दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा गीतरामायणाचे पहिलेच गीत हरवते तेव्हा…
आज चैत्र शुध्द प्रतिपदा गुढी पाडवा! हिंदू नववर्षारंभ. चैत्र मास आणि गीतरामायण (Geetramayana Story) हे मराठी रसिकमनाला कायम आवडणारे लोभस भावस्वप्न आहे. आज साठ – पासष्ट वर्ष उलटून गेली पण गदिमा यांच्या लेखणी आणि बाबूजींच्या सुरांनी अजरामर झालेले गीतरामायण (Geetramayana Story) प्रत्येक मराठी घराला आजही तितकेच आवडते, लुभावते. या कार्यक्रमाच्या अनेक आठवणी आहेत. त्यातील पहिल्याच गाण्याचा हा दिलचस्प किस्सा. पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लाड इ.स.१९५४ च्या काळात स्टेशन डायरेक्टर होते. (त्यावेळी पुणे आकाशवाणी केंद्र सेन्ट्रल बिल्डींग परिसरात होते.) त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करावयचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गदिमा यांना सीताकांत लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची (Geetramayana Story) निर्मिती झाली. सुधीर फडकेंच्या स्वर आणि सूरांनी या गीतरामायणाने मराठी रसिक मनाच्या तीन पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या. १ एप्रिल १९५५ च्या रामनवमीला सुरू झालेला हा सांस्कृतिक उत्सव पुढे वर्षभर चालला.त्या वर्षी अधिक मास असल्याने रसिकांना आणखी एक बोनस महिना मिळाला. त्या मुळे ५६ भागांची ही मालिका १९ एप्रिल १९५६ ला संपली! गीतरामायणाच्या (Geetramayana Story) पहिल्याच गीताच्या वेळी ’मिस कम्युनिकेशन’ मुळे मोठा गोंधळ झाला तो किस्सा ऐकण्यासारखा आहे. प्रतिभावान कलावंत काय करू शकतात याचा यातून प्रत्यय येतो.
आपल्या अत्यंत व्यस्त कार्यबाहुल्यातून वेळ काढून गदिमांनी गीतरामायणाचं पहिलं गीत लिहिलं आणि ते त्यांच्या जिवलग मित्रामार्फत (नेमिनाथ उपाध्ये) बाबुजींकडे पाठवूनही दिलं .आदल्या दिवशी रात्री रिहर्सलच्या वेळी बाबुजी गीत शोधू लागले तर ते मिळतंय कुठं ? इकडे गदिमा मात्र आपलं काम आता संपलं आहे अशा थाटात पंचवटीवर निवांत झोपले होते . गीतरामायण (Geetramayana Story) प्रकल्पाचे सर्वेसर्वा होते सीताकांत लाड! ते गदिमा आणि बाबूजी दोघांचेही जिवलग! बाबूजींनी पिशवी आणि पँटचे खिसे उलटेपालटे केले तरी गीत सापडता सापडेना म्हटल्यावर लाडांचं धाबं दणाणलं! त्यांनी पंचवटीवर गदिमांना बोलावण्याकरता माणूस पाठवला. गदिमा आले. उपाध्ये म्हणाले ” मी बाबूजींकडॆ गाणे कालच दिले’. गाणं बाबूजींकडून गहाळ झाळं होतं. ते देखील त्या दिवशी तणावाखाली होते कारण लहानगा श्रीधर घटसर्पाने फणफणला होता. एव्हाना रात्रीचे साडे बारा वाजले होते. दुसर्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता गाणं लाईव्ह आकाशवाणीवर वाजणार होतं! लाडांनी गदिमांना पुन्हा एकदा गीत लिहावयाची विनंती केली. आता गदिमा चिडले ’ फडक्यांच्या गबाळेपणाची शिक्षा मला कशाला?’ म्हणून भांडू लागले. लाड हुशार ! त्यांनी तो भांडाभांडीचा भर ओसरूं दिला आणि मग निर्णायक आवाजात अण्णांना सांगितलं, ’ उद्या सकाळी ब्रॉडकास्ट आहे. तेव्हा अण्णा, हे गीत तर तुम्हाला लिहिलंच पाहिजे. मी आता तुम्हाला इथल्या एका खोलीत बंद करून बाहेरून चक्क कडी घालणार आहे . काळजी न करणे. आत पान, तंबाखू . कागद , दौत लेखणी इत्यादी साधनसामग्रीची चोख व्यवस्था आहे. गीत लिहून झाले की, दारावर टकटक करणे!’.
=====
हे देखील वाचा : एक रुपया सायनिंग अमाउंट घेवून मधुबालाने हा सिनेमा केला!
=====
लाडांनी गदिमांना खरोखरीच आकाशवाणीतील एका खोलीत बंद केलं आणि दहापंधरा मिनिटाच्या अवधीतच गदिमांनी आतून टकटक केलं, लाडांनी दार उघडलं आणि गदिमांनी नव कोरं नऊ कडव्याचं गीतरामायणातील (Geetramayana Story) पहिलंपहिलं गीत त्यांच्या हवाली केलं ,’स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती!’ सुधीर फडके, प्रभाकर जोग यांनी पहाटे या गीताला चाल लावली व बरोब्बर ८.४५ ला शब्द-स्वर-आणि सूरांचा अविष्कार सुरू झाला !गमंत म्हणजे हे हरवलेले गीत नंतर सापडले. दोन्ही गाणी समोरासमोर ठेवून पाहीली तेव्हा एखादा शब्द इकडे तिकडे झाला होता! ही आठवण गदिमा यांच्या वेबसाईटवर दिली आहे. प्रभाकर जोग यांनी देखील त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. खरोखर असे चमत्कार गीतरामायण (Geetramayana Story) आकाराला येताना सतत घडत होते. म्हणूनच गदिमा आणि बाबूजी अत्यंत श्रद्धेने सांगतात की, गीतरामायण आम्ही केलेले नाही, ते आमच्या हातून झाले आहे.