आणि कुलवधूचं गीत झालं…
झी मराठी आणि उत्तम शीर्षकगीतं यांचं अतूट नातं आहे. एखाद्या मालिकेचं शीर्षकगीत आणि गीतकाराच्या मनातील किंवा वैयक्तिक आयुष्यातील सुखद आठवणी या जोडल्या जाण्याचा सुद्धा एक उत्तम योगायोग असू शकतो. असं घडलं होतं ते झी मराठी वर सुरु होणाऱ्या ‘कुलवधू’ मालिकेच्या बाबतीत !
गीतकार अश्विनी शेंडे हिच्या आयुष्यातील एक सुखद आठवण आहे. तिचा साखरपुडा होता आणि त्यासाठी तिने प्रचंड उत्साहाने हातावर कोपरापर्यंत मेंदी काढली होती. संगीतकार निलेश मोहरीरचा अश्विनीला फोन आला. तेव्हा अगदी सिनेमात दाखवतात तसे दुसऱ्या कोणीतरी फोन घेऊन तो फोन अश्विनीच्या कानाशी धरला होता. निलेशने सांगितले की झी मराठीसाठी ‘कुलवधू’ मालिकेसाठी शीर्षकगीत लिहून दे.
अश्विनीने त्याला विचारले की गाणे कधी हवं आहे ? निलेशने सांगितलं की उद्या रेकॉर्डिंग आहे. अश्विनी निलेशला म्हणाली, “तू विसरलास का ? माझा उद्या साखरपुडा आहे आणि तुला साखरपुड्याचे आमंत्रण आहे. मी आत्ता पूर्ण हात भरून मेंदी काढली आहे. कसं लिहू? “त्यावर निलेश म्हणाला की मेंदी धुवून टाक आणि गाणे लिही. अश्विनीने स्पष्ट सांगितले की दुसऱ्या कोणाच्याही साखरपुड्यासाठी मेंदी काढली असती, तरी ती मी उतरवली नसती. ही मेंदी उद्या पहाटे उतरेल. पहाटे लिहून देते. “निलेशला अश्विनीचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून अश्विनीने मेंदी उतरवली आणि अर्धवट मेंदी उतरल्या लालचुटुक रंग चढत जाणाऱ्या हातांनी तिने गीत लिहिलं होतं,
“माझी डोली चालली ग, दूरदेशी नव्या गावा तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा” ‘कुलवधू’ च्या मनातील भावना अगदी अचूकपणे अश्विनीने रेखाटल्या. गाण्याचे पुढचे शब्द माहित आहेतच, “एक नदीसारखे वाहते मी जणू पाऊलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू” संगीतकार निलेश मोहरीर याने त्या गीताला उत्कृष्ट चाल दिली आणि वैशाली माडे हिच्या स्वरात ते गीत ध्वनिमुद्रित झाले.