
Talat Mahmood यांच्या पारखी नजरेने ‘या’ बासरी वादकाला शोधून काढले!
अतिशय गोड गळ्याचे गायक तलत महमूद हे जितकी सुंदर गाणी गात होते तितकेच ते चांगले गुणग्राहक देखील होते. भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळातील अनेक मेलडीअस गाणी त्यानी गायली आहेत. रात ने क्या क्या ख्वाब दिखाये, जिंदगी देने वाले सुन , जलते है जिसके लिए, सीने मे सुलगते है अरमा, फिर वोही शाम वोही गम वोही तन्हाई.. अशी एकाहून एक सुरीली गाणी तलतने आपल्या मखमली स्वरात गायली होती. अतिशय समृद्ध असा सांस्कृतिक वारसा त्यांच्या गाण्यातून आपल्याला दिसतो.
सुरुवातीला तपन कुमार या नावाने त्यांनी गायला सुरुवात केली. मुंबईत आल्यानंतर त्यांनी तलत महमूद या ओरीजनल नावाने गाणी गायली. त्यांनी हिंदीच्या व्यतिरिक्त भारतातील अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत. मराठीत देखील त्यांनी काही गाणी गायली होती. ‘पुत्र व्हावा ऐसा’ (१९६३) या चित्रपटातील ‘यश हे अमृत झाले’ हे त्यांचं गाणं मराठीतलं पहिलं गीत ठरलं. हे गाणं पी.सावळाराम यांनी लिहिलं होतं तर त्याला संगीत वसंत प्रभू यांनी दिलं होतं. या गाण्याला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देखील मिळाला होता.

ओडिया या भाषेत देखील त्यांनी एक गाणं गायले होते. हे गाणं त्यांनी मीना कपूर यांच्या सोबत गायले होते. गाण्याचे बोल होते ‘निरोला ए राते गाये के मधुरे‘ या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यामुळेच भारतीय चित्रपट संगीताला एक अतिशय प्रतिभावंत असा बासरी वादक मिळाला. तलत महमूद यांच्या रत्न पारखी नजरेने हा गुणी कलाकार भारतीय संगीताला मिळाला. खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. तलत महमूद यांनी कदाचित हे एकमेव ओडिया भाषेतील गाणे गायले असावे. हे युगलगीत त्यांनी मीना कपूर यांच्यासोबत झाले. गाण्याचे बोल होते ‘निरोला ए राते गाये के मधुरे‘ हे गाणं लिहिलं होतं नरसिंग महापात्रा यांनी. या गाण्याचे संगीतकार कोण याबद्दल इंटरनेटवर व्यवस्थित माहिती उपलब्ध नाही वाचकांपैकी कोणाला जर माहीत असेल तर त्यांनी याचा नक्की खुलासा करावा. ( या गाण्याला संगीतकार पी व्ही कृष्णमूर्ती यांनी संगीतबद्ध केले अशी देखील माहिती इंटरनेटवर मिळते!)
या गाण्याचे रेकॉर्डिंग कटक येथील आकाशवाणी केंद्रात झाले होते. तलत जेव्हा हे गाणे गात होते तेव्हा त्यांचे लक्ष त्यातील वादकांकडे गेले. एक बासुरी वादक अतिशय तन्मयतेने या गाण्याला बासरीची साथ देत होता. गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर तलत यांनी त्या बासरी वादकाला जवळ बोलावले आणि विचारले,” तू इतके सुंदर बासरी वाजवतो आहेस . खरं तर तू मुंबईच्या चित्रपटसृष्टीत यायला पाहिजे!” आणि त्याला मुंबईला यायचे निमंत्रण देखील दिले. त्या पद्धतीने तो मुंबईत आला पण मुंबईतला संघर्ष मोठा होता. हा बासरी वादक मुंबईत आला खरा पण ब्रेक थ्रू मिळत नव्हता तो काळ साधारणता 60 च्या दशकाच्या आरंभीचा होता.
तलत महमूद यांचा देखील चित्रपट संगीतातील वावर कमी झाला होता. पण एक दिवस चमत्कार झाला. त्या बासरी वादकाला फोन करून बोलावून घेतले गेले. ताडदेव येथील म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तो पोहोचला. पाहतो तर काय? समोरच त्याचे आराध्य दैवत तलत महमूद होते. त्याला पाहताच तलतने त्याला जवळ घेऊन त्याची विचारपूस केली. त्या दिवशी संगीतकार मदन मोहन यांच्या एका गाण्याचे रेकॉर्डिंग होते. चित्रपट होता ‘जहांआरा’. गाणे तलत महमूद गाणार होते. राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेलं गाण्याचे बोल होते ‘फिर वही शाम वही गम वही तन्हाई है दिल को समझाने तेरी याद चली आई है ..’ या बासरी वादकाने या गाण्यांमध्ये अतिशय सुंदर अशी बासरीची साथ या गाण्याला दिली.
================================
हे देखील वाचा : ….जेव्हा तलत महमूद कमालीचे भावनाविवश झाले!
================================
आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण हे गाणं ऐकतो त्यातील बासरीचे पिसेस मनाला मोहून टाकतात. मदन मोहन यांनी त्या बासरी वादकांची पाठ थोपटली आणि त्याला शुभेच्छा दिल्या. तलत महमूद देखील खूप आनंदित झाले आणि इथून त्या बासरी वादकाचा कला प्रवास सुरू झाला . पुढे सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील तर तो आघाडीचा बासरी वादक बनला. अनेक गाजलेल्या चित्रपटातील गाण्यांसाठी तो बोलावला जाऊ लागला. ऐंशी च्या दशकात तर त्याने संगीतकार म्हणून कामाची सुरुवात केली. हा बासुरी वादक होता पंडित हरिप्रसाद चौरसिया!