कटी पतंग मध्ये शर्मिला ऐवजी आशा पारेखची निवड का केली गेली?
शर्मिला टागोर म्हणताच रसिकांची आजची पिढी ‘ही तर तैमूर खान’ ची आजी असे म्हणून मोकळीही झाली असेल. तशी शर्मिला टागोरची अनेक नात्यांतून ओळख होते, भारतीय क्रिकेट संघाचा एकेकाळचा यशस्वी आणि शैलीदार, देखणा कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांची पत्नी. आजच्या पिढीचा लाडका हीरो सैफ आणि सोहा अली खान यांची आई. तसेच बेबो अर्थात करिना कपूरची सासू. करिनाचे चुलत आजोबा शम्मी कपूर यांची ‘कश्मिर की कली’ (१९६४) ची नायिका बनून शर्मिला टागोरने बंगाली चित्रपटसृष्टीतून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले….
शर्मिला टागोरचा फ्लॅशबॅक खूपच मोठा आणि त्यात काही विशेष उल्लेखनीय गोष्टीही खूप.
शक्ती सामंता दिग्दर्शित ‘ॲन इव्हिनिंग इन पॅरिस’ (१९६७) निर्मिती अवस्थेत असतानाच फिल्म फेअरच्या कव्हरपेजवर बाथींग सूटमधील शर्मिला टागोरचा फोटो प्रसिद्ध होताच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आश्चर्याचा धक्काच बसला. तो काळच तसा होता. नायिका परंपरावादी साडीत, पंजाबी ड्रेसमध्ये आणि खलनायिका बिकीनी, बाथींग सूट, क्लब ड्रेस, वेस्टर्न ड्रेस अशी चक्क ‘फोडणी’ होती. अशातच शर्मिला टागोरचं असं रुपडं? काही महिन्यांनी हा चित्रपट रिलीज झाला आणि समुद्रातील स्केटींग करीत असलेल्या शर्मिला टागोरला उद्देशून हेलिकॉप्टरमधून शम्मी कपूर मोहम्मद रफीच्या आवाजात गातो, आसमान से आया फरिश्ता. आणि शर्मिला आपल्या गालावरची खळी खुलवत म्हणते, ज्या ज्या…. त्या काळात इतकं हॉट गाणे म्हणजे कल्चरल शॉक होता. पिक्चर हिट झाल्याने हे सगळेच जणू ‘कॅश’ झाले. शर्मिला टागोरने ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’ अशा चित्रपटात पारंपरिक व्यक्तिरेखा तर ‘आमने सामने’, ‘यकिन’ अशा मसालेदार चित्रपटात शॉर्ट्समध्ये दर्शन घडवत करियरचा छान बॅलन्स ठेवला. एकिकडे इमेजची सॉफ्ट फिगर सांभाळली, दुसरीकडे आपली ग्लॅमरस फिगर जपली.
‘आराधना’ (१९६९) रिलीज होईपर्यंत तो सर्वसाधारण चित्रपट होता (म्हणूनच मी नेहमी म्हणतो, कोणत्याही चित्रपटाचा फस्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याच्या यशापयशाची कल्पना कधीच नसते). पण मग ‘एक नवीन फिल्मी इतिहास’ घडला. राजेश खन्नाच्या क्रेझचा उदय झाला. खरं तर या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत शर्मिला टागोरचे नाव अगोदर आहे आणि मग राजेश खन्नाचे! कारण ती सिनियर आणि हा चित्रपट नायिकाप्रधान!! त्यानंतर या जोडीच्या ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘त्याग’, ‘मलिक’, ‘राजा रानी ‘, ‘दाग’, ‘आविष्कार ‘ अशी रांगच लागली. काही चांगले म्हणून चालले, काही फसले म्हणून पडले.
‘कटी पतंग’ मध्येही शर्मिला टागोरच होती पण ती तेव्हा गरोदर असल्याने आशा पारेखची निवड केल्याचे याचे दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी नटराज स्टुडिओतील त्यांच्या ऑफिसमधे सविस्तर मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी मला सांगितले.
शर्मिला टागोरने शशी कपूरसोबत ‘पाप और पुण्य’ नावाच्या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी अगोदर डिंपल कपाडियाची निवड झाली होती. पण तिने राजेश खन्नाशी लग्न करुन संसाराला महत्व दिल्याने हा चित्रपट शर्मिला टागोरकडे गेला…
अशी शर्मिला टागोरची वाटचाल खूपच मोठी. राजेन्द्रकुमार (तलाश, १९६९), देव आनंद (यह गुलिस्ता हमारा, १९७०), दिलीपकुमार (दास्तान, १९७२) यांची नायिका बनण्याचे स्वप्न पूर्ण केले, पण हे तीनही चित्रपट पडद्यावर आल्या आल्याच कोसळले.
आता एवढी मोठी आणि यशस्वी वाटचाल, विविधरंगी अनुभव म्हटल्यावर याच क्षेत्रातील इतरही संधी खुणावणारच. ऐंशीच्या दशकाच्या मध्यास तसे घडले आणि इतकी वर्षे पडद्यावर पाहत आलेल्या शर्मिला टागोरशी ‘पहिली भेट’ अनुभवली. पण कुठे? तर शर्मिला टागोरकडे ‘टेक टू’ या नावाच्या एका चित्रपट साप्ताहिकाच्या संपादकाची जबाबदारी होती. वृत्तपत्राच्या आकाराचे आणि ‘स्क्रीन’ ला स्पर्धा करण्यासाठी ते होते. ते काही काळाने बंदही पडले. सेलिब्रेटिजना ‘एडिटर’ करण्याचे फॅड नुकतेच सुरु झाले होते आणि आमच्या नवशक्ती दैनिकाचे भावंड फ्री प्रेसमधील एक रिपोर्टर ‘टेक टू’मध्ये पार्ट टाईम काम करे. त्यातून योगायोगाने तशी छोटीशीच भेट झाली. पण जेव्हा ‘शॉर्ट टर्म मिटींग असते, तेव्हा काही वेगळ्या गोष्टी आठवणीने व्यक्त करायच्या असतात’ अशा जणू नियमानुसार शर्मिला टागोरच्या ‘आविष्कार’, ‘गृहप्रवेश’ अशा सहजी कोणी नाव घेणार नाही अशा चित्रपटांचा केलेल्या उल्लेखाने शर्मिला टागोर इम्प्रेस देखिल झाली आणि एक चहादेखिल झाला…..
या बंगाली अभिनेत्रीने एका मराठी चित्रपटात भूमिका साकारलीय याची तुम्हाला कल्पना नसेल. अमोल पालेकर दिग्दर्शित आणि अभिनित ‘समांतर’ (२००८) हा तो चित्रपट आहे. (त्यात राधिका आपटेही होती). या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून शर्मिला टागोरच्या ‘जेमतेम पंधरा मिनिटांच्या मुलाखती’ चा योग आला. एक मुलाखत “देऊन” झाली की दुसरी असा योग या काळात वाढत होता. हा अनुभव काही वेगळ्या गोष्टीने रंगत नाही. अधिकच काही विचारता येत नाही. फक्त ‘मुलाखत घेतली छापली/दाखवली’ एवढेच कर्तव्य पार पडते.
महेश मांजरेकर दिग्दर्शनातील महत्वाचा चित्रपट ‘विरुद्ध’च्या (२००५) निमित्ताने ‘फरार’ (१९७५) आणि ‘देशप्रेमी’ (१९८१) या चित्रपटानंतर अमिताभ आणि शर्मिला टागोर एकत्र आले म्हणजे या फिल्मच्या मुहूर्ताला हजर राहायला हवेच. पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा इव्हेन्टस भारी रंगला. शर्मिला टागोरच्या एकूणच देहबोलीत एक चांगली संधी मिळाल्याचा आनंद जाणवला. खरा कलाकार कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर कलाकारच असतो.
तर ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली २०१९ मध्ये भारताचा दौरा अनुभवत असतात राज्य शासनाच्या वतीने त्याना जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी खास सन्मानित करण्यात आले तेव्हा ‘निवडक पाहुण्यां’मध्ये मीदेखिल होतो. तिथे शर्मिला टागोरच्या भेटीचा योग आला असता तोच उत्साह, तसेच विशिष्ट शैलीतील बोलणे आणि तोच रुबाब जाणवला (सोबतचा फोटो). आणि अर्थातच यावेळच्या छोट्याश्या भेटीत ‘समांतर’, ‘विरुद्ध’ अशा वेगळ्या पठडीतील चित्रपटांची आठवण काढणे फळले….
दिलीप ठाकूर