
Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ सिनेमाच टायटल साँग लाँच!
Ye Re Ye Re Paisa 3: ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या दोन्ही यशस्वी चित्रपटांनंतर आता या फ्रँचाईजीचा तिसरा भाग म्हणजे ‘येरे येरे पैसा ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एका भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले आणि या खास प्रसंगी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या आगमनामुळे या कार्यक्रमाला एक वेगळंच ग्लॅमर आणि उत्साह मिळाला. सलमान खानने या गाण्याचे मनापासून कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्याच्या मते, हे गाणं अत्यंत उत्साही आणि प्रभावी असून त्यावरूनच चित्रपट किती धमाल असेल याचा अंदाज येतो. सलमानने विनोदीपणे हेही सांगितले की, या चित्रपटाच्या चौथ्या भागात तो स्वतः सहभागी व्हायला तयार आहे.( Ye Re Ye Re Paisa 3 Title Song)

गाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या जोशपूर्ण आवाजात हे गाणं अधिकच रंगतदार झालं आहे. अमितराज यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्याला आवश्यक ती उर्जा लाभली असून इतर गाण्यांना पंकज पडघन यांचं संगीत लाभणार आहे. हे दमदार गाणं सचिन पाठक यांनी लिहिलं असून त्यातील कलाकारांची एनर्जी पाहता, प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक मेजवानी ठरणार आहे, यात शंका नाही. धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत, अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीत सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, गिरीधर धुमाळ आणि सौरभ लालवाणी यांचा सहभाग आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले की, ‘येरे येरे पैसा ३’ ही केवळ एक फ्रँचाईजी नसून प्रेक्षकांशी जोडलेला एक भावनिक प्रवास आहे. यावेळी त्यांनी अधिक मोठं, साहसिक आणि थरारक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन यांनी सलमान खानच्या उपस्थितीमुळे या म्युझिक लॉन्च कार्यक्रमाचे महत्व अधिकच वाढल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, या टायटल साँगमधून चित्रपटाची धमाल झलक प्रेक्षकांना दिसली असून आता पूर्ण धमाका मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. (Ye Re Ye Re Paisa 3 Title Song)
=======================================
हे देखील वाचा: Sai Tamhankar ला करायच होत आमिर खान शी लग्न म्हणाली, ‘मी आमिरच्या ‘दिल… ‘
=======================================
दिग्दर्शक संजय जाधव यांच्या कुशल दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात आणि जयवंत वाडकर यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. आता या टायटल साँगने निर्माण केलेल्या उत्सुकतेमुळे प्रेक्षक ‘येरे येरे पैसा ३’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.