‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
झुंडला स्थगिती…
सैराटफेम नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित चित्रपट झुंड कायद्याच्या कसाट्यात सापडला आहे. झुंड चित्रपटामधून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये दमदार प्रवेश करण्याच्या नागराज मंजुळे यांच्या स्वप्नाला सध्यातरी कोर्टाची स्थगिती लागली आहे. आधीच या चित्रपटाच्या निर्मितीच्यावेळी अनेक वादांना नागराज मंजुळे यांना तोंड द्यावं लागलं होतं. खुद्द अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटामधून माघार घेतली होती. मात्र नंतर अमिर खान यांच्या मध्यस्थिनंतर अमिताभ बच्चन पुन्हा झुंडमध्ये परतले. आता दोनच दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर आपल्या सोशल अकाऊंटमधून रिलीज केले. या टिझरला लाखो लाईक मिळाले. त्यात अजय-अतूल या जोडीच्या संगीताची झलकही सुपरहीट ठरली. मात्र हे होत असतांनाच तेलंगणा उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनलाच स्थगिती दिल्यानं पुन्हा एकदा झुंड वादात सापडला आहे.
सैराट आणि नाळ नंतर झुंड हा नागराज मंजुळे यांच्यासाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटातून त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरु होतोय. या चित्रपटाच्या निर्मात्या सविता हिरेमथ आहेत. खोसला का घोसला या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. सैराटच्या यशानंतर त्यांनी नागराज मंजुळे यांची भेट घेऊन आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शन करण्याचा आग्रह केला. तसंच अमिताभ बच्चन यांनाही त्यांनी मुख्य भूमिकेसाठी आग्रह केला होता. झुंडची कथा आणि सैराटमधील नागराज यांचं दिग्दर्शन पाहून अमिताभ बच्चन यांनीही होकार दिला. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी आल्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव तिथे चित्रिकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन चित्रपटाच्या बिघडलेल्या शेड्यूलमुळे नाराज असल्याची बातमी होती. अखेर बिग बींची समजूत काढून नागपूर येथे झुंडचं चित्रिकरण पार पडलं होतं.
झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी झुंडमध्ये साकारली आहे. झोपडपट्टीमध्ये राहणा-या आणि वेळप्रसंगी हातात मिळेल त्या साधनांनी मारामारी करणा-या मुलांना एक करुन हे शिक्षक एक फुटबॉलची टीम तयार करतात. हा चित्रपट फूटबॉलपट्टू अखिलेश पॉल यांच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा करीत हैदराबाद येथील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कारण त्यांनी यापूर्वीच अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे हक्क विकत घेतले होते. मात्र झुंडमधून अमिताभ बच्चन यांनी साकारलेली विजय बारसे ही व्यक्तीरेखा अखिलेश पॉल यांच्या जीवनावर आधारीत असल्यामुळे कॉपीराईट हक्कांचा भंग झाल्याची तक्रार नंदी कुमार यांनी केली. आता कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही डीजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. याशिवाय झुंडच्या निर्मात्यांनी माझी फसवणूक केली. माझ्यावर दबाव आणला असा आरोपही नंदी कुमार यांनी केला आहे. तसेच अखिलेश पॉल यांनीही आपली फसवणूक केल्याचा आरोप नंदी यांनी केला आहे.
दोनच दिवसापूर्वी अमिताभ बच्चन यांनी या झुंड चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजातला व्हीओ आणि अजय अतुल यांच्या संगीताची एक झलक यात आहे. त्यामुळे झुंडच्या टिझरला लाखो लाईकही मिळाले. या चित्रपटात सैराटमधील हीट जोडी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्याही भूमिका आहेत. आठ मे रोजी झुंड ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शीत होणार होता. मात्र त्यानंतर त्याला काही कारणानं ब्रेक लागला. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचे प्रदर्शन होणार होते. त्याला कोर्टानंच स्थगिती दिल्यानं झुंड अधिक चर्चेत आला आहे. आता झुंडवरुन कोर्टाची स्थगिती कधी काढण्यात येईल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.