जेव्हा फ्लॉप स्टार म्हणून अमिताभला सिनेमातून चक्क काढून टाकण्यात आले!
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना हिंदी सिनेमात स्वतःला प्रस्थापित करण्यामध्ये मोठा संघर्ष करावा लागला होता. १९७३ साली आलेल्या प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’ चित्रपटापासून त्यांच्या यशस्वी कारकीर्दीला सुरुवात झाली पण त्यापूर्वीची चार-पाच वर्ष अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठी खूप संघर्षाची होती. या काळात त्यांना अनेकदा अपमानास्पद पद्धतीने चित्रपटातून काढून टाकण्यात आले. कित्येकदा त्यांना सहाय्यक भूमिका देऊन त्या भूमिकेची देखील काटछाट करण्यात आली. परंतु अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्या परिस्थितीला सामोरे जात स्वतःला सिद्ध केलं आणि सुपरस्टार पद पटकावले. आजची तरुण पिढी थोडं फार अपयश आलं की, घाबरून जाते, भेदरून जाते आणि पटकन गिव्ह अप करून परिस्थितीला शरण जातात किंवा नैराश्याच्या गर्तेत हरवून जातात परंतु अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यानंतर त्यांनी किती मोठा संघर्ष येथे केला होता ते जाणवतं. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांचे यश खूप मोठे आहे.
१९७६ साली दुलाल गुहा या दिग्दर्शकाने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा यांना एकत्र घेऊन ‘दो अंजाने’ हा चित्रपट केला होता. आज आपल्याला हाच चित्रपट अमिताभ आणि रेखाचा पहिला सिनेमा म्हणून आठवला जातो. तसे ते दोघे ऋषीकेश मुखर्जी यांच्या ‘नमक हलाल’ (१९७३) मध्ये देखील एकत्र होते पण त्यात रेखाचा नायक राजेश खन्ना होता. परंतु त्यापूर्वी म्हणजे १९७१ साली म्हणजे ‘जंजीर’ प्रदर्शित व्हायच्या दोन वर्षे आधी अमिताभ आणि रेखा यांना घेऊन एका चित्रपटाची सुरुवात झाली होती. हे तुम्हाला ठाऊक आहे का? या चित्रपटाचे दिग्दर्शक होते कुंदन कुमार. या सिनेमाचे शीर्षक होते ‘अपना पराया’. रेखा देखील त्या वेळेला तशी न्यू कमरच होती परंतु ‘सावन भादो’ सारखा सुपरहिट सिनेमा तिच्या नावावर होता. अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) यशाची पाटी मात्र कोरी होती. या सिनेमाचे एक महिना चित्रीकरण देखील झाले. परंतु डिस्ट्रीब्युटर्सला जेव्हा हा चित्रपट या चित्रपटाची काही रिळे दाखवण्यात आली त्यावेळेला त्यांनी हा चित्रपट स्वीकाराला नकार दिला आणि त्यांनी या फ्लॉपस्टारला सिनेमातून काढून टाका असे सांगितले! दिग्दर्शक कुंदन कुमार यांनी अमिताभ बच्चन यांना,”तुला मार्केट व्हॅल्यू नसल्यामुळे, हा चित्रपट कोणीही स्वीकारायला तयार नाही त्यामुळे नाईलाजाने तुला सिनेमातून काढून टाकावे लागत आहे.” असे सांगितले. अमिताभने अतिशय दुःखी मनाने हा कडवा घोट पचवला.
तोवर त्या महिनाभरात अमिताभ आणि रेखा यांच्यावर एक गाणे देखील चित्रित झाले होते. गाण्याचे बोल होते ‘तौबा तौबा’ रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं तुम्हाला युट्युब वर पाहायला मिळेल. डिस्ट्रीब्यूटरच्या नकार घंटेने अमिताभ बच्चन यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले. नंतर त्याच्या जागी नवीन निश्चल यांच्या नावाचा विचार झाला. परंतु नवीन निश्चल यांनी या सिनेमात काम करायला नकार दिला. “एका नवीन स्ट्रगलर तरुणाला काढून तिथे भूमिका करणे मला नैतिकदृष्ट्या पटत नाही!” असे त्यांनी सांगितले. नंतर ही भूमिका संजय खान यांना ऑफर करण्यात आली. संजय खान हे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला मोठे नाव होते. डिस्ट्रीब्यूटर आता खुश झाले कारण या सिनेमातून फ्लॉप स्टार अमिताभ बच्चन ला काढून तिथे संजय खान यांना घेण्यात आले होते. संजय आणि रेखा यांना घेऊन या चित्रपटाचे पुन्हा एकदा चित्रीकरण सुरू झाले. अमिताभ आणि रेखा वर चित्रीत झालेले गाणे पुन्हा एकदा रेखा आणि संजय खान यांच्यावर चित्रित झाले. तुम्ही youtube वर हे गाणे सर्च केले तर तुम्हाला दोन गाणी दिसतील!! एका गाण्यामध्ये अमिताभ आणि रेखा आणि दुसऱ्या गाण्यात संजय आणि रेखा!
=====
हे देखील वाचा : संघर्षातून झळाळून निघालेले दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती
=====
काळ बदलायला तसा वेळ लागत नाही. ११ मे १९७३ रोजी अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशभर या सिनेमाला प्रचंड यश मिळाले. एका नव्या सुपरस्टार चा जन्म झाला. अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही इमेज या सिनेमापासून सुरु झाली. इथून पुढे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कधीही मागे वळून पाहावे लागले नाही. कुंदन कुमार दिग्दर्शित ‘दुनिया का मेला’ हा चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात फ्लॉप झाला. ज्या फ्लॉप स्टार म्हणून अमिताभ बच्चन यांना काढून तिथे हिट स्टार संजय खानला घेण्यात आले तोच चित्रपट हिट व्हायच्या ऐवजी फ्लॉप झाला! काळाचा महिमा अगाध असतो. आज ‘दुनिया का मेला’ या चित्रपटाची आठवण देखील कुणाला नाही पण अमिताभने आलेल्या अपयशाला ताकद बनवून मोठ्या हिमतीने परिस्थितीचे लढा दिला आणि मोठे यश मिळवले. अमिताभ बच्चन यांच्या यशाचा लोकप्रियतेचा पैस अशा रीतीने प्रदीर्घ होत गेला!