
हा Indian Cinema भारतातील पहिला बोलपट या सन्मानापासून का वंचित राहिला?
भारतात बोलपटाचे आगमन 1931 साली झाले. अर्देशर इराणी यांच्या इम्पेरियल पिक्चर्स बॅनरखाली बनवलेल्या ‘आलमआरा’ या चित्रपटाचे प्रदर्शन 14 मार्च 1931 या दिवशी मुंबईच्या मॅजेस्टिक या थिएटरमध्ये झालं आणि हा भारतातील पहिला बोलपट ठरला. पण हा सन्मान खरं तर मादन थिएटर कलकत्त्याच्या एका चित्रपटाला मिळाला हवा होता.कारण तो सिनेमा ‘आलमआरा’च्या आधी बनला होता. परंतु ओव्हर डिसिप्लिन पद्धतीने बनवलेला तो चित्रपट ‘आलमआरा’ च्या नंतर अडीच महिन्यानंतर प्रदर्शित झाला आणि भारतातील पहिला बोलपट होण्याचा सन्मान प्राप्त करू शकला नाही. पहिला बोलपट होण्यापासून वंचित राहिला. खरंतर तो चित्रपट ‘आलमआरा’ च्या खूप आधीच पूर्ण झाला होता त्याचे शूट देखील ‘आलमआरा’ च्या बरेच आधी सुरू झाले होते. कोणता होता तो चित्रपट आणि काय होता नेमका किस्सा? (Indian Cinema History)

हॉलिवूडचा पहिला बोलपट ‘जाझ सिंगर’ १९२७ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर जगभर बोलपट निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतात देखील त्या पद्धतीने प्रयत्न सुरू झाले. कलकत्त्याच्या मादन थिएटर्स यांनी पहिला प्रयत्न सुरू केले. मादन थिएटर्सचे जे. एफ मदन यांनी मूकपटाच्या काळात अनेक चित्रपट निर्माण केले होते. त्यांनीच ‘शिरी फरहाद’ या कथानकावर पहिला बोलपट निर्माण करायचे ठरवले. त्याकाळी बोलपटाचे तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे भारतीय टेक्निशियन्सला हे तंत्रज्ञान माहित नव्हते. त्यामुळे मादन थिएटरने हॉलीवुडहून टेक्निशियन्स बोलावले. या चित्रपटाचा नायक होता मास्टर निस्सार. मूकपटाच्या काळात तो लोकप्रिय नायक होता. त्यापूर्वी तो पारशी थिएटर्समध्ये स्त्री पार्ट करत असे.

सिनेमाच्या नायिकेचा शोध सुरु झाला. कलकत्त्याच्या कोठ्यावरील जहांआरा कज्जन हिला साइन केले गेले. मास्टर निस्सारला त्याकाळी महिना दोन हजार पगार होता. तर कज्जनला महिना पाचशे रुपये! ती त्या पैशात देखील खूष होती. कारण कोठ्यावर मिळणाऱ्या पैशापेक्षा ही रक्कम अधिक होती. हॉलीवूडवरून आलेल्या टेक्निशियनच्या मदतीने चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. हॉलिवूडची चित्रपट निर्मितीची एक स्टाईल होती ते ओवर टाइम करत नसायचे. वेळेत काम सुरू करायचं आणि वेळेत संपवायचं अशी त्यांच पद्धत होती. त्यामुळे रोज मोजकेच पण व्यवस्थित शूटिंग होत असे. टेक्निशियन्सला संध्याकाळचा वेळ त्यांच्या वैयक्तिक आनंदासाठी राखीव ठेवावा लागायचा. या काळात ते क्लब, जिम, स्पोर्ट्स एन्जॉय करायचे!
याच काळात तिकडे मुंबईला इम्पिरियल थिएटरचे अर्देशर इराणी यांनी ‘आलम आरा’ या बोलपटाची निर्मिती सुरू केली. या चित्रपटात मास्टर विठ्ठल, झुबेदा आणि पृथ्वीराज कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे टेक्निशियन्स काही हॉलिवूडचे होते तर काही भारतीय होते. अर्देशीर इराणी यांनी चित्रपट दिवस-रात्र शूट करून लवकर पूर्ण केला. कलकत्त्याला ‘शिरी फरीहाद’ पूर्ण झाला होता परंतु टेक्निशियन्स त्यावर आपला अंतिम हाच फिरवत होते. एडिटिंग करत होते. यामध्ये वेळ लागत होता. अर्देशर इराणी यांनी मात्र 14 मार्च 1931 या दिवशी मुंबईच्या मॅजेस्टिक थिएटरमध्ये ‘आलमआरा’ हा चित्रपट प्रदर्शित करून टाकला आणि हाच भारतातील पहिला बोलपट ठरला. खरंतर ‘शिरी फरीहाद’ हा चित्रपट ‘आलमआरा’ च्या आधीच तयार झाला होता परंतु ओव्हर डिसिप्लिन पद्धतीने बनवल्या गेल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन ‘आलम आरा’च्या रिलीज नंतर अडीच महिन्यानी 30 मे 1931 या दिवशी झाले! आणि ‘शिरी फरीहाद’ हा चित्रपट भारतातील पहिला बोलपट होण्याच्या सन्मानापासून वंचित राहिला. खरंतर या सिनेमाचे शूट ‘आलम आरा’ पूर्वी सुरु झाले होते आणि आधी तयार झाला होता!
================================
================================
या दोन्ही सिनेमातील गाणी त्या काळात लोकप्रिय झाली होती पण आज यातील एकही गाणे आणि चित्रपटाची प्रिंट उपलब्ध नाही. 1931 ते 1935 या काळात मास्टर निस्सार आणि काज्जन बाई ही जोडी लोकप्रिय ठरली. शिरी फरीहाद, लैला मजनू, शकुंतला, बिल्व मंगल, इंद्रसभा, छात्र बकावली….. असे या जोडीचे अनेक चित्रपट येत राहिले. त्या काळातील चित्रपटांवर संगीत नाटकांचा प्रभाव असल्यामुळे चित्रपटात गाण्यांची संख्या प्रचंड असायची. शिरी फरीहाद या चित्रपटात 42 गाणी होती ते ‘इंद्रसभा‘ या चित्रपटात तब्बल 72 गाणी होते. त्या काळात प्रेक्षक संगीत नाटकाप्रमाणे चित्रपटात एखाद गाणं आवडलं तर त्याला वन्स मोअर ची दाद द्यायचे. पण नाटकाप्रमाणे येथे वन्स मोअर घेता यायचा नाही. त्यामुळे मादन थिएटर्स चे जे जे मादन यांनी एक आयडिया केली. ज्या ज्या गाण्याला वन्स मोर मिळायचा ते गाणे दुसऱ्या चित्रपटात जशाचे तसे ते समाविष्ट करायचे. प्रेक्षक देखील नवीन गाणं म्हणून ते एन्जॉय करायचे!
