‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
एका गॉगलमुळे बिग बींचा चित्रपट आला होता आयटीच्या रडारवर; काय होता हा किस्सा?
सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अर्धवट किंवा प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. हे चित्रपट पूर्ण का झाले नाही किंवा प्रदर्शित का झाले नाही याची अनेक कारणे आहेत. यातीलच एका अप्रदर्शित चित्रपटाची ही कहाणी आणि त्यातील एक किस्सा.
दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एस रामनाथन अमिताभ बच्चन यांचे आवडीचे दिग्दर्शक. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनीच अमिताभला ‘बॉम्बे टू गोवा’(१९७२) या चित्रपटात ब्रेक दिला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांची तिहेरी भूमिका असलेला ‘महान’(१९८३) या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील रामनाथन यांनी केले होते. अमिताभ, रजनीकांत आणि कमल हसन या तीन सुपरस्टार्सना घेऊन बनवलेल्या ‘गिरफ्तार’(१९८५) या चित्रपटाची निर्मितीही एस रामनाथन यांचीच होती.
१९९६ साली ज्यावेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या पाच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा चित्रपट दुनियेत आले त्यावेळी त्यांनी याच रामनाथन यांचा ‘जमानत’ नावाचा एक चित्रपट साइन केला होता. ६ जून १९९६ या दिवशी या सिनेमाचा मुहूर्त झाला होता. रजनीकांत या वेळी उपस्थित होते. या सिनेमाच्या नावाला ‘…. अँड जस्टीस फॉर ऑल’ ही टॅग लाईन जोडली होती.
१९७९ साली याच नावाने ‘अल पचिनो’चा एक चित्रपट आला होता आणि तो देखील कोर्ट रूम ड्रामा होता. या चित्रपटात अमिताभ पहिल्यांदाच एका अंध वकिलाची भूमिका साकारत होते. चित्रपटाचे कथानक एका अंध वकिलाचा जीवनावर होते. एका बॉम्ब ब्लास्टमध्ये या वकीलाचे डोळे जातात; तो आंधळा होतो. पुढे हा अंध वकील एका खटल्यामध्ये एका प्रामाणिक व्यक्तीला न्याय मिळवून देतो. चित्रपटाची कथानक पूर्णपणे अमिताभ बच्चन भोवती फिरणारे होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुपम खेर, करिष्मा कपूर, अर्षद वार्सी यांच्या भूमिका होत्या.
चित्रपटातील अमिताभच्या अंध भूमिकेला एका काळ्या चष्म्याची (गॉगल) गरज होती. दिग्दर्शक एस रामनाथन यांनी अमिताभ बच्चन यांना एक स्पेशल गॉगल वापरण्यास सांगितले. हा लूक प्रेक्षकांना खूप आवडेल असेही त्यांनी सांगितले. त्यावेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अमेरिकेच्या दौर्यावर होते. न्यूयार्क मधून त्यांनी एक सनग्लास (गॉगल) विकत घेतला. अतिशय किमती असलेल्या या सनग्लासची फ्रेम इटालियन होती. त्याला सोनेरी बोर्डर होती. या ब्रँडेड गॉगलची किंमत होती फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये!
हा गॉगल घेऊन अमिताभ बच्चन भारतात आले आणि थेट चेन्नईला गेले जिथे ‘जमानत’ या सिनेमाचे शूटिंग होणार होते. एस रामनाथन यांना तो गॉगल खूप आवडला आणि हाच गॉगल घालून अमिताभने ‘जमानत’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण केले. त्या काळात अमिताभ बच्चन त्याच्या अन्य व्यवधानांमध्येच जास्त बिझी असल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग, डबिंग एडिटिंग सर्वच लांबत लांबत गेले. शेवटी कसाबसा हा चित्रपट २००६ साली पूर्ण झाला. सिनेमा पूर्ण झाल्यावर ‘गॉगल’ अमिताभने दिग्दर्शक एस रामनाथन यांना देऊन टाकला.
या चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) गॉगलची त्या काळात खूप मोठी चर्चा मीडियामध्ये होऊ लागली. त्याच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवून मीडिया मधून जाहीर होऊ लागल्या. या अफाट किमतीच्या बातम्या वाचून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सिनेमाचे दिग्दर्शक एस रामनाथन आणि अमिताभ बच्चन यांना नोटीस बजावली. अमिताभ बच्चन यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवले, “आपण समजता तेवढी या गॉगलची किंमत नाही. मीडियातील किमतीचे आकडे चुकीचे आहेत.”
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे फॅन्स या कारवाईमुळे चिडले आणि त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिस समोर निदर्शने सुरू केली. मामला गंभीर होत गेला. दोन्ही बाजूंनी राडा वाढत गेला. त्यामुळे ‘जमानत’ या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले. ते इतके लांबले आहे की, हा चित्रपट आजवर प्रदर्शितच झालेला नाही!
====
हे देखील वाचा – शबाना आझमी यांनी दोन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न कारण…
====
२०१३ साली हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शनासाठी सज्ज झाला परंतू नेमकं त्याच वेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक एस रामनाथन यांचे निधन झाल्याने पुन्हा चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले. आता एस रामनाथन यांचा मुलगा हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित करणार असल्याच्या चर्चा आहेत.