‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
दिलीपकुमारने बारसं केलेलं अनोखं ‘कॉकटेल’ एकेकाळी प्रचंड लोकप्रिय झाले होते
हा किस्सा है निर्माता दिग्दर्शक अमरजीत (Amarjeet) यांचा! हा किस्सा तसा ‘नॉन फिल्मी’ जरी असला तरी सिनेमाशी निगडित असाच आहे. अमरजीत साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शक होते. त्यांचे हम दोनो, तीन देवीया, गॅम्बलर हे सिनेमे खूप गाजले होते. देव आनंदचे ते लाडके दिग्दर्शक होते. संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ ही त्यांचीच निर्मिती होती.
‘अमरजीत’ हे बहुआयामी कलावंत होते. त्यांनी काही सिनेमातून अभिनय देखील केला होता. दिग्दर्शक अमरजीत पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला तो १९६१ सालच्या ‘हम दोनो’ या चित्रपटातून. संगीतकार जयदेव यांचे अतिशय कर्णमधुर संगीत असलेला हा चित्रपट देव आनंदच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक समजला जातो. यात देवचा डबल रोल होता. या सिनेमाचे दिग्दर्शन अमरजीत यांनी केले असले तरी त्याच्या पाठीमागे विजय आनंदचा अदृश्य हात होता हे कुणीही नाकबूल करणार नाही.
१९६५ साली ‘तीन देवीया’ हा चित्रपट अमरजीत यांनी दिग्दर्शित केला होता. ‘लिखा है तेरी आंखोमे किसका फसाना’, ‘अरे यार मेरी तुम्ही हो गजब’, ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’, ‘कही बेखयाल होकर’ ही अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. अमरजीत यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा कृष्णधवल जरी असला तरी आजही रसिकांच्या स्मरणात आहे.
१९७० सालचा ‘गॅम्बलर’ हा सिनेमा देवानंद आणि जाहिदा यांच्या मुख्य भूमिका असलेला अमरजीत यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. यात देखील सचिनदा यांच्या संगीतातील गाणी प्रचंड गाजली. अपने होठो कि बन्सी बनाले मुझे ,चुडी नही मेरा दिल है, दिल आज शायर है गम आज नगमा है ही गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या ‘तीन देवीया’ या चित्रपटाचे इंग्रजी व्हर्शन देखील ‘अ बॉय थ्री गर्ल्स’ या नावाने आले होते. या सिनेमाला ए सर्टिफिकेट होते. अमरजीत यांची दिग्दर्शनाची इमेज ही कायम दुर्लक्षित राहिली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांवर विजय आनंद आणि देवानंद यांचा पगडा असल्याने अमरजीत यांचे कर्तुत्व कायम झाकूनच राहिले.
अमरजीत हे नर्गिसचे भाऊ अख्तर हुसेन यांचे जावई होते. अख्तर हुसेन यांची मुलगी रेहाना ही त्यांची पत्नी. अमरजीत यांची आणखी एक खासियत होती ते ‘कॉकटेल’ खूप चांगल्या पद्धतीने बनवत असत. फिल्मी पार्ट्यांमध्ये ‘कॉकटेल’ बनवण्यामध्ये ते खूप माहीर होते. मिरचीच्या चटणीचा कॉकटेल मध्ये वापर करून त्याला ती वेगळीच चव आणून देत होते. (Lesser Known story of Amarjeet and Dilip Kumar)
रशियन व्होडक्यामध्ये हिरवी मिरची कापून नुसती फिरवल्यानंतर त्याचा फक्त स्वादच वाढत नाही, तर त्यामुळे बसणारी किक देखील वेगळी असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले होते. त्यामुळेच फिल्मी दुनियेत त्यांचे नाव ‘कॉकटेल मास्टर’ म्हणून फेमस झाले होते. त्यांच्या कॉकटेल्सचा सगळीकडे बोलबाला होता.
१९७४ साली सुनील दत्त यांच्या ‘नहले पे दहला’ या चित्रपटाचा ‘ट्रायल शो’ होता. या सिनेमाची नायिका होती सायरा बानो. या ‘ट्रायल शो’ला दिलीप कुमार यांना निमंत्रित केले होते. दिलीप कुमार सारख्या मोठ्या हस्तीचे आगत – स्वागत करण्याची संपूर्ण जबाबदारी सुनील दत्त यांनी अमरजीत यांच्यावर सोपवली होती. सगळेकडे ताज्या टवटवीत फुलांच्या सुशोभित लॉनवर पार्टी चालू होती. त्यावेळी अमरजीत यांनी दिलीप कुमार यांच्यासाठी मस्त कॉकटेल बनवून पेश केले.
दिलीप कुमार यांना त्याचा स्वाद खूपच आवडला. त्यांनी अमरजीतला जवळ बोलून विचारले, “या कॉकटेलचे नाव काय आहे?” त्यावेळी अमरजीतने सांगितले, “याचे अजून नाव काहीच ठरले नाही. आज पहिल्यांदाच आपल्यासाठी बनवले आहे. आता आपणच याचे बारसे करावे.” (Lesser Known story of Amarjeet and Dilip Kumar)
दिलीप कुमार खुश झाले. हसत हसत त्यांनी आजूबाजूला पाहिले. सर्वत्र त्यांच्या स्वागतासाठी फुलांचे ताटवे उभारले होते. ते पाहून ते अमरजीतला म्हणाले, “आज से हम इस कॉकटेल का नाम रखते है ‘गुल- ए- मेहेर.” उर्दूमध्ये ‘मेहेर’ या शब्दाचा अर्थ प्रेम असा होतो. त्यानंतर दिग्दर्शक अमरजीत या कॉकटेलला ‘गुल ए मेहेर’ या नावानेच पुकारू लागले.
==========
हे देखील वाचा – तब्बेत ठीक नसतानाही मोहम्मद रफी यांनी ‘या’ अभिनेत्यासाठी केले पुन्हा रेकॉर्डिंग
==========
अनेक हॉटेल्समध्ये त्यांचा हा ब्रँड त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरला होता. फिल्मी पार्ट्यांना या कॉकटेलने बहार आणली. खुद्द दिलीप कुमारने त्याचे बारसे केल्याने ते अधिक लोकप्रिय ठरले. योगायोगाने याच काळात दिलीप कुमार यांचा ‘बैराग’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होत होता. या चित्रपटातील एक गाणे ‘पीते पीते कभी कभी यूं जाम बदल जाते है…’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.