
शाहरुख खान हा ‘देवदास’चा पहिला चॉईस नव्हता?
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी २००२ साली एक अवघड शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. हा मोस्ट डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता ‘देवदास’ (Devdas) हा चित्रपट बनविण्याचा ! ख्यातनाम बंगाली साहित्यकार शरदचंद्र चटर्जी यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या या कादंबरीने भारतीयांना पार वेडावून सोडले आहे. या कादंबरीवर हिंदीमध्ये त्या पूर्वी दोन चित्रपट तर आलेच होते पण या कादंबरीचा प्रभाव अनेक चित्रपटांवर स्पष्ट पडलेला दिसत होता. अनेक भारतीय भाषांमधील सर्व कलाप्रकारात ‘देवदास’ येतच होता.

अशा या वातावरणात पुन्हा एकदा ‘देवदास’ आणणे हे खरोखर मोठे चॅलेंज होते. कारण प्रेक्षकवर्ग बदलला होता. प्रेक्षकांची अभिरुची बदलली होती. आता १०० वर्षांपूर्वीचे कथानक प्रेक्षक स्वीकारतील का? हा मोठा प्रश्न होता. पण दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मात्र आपल्या प्रोजेक्ट ठाम होते. त्यांनी एका मुलाखतीत असे सांगितले होते की, ”देवदास (Devdas) ही पूर्ण कादंबरी मी तोवर वाचली नव्हती पण त्यावर आधारित एक इंग्रजी लेख त्यांनी वाचला होता आणि ते या कलाकृतीच्या प्रेमात पडले होतो!” याचवेळी त्यांच्या काही मित्रांनी देखील त्यांना देवदास हा चित्रपट निर्माण करा असे सांगितले होते. संजय लीला भन्साळी म्हणतात, ”एकाच वेळी मला आतून आणि बाहेरून एकच आवाज ऐकू येत होता आणि यातूनच मी या चित्रपटाच्या निर्मितीत उतरलो.”

‘देवदास’ची मुख्य भूमिका शाहरुख खान करणार असे म्हटल्यानंतर इंडस्ट्रीमधील बऱ्याच जणांनी ‘शाहरुखला ही भूमिका जमणार नाही’ असे सांगितले. ‘त्याला देवदास साकारायला लावून तुम्ही खड्ड्यात जाऊ नका’ असा सल्ला दिला. त्यांच्या मते “शाहरुखची इमेज आणि अभिनय शैली ही पूर्णतः वेगळी आहे. देवदास ही एक दुभंगलेली कन्फ्युज व्यक्तिरेखा आहे. यात तो प्रचंड इमोशनल आहे. यात त्याला ॲक्शन हिरो म्हणून अजिबात दाखवता येणार नाही आणि त्याचा अंडरप्ले अभिनय प्रेक्षक स्वीकारणार नाहीत!” सगळीकडून अशा नकारात्मक प्रतिक्रिया आल्या तरी संजय लीला भन्साळी यांना त्यांचा आपला आवाज असा सांगत होता की या भूमिकेसाठी शाहरुख खानच योग्य व्यक्ती आहे. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. अनेक पदर आहेत.
संजय लीला भन्साळी यांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा भारत दाखवायचा यासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या. हिंदी चित्रपट सृष्टीत पहिला देवदास १९३५ साली कुंदनलाल सहगल यांनी साकारला होता. तो चित्रपट पी सी बारुआ यांनी दिग्दर्शित केला तर १९५५ सालचा दिलीप कुमार यांचा ‘देवदास’ बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केला.

त्यानंतर तब्बल ४७ वर्षांनी संजय लीला भन्साळी यांनी शाहरुख खानला देवदास (Devdas) बनवले. त्यांना खात्री होती शाहरुखच्या अभिनयाची. त्याने देखील देखील झोकून देऊन ही भूमिका साकारली. या चित्रपटाला तब्बल १७ फिल्मफेअरची नामांकने मिळाली आणि अकरा पारितोषिके मिलली. यात शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे फिल्मफेअर देखील मिळाले.
‘देवदास’ चित्रपटाचे संगीत आणि गाणे हा खरतर एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. संगीतकार इस्माईल दरबार यांनी अतिशय मेहनत घेऊन कथेला साजेसं असं सुरीलं संगीत या चित्रपटासाठी दिले. या चित्रपटातील गाणी समीर अंजाम आणि नुसरत बद्र यांनी लिहिली होती. यातील एक गाणं स्वतः बिरजू महाराज यांनी लिहिलं होतं आणि त्यांनीच या गाण्याची धुन देखील बनवली होती. हे गीत होते ‘काहे छेड’. बिरजू महाराज यांनी या गीताचे नृत्य दिग्दर्शन देखील केले. गायिका श्रेया घोषाल हिने पहिलं हिंदी सिनेमातील गाणं याच चित्रपटासाठी गायलं.
========
हे देखील वाचा : ‘उमराव जान’चे शूटिंग पाहण्यासाठी झाली होती दंगल!
========
गीताचे बोल होते ‘बैरी पिया बडा बेदर्दी‘ श्रेयाचा भाग्य थोर तिला पहिल्याच गाणं ऐश्वर्या रॉय करीता गायला मिळाले. श्रेया त्या वेळी सारेगमपची विजेती होती. संजय लीला भन्साली यांच्या या आधीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाला देखील इस्माईल दरबार यांचेच संगीत होते. ‘देवदास’ (Devdas) चित्रपटातील संगीत देताना इस्माईल दरबार यांनी सारंगी, बासरी, सतार, ढोलकी या पारंपारिक वाद्याचा फार सुंदर वापर करून घेतला होता ! नितीन चंद्रकांत देसाई यांनी या चित्रपटासाठी बनवले सेट्स त्या काळात मोठा चर्चेचा विषय झाला होता. १०० वर्षांपूर्वीचा कालखंड अतिशय दर्जेदारपणे त्यांनी आपल्या सेट्स मधून उतरवला होता.