वहिदाने दोन्ही भूमिका एक्सेप्ट केल्या! पण जेव्हा यश चोप्रा यांना ही बातमी कळाली त्यावेळी ते थोडेसे घाबरले. कारण त्यांना माहीत होतं की गुलशन रॉय यांचा दिवार हा चित्रपट ‘कभी कभी’ च्या आधी तयार होऊन रिलीज देखील होईल. या चित्रपटात जर वहिदा रहमान ने अमिताभच्या आईची भूमिका केली तर ‘दिवार’ नंतर प्रदर्शित झालेल्या ‘कभी कभी’ चित्रपटात अमिताभची हीरोइन म्हणून वहिदाला प्रेक्षक कसे स्वीकारतील? दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शक तेच होते. पण ‘कभी कभी’ चे ते नुसते दिग्दर्शक नव्हते तर निर्माते देखील होते. त्यांना काळजी वाटणे स्वाभाविक होते.

त्यामुळे त्यांनी एक आयडिया केली ते वहिदाला जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितले ,” ‘दिवार’ मधली भूमिका तुम्ही करू नका. या भूमिकेसाठी नकार कळवा. कारण एकतर तुमचं वय आईची भूमिका करण्या इतके वयस्क झालेलं नाही आणि तुम्हाला अजूनही हिरोईनच्या भूमिकेची ऑफर मिळत असताना तुम्ही स्वतःला आईच्या भूमिकेत का पडद्यावर दाखवता?” वहिदा रहमान ला यश चोप्रा यांचे मत पटले. आणि गुलशन राय यांना वाहिदा ने ‘दिवार’ मधील आईची भूमिका स्वीकारण्याबाबत असमर्थता दर्शवली! त्यानंतर या भूमिकेसाठी निरुपा रॉय यांची निवड झाली. अपेक्षे प्रमाणे दिवार आधी तयार झाला आणि २४ जानेवारी १९७५ या दिवशी प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झाला. यानंतर एक वर्षांनी २७ फेब्रुवारी १९७६ या दिवशी यश चोप्रा यांचा ‘कभी कभी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
==============
हे देखील वाचा : Mukesh : जेंव्हा मुकेश यांनी शैलेंद्रसिंग गाताना हार्मोनियमची साथ दिली!
==============
‘कभी कभी’ ला फर्स्ट रन फारसे यश मिळाले नाही. वहिदा थोडी नाराज झाली. तिला वाटले जर ‘दिवार’ मधली आईची भूमिका जर तिने स्वीकारली असती तर चित्रपटाच्या यशा सोबत तिचे देखील नाव गाजले असते आणि चरित्र अभिनेतेसाठी तिचा प्रवास आणखी प्रशस्त आणि सुलभ झाला असता. खरी गंमत पुढेच आहे. ‘कभी कभी ‘ प्रदर्शित झाल्यानंतर लगेच यश चोप्रा यांनी गुलशन राय यांचाच ‘त्रिशूल’ हा चित्रपट दिग्दर्शित करायला घेतला. या चित्रपटात मात्र त्यांनी वहिदाला अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका दिली. आता मात्र वहिदांना विचारले,” मागच्या वेळी तुम्ही मला आईची भूमिका करायला नकार द्यायला सांगितला होता आणि आज तुम्हीच मला ही भूमिका ऑफर करत आहात?” त्यावर यश चोप्रांचे असे उत्तर होते,” ‘त्रिशूल’ या चित्रपटात जरी तुम्हाला अमिताभच्या आईची भूमिका करायची असली तरी या भूमिकेत तुम्ही दोघे आई आणि मुलाच्या भूमिकेत कधीही एका फ्रेम मध्ये दिसणार नाहीत! त्यामुळे हा सिनेमा स्वीकाराला काहीच प्रोब्लेम नाही.”

यश चोप्रा यांचे हे लंगडे समर्थन वहिदा ने ऐकून घेतले आणि तिने ती भूमिका स्वीकारली. ‘त्रिशूल ‘ ५ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला आणि सुपर हिट झाला. व्यावसायिक चित्रपट निर्माता दिग्दर्शकांचे हेच वैशिष्ट्य असतं की ते आपली भूमिका आपल्या पद्धतीने व्यवस्थित मोल्ड करून मांडतात आणि समोरच्याला जिंकून घेतात. अर्थात वहिदा रहमान आईची भूमिका करायला तिचा कधीच इन्कार नव्हता त्यामुळे तिने ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने केली. त्यानंतर ऐंशी आणि नव्वद च्या दशकात वहिदाने अनेक चित्रपटातील चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या.