आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
चित्रीकरणा दरम्यान आशा पारेख करत होती राजेश खन्नाचा अपमान, पण तरीही तो गप्प राहिला कारण…
राजेश खन्ना (Rajesh Khanna)आणि आशा पारेखचा हा किस्सा तसा खूप जुना आहे. राजेश खन्ना चित्रपटसृष्टीमध्ये येण्याआधी नाटकात कामे करत असे. एका टॅलेंट सर्चमध्ये राजेश खन्ना पहिल्या क्रमांकाने निवडला गेला आणि रंगभूमीवर रमलेल्या राजेश खन्नाला चित्रपटात पहिल्यांदा ब्रेक मिळाला तो चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ या चित्रपटातून. या सिनेमात त्याची नायिका होती इंद्राणी मुखर्जी. हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला. त्यानंतर त्याला दुसरा ब्रेक दिला तो दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी.
राजेश खन्ना त्यावेळी सुपरस्टार नव्हता आणि नासिर एक ‘लो बजेट’ चित्रपट बनवत होते. त्यामुळे त्यासाठी राजेश खन्नाच्या नावाचा विचार केला. हा चित्रपट कृष्णधवल असणार होता. त्यामुळे या चित्रपटात प्रस्थापित नायक घेणं त्यांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी एखाद्या नवीन अभिनेत्याला संधी द्यायची ठरवली, ज्याच्याकडे डेट्सचा प्रॉब्लेम नसेल आणि त्याला मानधन देखील कमी द्यावे लागेल. याच दरम्यान त्यांनी राजेशला पाहिलं आणि त्यांची निवड थांबली. त्यांनी राजेशला चित्रपटासाठी ‘साइन’ केले. त्या काळात नासिर हुसैनच्या जवळपास प्रत्येक सिनेमाची नायिका आशा पारेखच असायची. इतकंच नाही, तर तेव्हा या दोघांच्या अफेअरची चर्चा देखील सिनेवर्तुळात चांगलीच रंगली होती.
जेव्हा नासिर यांनी आशा पारेखला तिच्या नवीन हिरोची ओळख करून दिली त्यावेळेला तिने नाक मुरडले. तिने नासिर हुसेन यांना स्पष्टपणे सांगितले, “मी याच्यासोबत काम करणार नाही..” तिच्या दृष्टीने विचार करता ते बरोबरही होते कारण ती त्याकाळातली आघाडीची नायिका होती. शम्मी कपूर, देव आनंद, जॉय मुखर्जी, मनोज कुमार, प्रदीप कुमार यांच्या सोबत तिने हिट चित्रपट दिले होते. त्यामुळे राजेश खन्ना सारख्या नव्या अभिनेत्यासोबत काम केल्याने तिच्या कारकिर्दीमध्ये अडथळा येऊ शकला असता. (Untold story of Rajesh Khanna and Asha Parekh)
नासिर हुसेन यांनी तिला हरतऱ्हेने समजावून सांगितले. इतकंच नाही तर, “हा कलाकार रंगभूमीवरील कलाकार आहे. चांगला अभिनय करतो आणि एका मोठ्या टॅलेंट सर्च मध्ये तो निवडला गेलेला आहे.” एवढे सांगूनही आशा पारेखचा नकार कायम होता. आशा पारेख वरच्या श्रेणीची अभिनेत्री म्हणून सिद्ध झाली होती. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते. असे असताना एका नवोदित नायकासोबत काम करण्यास ती तयार नव्हती. अखेर कसं तरी करून नासिर हुसेन यांनी आशा पारेखला तयार केले आणि ती चित्रपटात काम करायला तयार झाली.
नासिरच्या शब्दासाठी चित्रपटात काम करायला तर आशा पारेखने होकार दिला. पण तो काहीसा मनाविरुद्धच होता. चित्रीकरणादरम्यान ती राजेश खन्नाचा पदोपदी अपमान करत होती. तिच्या सततच्या दबावामुळे राजेश खन्नाच्या चुका वाढतच होत्या. त्या काळात त्याच्या चेहऱ्यावर तारुण्यपिटीका आल्या होत्या. त्यावरून देखील आशा पारेख त्याला अपमानास्पद बोलली होती. (Untold story of Rajesh Khanna and Asha Parekh)
सेटवर आशा पारेख त्याला सर्वां समक्ष ‘गुरखा’ म्हणून हाक मारत असे. राजेश खन्नाने सर्व अपमान गिळून मन लावून चित्रपटात काम केलं. चित्रपट पूर्ण झाला. चित्रपटाला माफक यश मिळाले. पण राजेशच्या अभिनयाचा आवाका सर्वांच्याच लक्षात आला. पुढच्या दोन वर्षातच राजेश खन्नाचा भाग्योदय झाला. शक्ती सामंत यांचा ‘आराधना’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. राजेश खन्नाचे नशीबच पालटले. तिथून सलग १६ सुपरहिट त्याने रसिकांना दिले. (हा विक्रम आजही अबाधित आहे.)
=============
हे ही वाचा: आवर्जून पाहावेत असे, थरकाप उडवणारे दक्षिणेतील ‘सायकॉलिजिकल थ्रिलर’ चित्रपट
मीना कुमारी: बॉलिवूडच्या ट्रॅजिडी क्वीनची एक सुखद आठवण
==============
कुणी कुणाला कधी कमी समजू नये. दिवस बदलायला वेळ लागत नाही. आधी त्याला नाकारणारी त्याचा सतत अपमान, पाणउतारा करणारी, त्याला ‘बदसूरत’ म्हणणारी आशा पारेख देखील पुढे राजेश खन्ना सोबत काम करण्यासाठी निर्मात्याकडे खेटे घालू लागली. कटी पतंग, आन मिलो सजना आणि धरम काटा या चित्रपटात राजेश खन्ना आणि आशा पारेख यांनी एकत्रित काम केले. आजही राजेश खन्ना म्हटल्यावर आजा पिया तोहे प्यार दू (बहारो के सपने), प्यार दिवाना होता है, ये शाम मस्तानी(कटी पतंग), अच्छा तो हम चलते है (आन मिलो सजना) ही या दोघांवर चित्रित करण्यात आलेली गाणी लगेच आठवतात.