दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘या’ अभिनेत्रीच्या ‘टॉपलेस’ फोटोने देशात उडाली होती मोठी खळबळ!
नव्वदच्या दशकात एका अभिनेत्रीने टॉपलेस फोटोशूट करून मोठी खळबळ उडवून दिली होती. हा टॉपलेस फोटो एका सिनेमॅक्झिनच्या कव्हरवर झळकला आणि देशभर व्हायरल झाला. (लक्षात घ्या, तो काळ मोबाईलच्या आगमनापूर्वीचा होता.) त्या दिवशी देशभर त्या फोटोने प्रचंड मोठी खळबळ उडवून दिली. पंधरा रुपये किमतीच्या या मॅगझीनला त्या दिवशी चक्क शंभर रुपये भाव आला होता. म्हणजेच या फोटोमुळे हे मॅगझीन त्या दिवशी तब्बल सहा ते सात पट ब्लॅकमध्ये विकले गेले. या टॉपलेस फोटोचा पुढे या अभिनेत्रीला कितपत फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे, पण त्याकाळी या अभिनेत्रीने मोठे सेन्सेशन निर्माण केले होते हे नक्की. (Mamta Kulkarni)
हा किस्सा आहे वीस वर्षापूर्वीचा! १९९३ सालचा! ‘स्टारडस्ट’ या मॅगझीनला काही तरी वेगळी आणि खळबळ उडवून देणारी स्टोरी करायची होती. विदेशातील मॅगझीनच्या कव्हर पेजवर अभिनेत्रींचे जसे टॉपलेस फोटो असतात तसा टॉपलेस फोटो आपल्या बॉलीवूड अभिनेत्रीचा हवा होता. या मॅगझिनचे फोटोग्राफर जयेश सेठ यांनी त्याकाळातील आघाडीच्या अभिनेत्रींकडे म्हणजेच माधुरी दीक्षित, जुही चावला आदी अभिनेत्रींकडे हा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिला. त्यानंतर कुणी ‘न्यू कमर ॲक्ट्रेस’ असे फोटोशूट करेल का, याची चाचपणी करण्यात आली. यातूनच अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला विचारणा करण्यात आली.
ममता कुलकर्णी १९९३ सालच्या ‘तिरंगा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली होती. सुरुवातीला सैफ अली खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्यासोबत तिला भूमिका मिळत होत्या, पण तिला टॉपची अभिनेत्री व्हायची घाई लागली होती. टॉपच्या अभिनेत्यांसोबत (सलमान खान, अमीर खान, संजय दत्त) तिला हिंदी सिनेमाचा स्क्रीन शेअर करायचा होता .सुरूवातीला तिनेही असल्या फोटोशूटला नाहीच म्हटलं, पण मॅगझीनकडून तिचे व्यवस्थित ‘काउन्सिलिंग’ करण्यात आलं. परदेशातली अभिनेत्री ‘डेमी मूर’चा दाखला दिला गेला. या फोटोमुळे तुझ्या करिअरला चांगले दिवस येतील, असं सांगितलं गेलं! (Mamta Kulkarni)
१९९३ हे वर्ष भारतासाठी मोठं उलाढालीचे वर्ष होतं. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारून दोनच वर्ष झाली होती. जग एक मोठी बाजारपेठ बनत होतं. आता प्रत्येक गोष्टीला एक ‘सेलेबल कॉस्ट’ आली होती. परदेशातील टीव्ही वाहिन्या भारतात दिसू लागल्या होत्या. एम टीव्ही सारख्या चॅनेलच्या माध्यमातून भारतीयांची ‘नजर’ तयार होवू लागली होती. हे सर्व विस्ताराने सांगायचे कारण या संक्रमणावस्थेत भारतीय मिडिया देखील ‘बोल्ड’ होत चालला होता. पारंपारिक विचारांना छेद मिळत होता. या टप्प्यावर हे ‘टॉपलेस शूट’ प्रकरण आले.
ममताला काहीतरी ‘सेन्सेशनल’ करून प्रेक्षकांपुढे यायचं होतंच आणि तशी आयती संधी तिला ‘स्टारडस्ट’ मासिकाच्या माध्यमातून चालून आली. ममता सुरुवातीला या फोटोशूटबद्दल साशंक होती, पण छायाचित्रकार जयेश शेठ यांनी तिला हा फोटो अजिबात अश्लील न वाटता तिचं सौंदर्य आणखी खुलाविणारा असेल, असं सांगितलं. हो, नाही, हो, नाही करत करत शेवटी ममताने फोटोशूट केलं. (Mamta Kulkarni)
फक्त जीन्स पॅन्ट आणि वर अनावृत्त अशा अविर्भावात तिचा फोटो तयार झाला. तिने आपल्या सेक्रेटरीला तसंच आपल्या पालकांना या असल्या फोटोशूटची काहीही कल्पना दिली नव्हती. सप्टेंबर १९९३ च्या अंकात कव्हर पेजवर तिचा ‘टॉपलेस फोटो’ झळकला आणि एकच खळबळ उडाली. त्या दिवशी दिवसभर ममताच्या टॉपलेस फोटोची चर्चा चालू होती. परदेशातील मिडीयाने देखील ममताच्या टॉपलेस फोटोची दखल घेतली. (Mamta Kulkarni)
इकडे भारतात मात्र तिचे निर्माते या फोटोबाबत नाराजी व्यक्त करू लागले. कोरियोग्राफर सरोज खान ममताच्या या फोटो शूटवर नाराज होऊन म्हणाल्या, “तू तुझ्या करीयरची वाट लावत आहेस.” (त्या वेळी वातावरण किती सोवळे होते बघा!!) सिनेनिर्मात्यांना ममताच्या येणाऱ्या चित्रपटाना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, याची काळजी वाटू लागली कारण देशभर ममताच्या विरुद्ध निदर्शनं सुरू झाली होती. अश्लील फोटोसेशन केल्याबद्दल तिच्यावर देशभर खटले दाखल होऊ लागले. तिच्या घरच्यांनी देखील या फोटोबाबत नाराजी व्यक्त केली. ममतादेखील नर्व्हस झाली. ठरवलं काय होतं आणि झालं काय, असं तिला वाटलं. पण काही दिवसांनी चमत्कार घडला.
दिग्दर्शक रिक्कू राकेश नाथ यांनी एकदा ममता कुलकर्णीला माधुरी दीक्षितच्या ‘दिल तेरा दिवाना’ चित्रपटाच्या प्रीमियरला बोलावलं. नैराश्यात असलेली ममता घाबरतच प्रीमियरला पोचली. आणि मागच्या रांगेत जाऊन बसली. पण राकेश नाथ यांनी तिला स्टेजवर बोलावलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या युवावर्गाने एकच जल्लोष केला. तिच्या दिशेने गुलाबाची फुले फेकून “ममता वुई लव यु, ममता वुई लव यु” असे नारे द्यायला सुरुवात केली. ममताला हे सर्व नवीन होतं. कालपर्यंत नैराश्यात असलेली ममता एकदम मूडमध्ये आली. (Mamta Kulkarni)
=====
हे देखील वाचा – ‘या’ कारणासाठी बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकाने गोळ्या झाडून कुटुंबाला आणि स्वतःला देखील संपवलं….
=====
बऱ्याचदा आपण चुकीचा विचार करून दु:खी होत असतो. प्रत्यक्षात वेगळंच घडणार असतं. त्या बोल्ड फोटोशूटमुळे देशातील तरुणवर्गात ती भयंकर फेमस झाली होती. आजच्या भाषेत सांगायचं, तर ती तरुणाईची ‘क्रश’ बनली होती. दुसऱ्या दिवशीपासून तिने आपला ॲटीट्यूड बदलला आणि नव्या जोमाने ती कामाला लागली. या तिच्या बोल्ड अदेने तिला चित्रपट मिळाले, पण करीयर घडवू शकली नाही. २०१६ साली तिचे नाव अंमली पदार्थाच्या तस्करीत आलं होतं.