Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

जेव्हा अभिनेत्री Helan हिला अंडरवर्ल्ड डॉनने मदत केली होती!
साठ आणि सत्तरच्या दशकातील भारतीय सिनेमातील प्रचंड लोकप्रिय आणि सर्वाधिक दिलखेचक डान्सर हेलन यांनी सातशे हून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. एकेकाळी चित्रपटात हेलन चा डान्स असणं हा सिनेमा यशस्वी होण्याची हमखास गॅरंटी असेच समजलं जायचं. त्यामुळे केवळ एका डान्स साठी सुद्धा त्यांना साठच्या दशकामध्ये अनेक चित्रपटात भूमिका दिल्या जायच्या नंतर हेलन यांना डान्स सोबतच चित्रपटात महत्त्वाच्या रोल मध्ये देखील सिनेमात कास्ट केले जावू लागले. नाजूक कमनीय बांधा, लख्ख गोरा वर्ण, आकर्षक चेहरा, नशीले डोळे आणि बिजली सारखी बेफाम नृत्य अदा.. यामुळे हेलन भारतीय सिनेमातील मोस्ट वॉन्टेड डान्सक्वीन बनली होती.
21 नोव्हेंबर 1938 या दिवशी ब्रह्मदेशची राजधानी रंगून येथे जन्मलेल्या हेलन यांचे बालपण अतिशय खडतर गेले. तिचे वडील अँग्लो इंडियन होते तर आई ब्रह्मदेशाची होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वणव्यात हे कुटुंब पुरतं होरफळून गेलं होतं. त्यामुळे रंगून सोडून भारतात आसाम मध्ये स्थलांतरीत होवून त्यानी आसरा घेतला. अगदी लहान वयापासूनच हेलन यांनी डान्सर म्हणून हिंदी सिनेमा प्रवेश केला. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, कोणीही पुरुष पाठीराखा नाही अशा अवस्थेत 1958 साली हेलनने तिच्यापेक्षा वयाने 26 वर्षाने मोठे असलेल्या पी एन अरोरा यांच्यासोबत लग्न केले. हे लग्न म्हणजे तिच्यासाठी एक नरक यातना ठरले.

पी एन अरोरा यांनी अक्षरशः हेलन यांचं शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. हेलनचा सर्व पैसा, दागिने त्याने आपल्या ताब्यात ठेवले. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला दोघांमध्ये मतभेद सुरू झाले 1974 साली पी एन अरोरा यांनी हेलन ला मारहाण करून तिचे सर्व दाग दागिने पैसा आपल्या ताब्यात घेऊन तिला घरातून हाकलून दिलं. आणि घराला कुलूप लावून अरोरा निघून गेला. बेसहारा लाचार हेलन सैरभैर झाली. तिने पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार करायचं प्रयत्न केला. पण तिचं काही ऐकलं नाही. तिने जेव्हा सांगितलं की माझे सर्व दाग दागिने पैसा अडका घेऊन तो पळून गेला आहे तेव्हा पोलिसांनी तिला हे सर्व दाग दागिने तू कुठून खरेदी केले त्याच्या पावत्या आणून दे मग आम्ही तपास सुरू करू असा सल्ला दिला. हेलन घाबरली ती अभिनेता दिलीप कुमार यांच्याकडे गेली आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली.
दिलीप कुमारने त्यावेळी मुंबईत (कु)प्रसिद्ध असलेल्या करीम लाला या अंडर वर्ल्डच्या डॉन ला फोन लावला. लँडलाईन वरील फोन उचलला गेला नाही तेव्हा दिलीप कुमार ने उर्दूमध्ये एक पत्र लिहून हेलन कडे दिले आणि डोंगरी येथे जाऊन करीमलाला भेट असे सांगितले. हेलन ते पत्र घेऊन डोंगरी येथे करीमलाला यांना भेटायला गेली. अंडरवर्ल्ड करीम लाला तेव्हा डोंगरी येथे राहत होता. तो त्याचा टेरर एरिया समजला जायचा. तो त्याच्या ऑफिसमध्ये कधीच बसायचा नाही. त्याच्या गल्लीमध्ये एका मोठ्या खुर्चीवर तो बसलेला असायचा. त्याच्या भोवती दहा-पंधरा पठाण त्याच्या संरक्षणासाठी उभे असायची.

संपूर्ण एरियामध्ये त्याची स्वतःची सिक्युरिटी असायची. हेलन जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले कारण एका स्त्रीने तिथे जाणे सर्वांना आश्चर्यकारक होते. हेलनचा पेहराव तिचं दिसणं आणि डोंगरीमध्ये तिने जाणं हे सगळच सर्वांना अचंबित करणार होते. हेलनने दिलीप कुमारने दिलेले पत्र करीम लालाच्या हातात दिले. त्याने ते पत्र त्यांचे सहाय्यक बहाद्दूरकडे दिले आणि त्याला सांगितले वाचून बघ काय लिहिलंय. त्यावर बहादूरने सांगितले की,” हे पत्र अभिनेता दिलीपकुमारने लिहिले आहे. त्यात लिहिलं आहे ही सिनेमातील एक मोठी एक्ट्रेस आहे. तिच्या नवऱ्याने तिला घरातून बेदखल केलेले आहे. तिला आपण मदत करावी. अशी दिलीप कुमारची इच्छा आहे.”
पत्रातील मजकूर वाचल्यानंतर करीम लाला ने सर्वांच्या समक्ष दिलीप कुमारला भरपूर शिव्या दिल्या आणि म्हणाले ,” त्याला एवढी पण अक्कल नाही का? की एका स्त्रीला एकटी तो कसं काय पाठवू शकतो? त्याने मला फोन करायला हवा होता किंवा कुणा कडूनही हे पत्र तरी पाठवलं असतं तरी मी हे काम केलं असतं.” नंतर त्याने बहादूरला सांगितलं,” जा तिला व्यवस्थित घरी पोहचवून ये.” नंतर तिला पूर्ण संरक्षणात दिलीप कुमार घरी सोडवलं. दिलीप कुमारला तिने सर्व वृत्तांत सांगितलं आणि त्यांना सांगितले की त्याने तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे तो तर खूप चांगला माणूस आहे.” दिलीप कुमार ने देखील आपली चूक कबूल केली आणि सांगितलं मी तुला तिथे पाठवायला नको होते.
================================
हे देखील वाचा : Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?
================================
दुसऱ्या दिवशी करीम लाला कडून दिलीपला फोन आला आणि हेलन ला तिच्या घरी पाठव असे सांगितले. हेलन आपल्या घरी गेली तेव्हा तिला आपलं घर उघडे दिसले तिचा घरचा नोकर तिथे बसलेला होता. त्याने सांगितले की तिच्या नवऱ्याने (पी एन अरोराने) सर्व दागिने पैसा संपत्ती गाडीच्या चाव्या आणि गाडी परत आणून दिलेली आहे. जे काम पोलीस करू शकले नाही ते करीम लाला ने चोवीस तासाच्या आत करून दाखवले. हा किस्सा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या When it all began या पुस्तकात लिहिला आहे.