
सुनील दत्त आणि Nargis यांनी आपल्या लग्नाची बातमी पहिल्यांदा कुणाला सांगितली होती?
सिनेमात येण्यापूर्वी अभिनेता सुनील दत्त रेडिओ सिलोनवर मनोरंजक कार्यक्रम सादर करत असे. एका कार्यक्रमात ते चित्रपट कलावंतांच्या मुलाखती घेत असे. त्यावेळी बलराज दत्त या नावाने ते कार्यक्रम सादर करत असायचे. या कार्यक्रमात त्यांनी एकदा अभिनेता देव आनंद यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीच्या दरम्यान देव यांनी सुनील दत्तचे हँडसम रूप आणि डिसेंट बॉडी लँग्वेज पाहून सिनेमात काम करण्याचा सल्ला दिला होता. दोघेही पंजाबचे असल्यामुळे दोघांमध्ये मैत्री देखील लवकर झाली. नंतर काही वर्षांनी सुनील दत्त सिनेमामध्ये आले. मग मैत्री आणखी गहिरी झाली. दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे चालू झाले.
याच रेडिओ कार्यक्रमात सुनील दत्त यांनी अभिनेत्री नर्गिस हिची देखील मुलाखत घेतली होती. ही मुलाखत घेताना सुनील दत्त प्रचंड नर्वस झाले होते. आणि त्यांना अक्षरश: शब्द फुटत नव्हते. पण नर्गिसने त्यांना सांभाळून घेतले. त्यावेळी सुनील दत्तला कल्पना नव्हती की काही वर्षानंतर हिच आपली जीवन साथी बनणार आहे! ‘मदर इंडिया’ चित्रपटाच्या शूट च्या दरम्यान दोघे प्रेमात पडले आणि या दोघांनी अतिशय गुप्तपणे लग्न केले त्यांच्या लग्नाचा दिवस होता ११ मार्च १९५८. लग्नानंतर ते पहिल्यांदा कुणाला भेटले आणि तो नेमका प्रसंग काय होता याचा इंटरेस्टिंग किस्सा देव आनंद यांनी त्यांच्या ‘रोमांसिंग विथ लाईफ’ या आत्मचरित्रामध्ये लिहिला आहे!

अभिनेता देव आनंद जेव्हा आपल्या जुहूच्या बंगल्याचे काम करत होते त्यावेळी त्यांनी जुहू बीचवर एक बंगला भाड्याने घेतला होता. या बंगल्याच्या टेरेसवरून समुद्रकिनारा खूप छान दिसायचा पण देव आनंदला इंटरेस्ट होता सनसेट पाहण्याचा. आपल्या टेरेसवरून सनसेट पाहण्यासाठी कित्येकदा देव आनंद शूटिंग लवकर संपवून आपल्या घरी येत असे. एकदा असेच ते सनसेट पाहत असताना अचानक त्यांच्या घरच्या फोनची रिंग वाजली. देव आनंद यांनी फोन उचलल्यानंतर समोरून सुनील दत्त बोलत होते. ते त्या दिवशी बोलताना खूप आनंदात आणि उत्साहात आहेत असे देव यांना जाणवले.
सुनील दत्त फोन वर म्हणाले,” यार तुझसे मिलने को दिल करता है..” तेव्हा देव आनंद म्हणाले, “ यार , घर तुझंच आहे तू केव्हा येऊ शकतोस.” तेव्हा सुनील दत्त म्हणाले,” नक्की येणार आहे. आज आम्ही रात्री बारा वाजता तुझ्या घरी येऊ!” देव आनंद म्हणाला,” वेल कम पण रात्री बारा वाजता??” तेव्हा सुनील दत्त म्हणाला “हो. रात्री बारा वाजता. एक सरप्राईज आहे! “ देव ने हसत विचारले,” ते ठीक आहे. पण आम्ही म्हणजे कोण? आणखी कोण येणार आहे?” तेव्हा सुनील दत्त म्हणाले,” ते देखील एक सरप्राईज आहे!!”

रात्री ठीक बारा वाजता देव आनंदच्या बंगल्याची बेल वाजली. नोकराने दार उघडले तेव्हा दारात त्याला सुनील दत्त आणि नर्गिस दिसले! देवला खूप आश्चर्य वाटले. देवने विचारले ,” नर्गिस जी आप ? और इस वक्त ??” तेव्हा सुनील दत्त ने सांगितले,” आता ही नुसती नर्गीस नाही तर नर्गीस दत्त झाली आहे!! आजच आम्ही दोघांनी लग्न केले आहे.” देव आनंद आणि त्यांची पत्नी कल्पना कार्तिक यांना खूप आश्चर्य वाटले आणि आनंद देखील झाला. त्यांनी दोघांचे खूप आनंदात स्वागत केले. देव आनंद आणि नर्गिस यांनी १९५० साली ‘बिरहा की रात’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे शूटिंग महाबळेश्वर येथे झाले होते तेव्हा नर्गिसने देवला महाबळेश्वरच्या फ्रेडरिक हॉटेल बद्दल सांगितले होते. हे हॉटेल देव आनंदला इतके आवडले की त्यानंतर देव आयुष्यभर महाबळेश्वर ला आला की त्याच हॉटेलमध्ये उतरत असे.
या हॉटेलमधील रूम नंबर 11 ही त्याच्यासाठी खास रिझर्व असे. ‘बिरहा की रात’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान एकदा रात्री हॉटेलच्या बारमध्ये जेव्हा नर्गिस लेमोनेट पीस होती आणि देव आनंद बियर पीत होता त्या वेळेला देव आनंदने नर्गिस ला सांगितले होते की ,” तुझ्या सोबत जो लग्न करेल तो खूप लकी बॉय असेल . खूप नशीबवान असेल.” या प्रसंगाची आठवण करत त्या दिवशी देव नर्गिसला म्हणाला ,” मी तुला म्हणालो होतो ना तुझ्याशी जो लग्न करेल तो लकी बॉय असेल. आज माझा मित्र हा लकी बॉय ठरला आहे!” त्यावर सगळे जण खूप हसले. यानंतर देव आनंदने या दोघांना दुसऱ्या दिवशीच्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी देव च्या घरी पाकिस्तानहून आलेल्या फतेह अली खान यांचा कव्वाली कार्यक्रम होणार होता. देव म्हणाला,” तुम्ही दोघे या कार्यक्रमाला नक्की या.” त्यावर सुनील दत्त ने आभार मानत सांगितले,” आम्ही दोघे नक्की आलो असतो. पण आमचा एक प्रोग्राम आधीच ठरलेला आहे.”
================================
हे देखील वाचा : ‘कोमा’त गेलेल्या नर्गिसला सुनील दत्तने परत आणले!
================================
दुसऱ्या दिवशी फतेह अली खान त्यांचे बंधू आणि दहा वर्षाचा नुसरत हे सर्व जण देवच्या बंगल्यावर आले होते आणि हा कव्वाली मुकाबला पहाटे पाच पर्यंत चालला होता. पुढे बऱ्याच वर्षांनी एका अवार्ड फंक्शनमध्ये देव ची भेट नसरत फतेह अली खान यांच्या सोबत झाली तेव्हा देवने त्याला विचारले,” तुला आठवते का तू खूप लहान होतास. तेव्हा तुझे वडील आणि काका आमच्याकडे कव्वाली सादर करायला आले होते!” तेव्हा नसत फतेह अली खान यांनी सांगितले,” हो. माझे बाबा आणि काका नेहमी या कार्यक्रमाच्या फोटोचा अल्बम काढून आम्हाला दाखवतात आणि आमची मुंबई मधली सर्वात यादगार महफिल देव आनंद यांच्या बंगल्यावर झाली होती असे सांगतात. त्यामुळे मी देखील आज तुम्हाला भेटायला खूप उत्सुक होतो. देवआनंद यांनी त्यांच्या ‘रोमान्सिंग विथ द लाईफ’ या पुस्तकात चित्रपट आणि चित्रपटाच्या बाहेरच्या अनेक गोष्टी खूप तपशीलाने लिहिलेल्या आहेत.