अभिनेता नसरुद्दीन शहा ‘या’ दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर का नाराज झाला?
अभिनय सम्राट दिलीप कुमार यांच्यासोबत रुपेरी पडदा शेअर करता यावा ही मनीषा प्रत्येक भारतीय कलावंताची असायची आणि या अभिनय सम्राटसोबत जर जुगलबंदी करायची संधी मिळाली तर तो प्रत्येकाच्या कला जीवनातील एक महत्त्वाचा क्षण राहिलेला असायचा. अगदी सुरुवातीपासून दिलीप कुमारसोबत अभिनयाची टक्कर द्यायला प्रत्येक जण उत्सुक असायचा. (Naseeruddin Shah)
दिलीप कुमार तसा मल्टीस्टार सिनेमात खूप कमी चमकला. सोलो हिरो म्हणूनच त्याचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर असायचा. तरीदेखील राज कपूरसोबतचा ‘अंदाज’ (१९४९), अशोक कुमारसोबत ‘दीदार’(१९५१), देव आनंद सोबतचा ‘इंसानियत’ (१९५५), मोतीलालसोबतचा ‘देवदास’ (१९५५), संजीव कुमार सोबतचा ‘संघर्ष’(१९६८) आणि ‘विधाता’(१९८२) अमिताभ बच्चन सोबतचा ‘शक्ती’ (१९८२) हे त्याचे तुल्यबळ अभिनेत्या सोबतचे काही मोजकेच चित्रपट.
ऐंशीच्या दशकापासून दिलीप कुमार चरित्र भूमिका करू लागला तेव्हा मात्र तो नवीन कलावंतांच्यासोबत देखील तितक्याच ताकदीने उभा राहू लागला. यावेळी नवीन कलाकारांना देखील दिलीप कुमारसोबत आपली अभिनयाची जुगलबंदी व्हावी असं वाटायचं. नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) लहानपणापासून दिलीप कुमारचा मोठा फॅन होता. त्याच्यासोबत आपल्याला काम करायला मिळावं ही त्याची मनापासूनची इच्छा होती. १९८६ साली त्याची ही इच्छा पूर्ण झाली. चित्रपट होता सुभाष घेई यांचा ‘कर्मा’.
या चित्रपटाची स्टारकास्ट जबरदस्त होती. दिलीप कुमार, नूतन, अनुपम खेर, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसरुद्दीन शहा, पूनम धिल्लन, श्रीदेवी…. त्या अर्थाने तो मल्टीस्टार सिनेमा होता. दिलीप कुमारसोबत काम करायला मिळते म्हणून प्रत्येक जण उत्सुक होता. नसरुद्दीन शहाला (Naseeruddin Shah) त्यामध्ये दिलीप कुमार सोबतचा एक पाच मिनिटाचा मोठा सीन मिळाला होता. ज्यात दोघांची खटकेबाज संवादाची जुगलबंदी होती.
नसिरुद्दीन शाह खूप आनंदी होता. आपल्याला दिलीप कुमार सोबत अभिनयात टक्कर द्यायची आहे ही मनापासूनची त्याची इच्छा आता पूर्ण होत होती. परंतु दिग्दर्शक सुभाष घई यांनी नसरुद्दीन शहा यांच्या इच्छेवर पाणी फेरले. कारण हा शॉट चित्रीत करताना त्यांनी सेपरेट चित्रित केला, म्हणजे नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) जेव्हा त्याचे डायलॉग म्हणत होता तेव्हा त्याच्यासमोर दिलीप कुमार नव्हता आणि दिलीप कुमार जेव्हा डायलॉग म्हणत होता त्या सर्व तेव्हा त्याच्यासमोर नसिरुद्दीन शहा नव्हता. खरंतर ही जुगलबंदी जबरदस्त होती. नसरुद्दीन शहा दिलीप कुमारला जोरदार सुनावतो आणि दिलीप कुमार आपल्या हातातील लॅम्प रागात फेकून देतो असा तो शॉट होता .या दोघांचे स्वतंत्र शूट करून नंतर त्याचे सिंक्रोनायझेशन सुभाष घई यांनी केले होते.
नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) सुभाष घई यांच्या या निर्णयावर प्रचंड चिडला होता. त्याचे सुभाष घईसोबत भांडण झाले होते. तो म्हणाला , ”तुम्ही मुद्दाम असं करत आहात. तुम्हाला नक्कीच कुणीतरी काही सूचना केलेल्या आहेत!” सुभाष घई यांनी त्याचा आरोप फेटाळत, ”हा माझा स्वतःचा एका दिग्दर्शकाचा निर्णय आहे असे सांगितले. हाता तोंडाशी आलेली फेस टू फेस डायलॉग बाजी करण्याची संधी हातातून निघून गेलेली होती. असे दिग्दर्शक सुभाष घई यांनी असे का केले याचे उत्तर मिळत जरी नसले तरी दिलीप कुमार यांच्या सांगण्यावरूनच त्याने असे केले असावे असे त्या काळातील मीडियामध्ये छापून आले होते. कॅमेराचा फोकस आपल्यावर राहावा असा दिलीप कुमारचा कायम आग्रह असायचा असे आरोप त्याच्या अनेक सहनायकांनी त्या काळात केले होते .
=========
हे देखील वाचा : ‘स्वदेस’मधील या गाण्याचे रेकॉर्डिंग हॉटेलच्या एका रूममध्ये केले होते!
=========
नसिरुद्दीन शहाचा नंतर या सिनेमात काम करण्याचा उत्साह संपुष्टात आला. कसेबसे त्याने शूटिंग उरकले. त्या सिनेमाच्या प्रीमियरला देखील तो गेला नाही. त्यानंतर सुभाष घईसोबत त्याने एकाही चित्रपटात काम केले नाही. नाही म्हणायला घई प्रॉडक्शनच्या ‘इकबाल’ या चित्रपटात त्याने भूमिका केली होती. पण या सिनेमाचे दिग्दर्शन नागेश कुकणूर यांनी केले होते. नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) यांच्या आत्मचरित्रात देखील त्याने या घटनेचा उल्लेख केला आहे.