‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सचिन पिळगावकर यांचे महागुरू कोण ?
मंडळी, महागुरू म्हटलं की, अभिनेते सचिन पिळगावकर हे आपल्याला लगेच आठवतात. झी मराठी वरील ‘एकापेक्षा एक’ या नृत्यस्पर्धेत परीक्षक म्हणून काम करीत असताना त्यांना मिळालेलं हे बिरुद, ही आज त्यांची ओळख ठरली आहे. परंतु आपल्या या महागुरूंचे महागुरू कोण बरं असावेत? असा कधी विचार केलाय का हो तुम्ही??
आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत सचिनजींच्या महागुरूविषयी. ‘सिल्वर स्क्रीन’ या पुस्तकामध्ये इसाक मुजावर यांनी सचिनजींच्या बालपणातील एक आठवण सांगितली आहे. १९६१ साली ‘जंगली’ हा चित्रपट पडद्यावर आला. त्यावेळी सचिनजी अवघे चार वर्षांचे होते. त्या लहानग्या वयात जंगली चित्रपटातील ‘याहू’ या गाण्यातील शम्मी कपूर यांच्या नृत्याचा ताल पकडून ते त्याप्रमाणे नाच करीत असत. त्यांच्या या नृत्यकौशल्यामुळेच त्यांचा मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून प्रवेश झाला आणि “हा माझा मार्ग एकला” या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारच्या मराठी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पारितोषिक देखील त्यांना मिळालं.
पुढे त्यांची कारकीर्द यशस्वीरीत्या चालू असताना विविध भूमिका त्यांनी सादर केल्या. अनेकवेळा त्यांचे नृत्यकौशल्यही पाहण्यास मिळाले. भारत-चीन युद्धाच्या वेळी जवानांसाठी निधी उभारण्याकारिता मराठी कलावंतांतर्फे अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम सादर केले जात असत, त्यात सचिनजी सादर करीत असलेले ‘याहू’ हे नृत्य हायलाईट बनून गेलं होतं. त्या नृत्यावर खूश होऊन अनेक रसिक सचिनजींच्या गळ्यात नोटांची माळ घालत असत. पुढे ही माळ त्यांच्यातर्फे जवानांनकरिता असलेल्या निधीसाठी दिली जात असे.
काही काळानंतर शम्मी कपूर यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात सचिनजींना आपल्या महागुरुंसोबत नाचण्याची संधीदेखील मिळाली. या चित्रपटासाठी शम्मी कपूर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचे पारितोषिकही मिळालं होतं. सचिन पिळगांवकर यांना आज महागुरू म्हणून ओळख मिळाली असली, तरी आपल्या नृत्यातील महागुरू असलेल्या शम्मी कपूर यांचं त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे.
शब्दांकन- धनश्री गंधे