
दिलीपकुमारला पहिल्यांदा पाहिल्यावर सायरा बानू का किंचाळली होती?
बॉलीवूडमध्ये लग्न होतात आणि फार कमी लग्न शेवटपर्यंत टिकतात. त्यापैकी एक टिकलेलं लग्न म्हणजे अभिनेता दिलीप कुमार आणि सायरा बानो (Saira Banu) यांचे. हे लग्न झाले तेंव्हा फार काळ टिकणार नाही असे सर्वजण म्हणत होते. त्याला कारण देखील तसेच होते. दिलीप सायाराच्या दुप्पट वयाचा होता. या लग्नापूर्वी त्याची काही अफेअर देखील झाली होती. पण गंमत म्हणजे या दोघांचे लग्न नुसते बहरलेच नाही तर शेवट पर्यंत टिकले. अर्थात या वैवाहिक जीवनात काही वादळे नक्की आली होती पण सायराने मोठ्या कौशल्याने परिस्थिती सांभाळली.

या दोघांच्या पहिल्या भेटीचा एक गमतीशीर किस्सा मध्यंतरी वाचण्यात आला. या दोघांची पहिल्यांदा जेव्हा भेट झाली त्या दिवशी दिलीप कुमारला पाहिल्यानंतर सायरा बानो (Saira Banu) हिने खूप जोरात किंकाळी ठोकली होती आणि ती घाबरून आपल्या रूममध्ये गेली होती. हे असं का झालं होतं याचा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. १९५६ साली एकदा दिलीप कुमार सायरा बानोच्या आईला म्हणजे नसीम बानूला भेटायला त्यांच्या नेपियन सी रोडवरील फ्लॅटमध्ये गेले होते. दिलीप कुमार त्यावेळी एस्टॅब्लिश स्टार होते. दिलीप कुमारने जेव्हा नसीम बानूच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा त्यांना वाटले एक तर नसीम बानू स्वतः दार उघडेल किंवा कोणी नोकर दार उघडेल. पण झालं वेगळंच. दार उघडलं एका १२-१३ वर्षाच्या मुलीने. त्या मुलीने चप्प तेल लावून दोन मोठ्या वेण्या बांधल्या होत्या. अंगावर घरचे साधे कपडे होते. दिलीप कुमारने ओळखले ही नसीम बानूची मुलगी सायरा आहे म्हणून.

त्याने प्रेमाने तिला हॅलो बेबी म्हटले. पण त्या हॅलो ला उत्तर द्यायच्या ऐवजी तिने घाबरून एक किंकाळी फोडली आणि ती आपल्या रूममध्ये पळून गेली. दिलीप कुमारच्या लक्षात आलं नाही की मला पाहून ही का घाबरली? पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, नंतर नसीम बानू हॉल मध्ये आल्या. दोघांच्या भरपूर गप्पा झाल्या. दिलीप कुमारने काही सायरा बानूचा विषय काढला नाही किंवा नसीम बानू देखील त्याबद्दल काही बोलली नाही. सायरा त्यादिवशी असं का वागली हे गूढच राहिलं. पण या असं वागण्याचा सस्पेन्स जवळपास ३०-४० वर्षानंतर सायरा बानो (Saira Banu) ने स्वतःच सांगितला. तिने दिलीपला पाहून जोराची किंकाळी का फोडली होती?
झालं असं होतं सायरा बानो (Saira Banu) लहानपणापासून दिलीप कुमारची प्रचंड फॅन होती. तिला त्याच्यासोबत काम करायचं होतं. हे तिच्या मनातलं एकमेव स्वप्न होतं. आणि ते स्वप्न ती रोज पाहत होती. ज्या दिवशी दिलीप कुमार तिच्या घरी आला त्या दिवशी ती घरच्या साध्या कपड्यामध्ये होती. डोक्याला चप्प तेल लावून वेण्या घातल्या होत्या. एकंदरीत तिचा गबाळा अवतार होता. त्यामुळे ती प्रचंड घाबरली, नर्व्हस झाली. तिला वाटलं दिलीप कुमारची हीरोइन व्हायचं असेल तर स्मार्ट, सुंदर दिसायला पाहिजे आणि या पोशाखात ती कुठल्या ही अँगलने स्मार्ट वाटत नव्हती. आपल्या मनातला राजकुमार साक्षात समोर पाहून तिला खरं आनंद व्हायला हवा होता पण आपण घातलेले कपडे आणि आपला अवतार लक्षात आल्यानंतर ती प्रचंड घाबरली!

आता दिलीप कुमारची आपण काही हीरोइन होऊ शकत नाही म्हणून ती घाबरून किंकाळी फोडून आपल्या रूममध्ये गेली आणि दोन-तीन तास रडत बसली. तिने मनोमन नक्की विचार केला की दिलीप कुमारच्या हीरोइन खूप स्मार्ट असतात. आपण त्याच्या कुठल्याही सिनेमाची हीरोइन होऊ शकत नाही. कारण आपला अवतार त्याने पाहिलेला आहे. (Saira Banu)
=================
हे देखील वाचा : ‘माझी ओळख ‘मदर इंडिया’ म्हणूनच रहावी’ असे नर्गीस का म्हणत ?
=================
फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन त्यामुळे आपण आता दिलीपची हीरोइन होऊ शकत नाही. दिलीपला विसरून जाणे योग्य. पण मन मनाला तयार नव्हतं. त्यामुळे ती दोन-तीन तास रडत बसली. पण भाग्याचा खेळ पहा. सायरा (Saira Banu) केवळ दिलीपची हिरोईनच झाली नाही तर त्याची अर्धांगिनी झाली. ११ ऑक्टोबर १९६६ या दिवशी दोघांचा निकाह झाला. त्यानंतर त्या दोघांनी गोपी, सगीना, बैराग,दुनिया या सिनेमात दोघांनी एकत्र काम केले. रील लाईफ मध्ये त्यांची केमिस्ट्री जमली नाही पण रियल लाईफमध्ये परफेक्ट जमली!