दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मुंबईचा फौजदार: प्रत्येकाने आवर्जून बघावी अशी लग्नांनंतरची धमाल-विनोदी प्रेमकहाणी
एक हँडसम पोलीस इन्स्पेक्टर…त्याच्या आयुष्यात आलेली एक सुंदर तरुणी आणि काही कारणांनी त्याला दुसऱ्या मुलीशी मनाविरुद्ध करावं लागलेलं लग्न… मग ती दुसरी मुलगी नायकाला जिंकून घेण्यासाठी सर्व प्रयत्न करते आणि अखेर नायक नायिकेच्या प्रेमात पडतो. हो … हो … आजच्या बहुतांश मालिकांमध्ये, मग ती हिंदी असो किंवा मराठी, थोड्याफार फरकाने अशीच कथा दाखवण्यात येते. त्यामुळे ही कथा काही आपल्यासाठी नवीन नाही. पण ही कथा नवीन होती १९८४ साली. (Mumbaicha Fauzdar)
मालिकांचा विषय तूर्तास आपण बाजूला ठेवू कारण तसंही त्यावर बोलण्यासारखं फार काही नसतंच. पण १९८४ साली प्रदर्शित झालेला ‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटाबद्दल मात्र बोलण्यासारखं आणि लिहिण्यासारखं खूप काही आहे. असं म्हणतात की, जगात फक्त ७ कथा आहेत आणि या ७ कथांपासूनच पुढे अनेक कथा तयार होतात. पण या तयार होणाऱ्या कथांपैकी ठराविक कथांवरच चित्रपट बनतात आणि त्यातले मोजकेच चित्रपट सुपरहिट होतात.
‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटाची कथा नवीन नसली तरी ती अतिशय सुंदर पद्धतीने फुलवण्यात आली आहे. त्यामुळेच हा चित्रपट बघताना कुठेही कंटाळवाणा होत नाही. लग्नानंतर हळुवार फुलत जाणाऱ्या प्रेमाला विनोदाची फोडणी देऊन दिग्दर्शक राजदत्त यांनी एक अप्रतिम, हलका फुलका मनोरंजक चित्रपट बनवला आहे. (Mumbaicha Fauzdar)
भारतीय चित्रपटांमध्ये गाणी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो. मुंबईचा फौजदार इथेही अव्वल ठरतो. “सहजीवनात आली ही स्वप्नसुंदरी…”, “हा सागरी किनारा…” अशा सुंदर गाण्यांचा चित्रपटाच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे.
मुंबईमध्ये पोलीस इन्स्पेक्टरची नोकरी करणारा हँडसम, डॅशिंग पोलीस इन्स्पेक्टर जयसिंगराव मोहिते (रवींद्र महाजनी), क्राईम स्टोरीज वाचण्याची आवड असणारी गावातील सरपंचांची मुलगी सकू (रंजना) आणि पत्रकार असणारी मॉडर्न माधुरी (प्रिया तेंडुलकर) असा प्रेमाचा त्रिकोण असणाऱ्या चित्रपटामध्ये शरद तळवलकर, रुही बेर्डे, जयराम कुलकर्णी आदी कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (Mumbaicha Fauzdar)
जयसिंगच्या मित्राच्या घरी त्याची आणि माधुरीची ओळख होते. जयसिंग माधुरीच्या प्रेमात पडतो. पण जयसिंगच्या वडिलांना माधुरी पसंत पडेल का, हा मोठा प्रश्न असतो. माधुरीला टिपिकल ‘कांदेपोहे कार्यक्रम’ मान्य नसतो, तर जयसिंगचे वडील म्हणजे परंपरा पाळणारे. जयसिंगच्या मित्राची पत्नी माधुरीला त्यांच्या घरी घेऊन जाते. त्यानंतर जयसिंगच्या वडिलांचं पत्र येतं की, आम्हाला मुलगी पसंत आहे. वडिलांनी माधुरीला पसंत केलं आहे, असं समजून जयसिंग स्वप्नांचे इमले रचतो. पण ती मुलगी माधुरी नसते, तर सकू असते.
माधुरीसारख्या मॉडर्न मुलीशी लग्न करायचं स्वप्न बघणाऱ्या जयसिंगचं गावंढळ, वेंधळ्या सकूसोबत लग्न झाल्यावर त्याची होणारी चिडचिड आणि सकूची घालमेल दिग्दर्शकाने अत्यंत मजेशीर पद्धतीने दाखवली आहे. लग्नानंतरही माधुरीची स्वप्न पाहणाऱ्या जयसिंगसमोर जेव्हा जेव्हा सकू येते, ते प्रसंग खरंतर ड्रामॅटिक होऊ शकले असते, पण दिग्दर्शकाने ते कटाक्षाने टाळलं आणि इथेच चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. (Mumbaicha Fauzdar)
जयसिंग आणि सकूच्या लग्नानंतर सकूच्या गावंढळ वागण्यामुळे होणाऱ्या गमती जमती अत्यंत सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आल्या आहेत. सकूचे गावाकडचे ठसकेदार संवाद चित्रपटात रंगत आणतात. सकू शेजारच्या पाजारच्या लोकांकडून नारळ किंवा तत्सम वस्तू मागून आणते. जयसिंगला जेव्हा हे कळतं तेव्हा तो तिच्यावर ओरडतो. त्यामुळे या सर्व वस्तू ती रात्री परत नेऊन देते. हा प्रसंग अत्यंत मजेशीर पद्धतीनं दाखवण्यात आला आहे.
गावात वाढलेल्या सकूला मुंबईतल्या मॉडर्न वातावरणाशी जुळवून घेणं, तिथल्या चालीरीती समजून घेणं कठीण जातं. त्यात पत्नीचा अधिकार आणि पतीचं प्रेमही तिच्या वाट्याला येत नाही. तिचा पती सतत तिच्यावर चिडत असतो. तिच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलणं तर दूर, उलट तिचा राग राग करत असतो. पण सकूचं दुःख दाखवताना कोणत्याही प्रकारचा ‘मेलोड्रामा’ चित्रपटात दाखवण्यात आलेला नाही.
===========
हे देखील वाचा – महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सीरियल किलिंगच्या घटनेवर आधारित ‘माफीचा साक्षीदार’
===========
आपल्या आयुष्यात आलेल्या परिस्थितीचा सामना सकू कसा करते, ती स्वतःला कशी बदलते, जयसिंगचं प्रेम कसं जिंकून घेते हे सगळं चित्रपटात बघताना खूप धमाल येते. सकूचा प्रवास अत्यंत सुंदर पद्धतीनं चित्रित करण्यात आला आहे. दिवंगत अभिनेत्री ‘रंजना’ यांनी साकारलेली सकू निव्वळ अप्रतिम! त्यांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार? रवींद्र महाजनी, प्रिया तेंडुलकर, शरद तळवलकर यांच्या भूमिकाही सुंदर जमून आल्या आहेत. चित्रपटाचा शेवटही अत्यंत सुंदर आणि वास्तववादी झाला आहे. (Mumbaicha Fauzdar)
हा चित्रपट रोमँटिक -कॉमेडी प्रकारात मोडतो. कुठलेही अश्लील संवाद नाहीत, इंटिमेट सीन्स नाहीत, हाणामारीची दृश्य नाहीत की, कुठला ‘मेलोड्रामा’ नाही. आहे फक्त लग्नानंतरची एक गोड प्रेमकहाणी. एक हलका फुलका रोमँटिक कॉमेडी चित्रपट बघायचा असेल, तर मुंबईचा फौजदार आवर्जून बघा. हा चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. त्यामुळे त्यासही कुठलंही सब्स्क्रिप्शन घ्यायची गरज नाही.