‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांच्यामधला 23 वर्षांचा अबोला अखेर ‘या’ व्यक्तीमुळे मिटला..
साठच्या दशकाच्या अखेरीस हिंदी सिनेमांमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांनी पदार्पण केलं त्यात एक चेहरा होता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha). त्यांनी पुण्याच्या एफटीआय मधून अभिनयाचे विधिवत शिक्षण घेतलं होतं. परंतु त्यांचा चेहरा त्या काळातील नायकांच्या प्रतिमेला साजेसा चिकना चुपडा नसल्यामुळे त्यांना सिनेमात नायकाच्या भूमिका मिळणं दुरापास्त झालं. या रफ आणि टफ चेहऱ्याच्या अभिनेत्याने चित्रपटातून खलनायकाची भूमिका करायला सुरुवात केली आणि त्यांचा खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
सुरुवातीची सात-आठ वर्ष शत्रुघ्न सिन्हा हिंदी सिनेमाच्या पडद्यावर निगेटिव्ह भूमिका साकारू लागले. या काळातील त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. गुलजार यांनी १९७१ साली विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा या दोन खलनायकाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांना एकत्र आणून ‘मेरे अपने’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि इथून या दोघांच्याही अभिनय यात्रेला एक निराळे वळण मिळाले.
याच काळामध्ये अभिनेत्री रेखा हिचे देखील रुपेरी पडल्यावर आगमन झाले होते. सुरुवातीला ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणूनच ती जास्त लोकप्रिय झाली. १९७६ साली अमिताभ सोबत ‘दो अंजाने’ या चित्रपटात तिने भूमिका केली आणि तिथून तिच्या अभिनयाला वेगळे परिमाण मिळू लागले. १९७८ साली आलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘खूबसूरत’ या चित्रपटातून तिच्यातील अभिनेत्रीला ऋषिकेश मुखर्जी यांनी रसिकांसमोर आणले.
अशाप्रकारे रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोघे समकालीन जरी असले तरी या दोघांचे सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा तर होताच, पण आयडेंटिटी क्रायसिसचा देखील होता. रुपेरी पडद्यावर मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्या दोघांना मोठा संघर्ष करावा लागला. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र कामे केली पण नायक – नायिका म्हणून त्यांचे खूप कमी चित्रपटांमध्ये एकत्र आले.
सुरुवातीला एक तर शत्रुघ्न सिन्हा खलनायक म्हणून चित्रपटात असायचे किंवा सत्तरच्या दशकामध्ये मल्टीस्टारर सिनेमाचे पेव फुटल्यामुळे या सिनेमात रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा एकत्र जरी असले तरी ते नायक नायिका म्हणून क्वचितच दिसले. या दोघांचे गाजलेले सिनेमे सांगायचे झाले तर ‘रामपूर का लक्ष्मण’, ‘जानी दुश्मन’, ‘मुकाबला’, ‘कहानी किस्मत की’,’ दुश्मन दोस्त’, ‘चेहरे पे चेहरा’, ‘दो यार’ ‘कश्मकश’, ‘कहते है मुझको राजा’, ‘दोस्त और दुश्मन’, ‘परमात्मा’… इन शॉर्ट शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा ही प्रणय जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळालीच नाही. पण या दोघांमध्ये खूप चांगले मैत्रीचे संबंध होते. (Untold story of Shatrughan Sinha and Rekha)
ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात राकेश रोशन यांनी या दोघांना घेऊन ‘खून भरी मांग’ या चित्रपटाची निर्मिती केली. हा सिनेमा देखील मल्टीस्टारर सिनेमा होता. या चित्रपटाच्या दरम्यान कोणत्या तरी कारणाने रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले, इतके की दोघांनी चित्रपटात काम करणार नाही अशी जणू प्रतिज्ञा केली होती.
निम्म्याहून अधिक चित्रपट तयार झाला होता. राकेश रोशन यांनी दोघांसोबत स्वतंत्र मीटिंग करून, “तुमच्या भांडणांमध्ये माझे आर्थिक नुकसान करू नका”, अशी विनंती केली. दोघांनी त्या विनंतीला प्रतिसाद देऊन चित्रपटात एकत्र काम करायचे ठरवले. परंतु सेटवर शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा एकमेकाशी अजिबात बोलत नव्हते. त्यांचे एकत्र डायलॉग होते, पण शॉट झाला की दोघे आपापल्या रूममध्ये जात असत. कसातरी राकेश रोशन यांनी चित्रपट पूर्ण केला.
चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिटही झाला. प्रीमियरच्या वेळी देखील दोघे उपस्थित होते, पण दोघांमधील संवाद पूर्णपणे थांबला होता. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी या दोघांमधील अबोला मिटविण्याचे नानाविध प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. दोघांमधील संवाद थांबला तो थांबलाच.तब्बल तेवीस वर्ष हे दोघे एकमेकांसोबत काहीच बोलत नव्हते. अनेक पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये ते एकत्र असायचे, पण एकमेकांना टाळायचे. अगदी एकमेकांना हाय -हॅलो देखील करत नव्हते.
२००९ साली एका पार्टीमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा एकत्र येणार होते. शत्रुघ्न सिन्हाची पत्नी पूनम सिन्हा ही रेखाची चांगली मैत्रीण होती. शत्रुघ्न सिन्हाची पत्नी पूनम सिन्हा यांनी मनोमन ठरवले की, कित्येक वर्ष दोघांमधील थांबलेला संवाद आपण पुन्हा सुरू केला पाहिजे. या दोघांमध्ये जे काही मतभेद आहेत ते दूर केले पाहिजेत, असं ठरवूनच ती देखील त्या पार्टीला गेली. तिने रेखाची स्वतंत्र भेट घेऊन तिच्याशी संवाद साधला. तिच्या मनात असलेले गैरसमज दूर केले. शत्रुघ्न सिन्हाला तर ती घरूनच प्रीपेअर करून गेली होती. अशाप्रकारे या दोघांमध्ये या पार्टीमध्ये पुन्हा समेट घडवून आणला गेला. यानंतर मतभेद मिटले, गैरसमजाचे गढूळ वातावरण दूर झाले. दोघांनी हसत हसत एकमेकांना हस्तांदोलन केले आणि तेवीस वर्षांचा अबोला संपला.
==============
हे ही वाचा: दिवाना: जेव्हा दिव्या भारती घाबरून तब्बल एक तास गाडीत बसून राहिली…
हेमांगी कवी: ‘चार आण्याच्या घटनेला आठ आण्याची प्रतिक्रिया’ अशी आजची परिस्थिती..
==============
रेखाला तर किती बोलू आणि किती नको असे झाले होते. त्या आनंदातच शत्रुघ्न सिन्हाने त्याच पार्टीमध्ये आपल्या मुलाच्या येणाऱ्या चित्रपटाची बातमी रेखाला दिली. रेखाने शत्रुघ्न सिन्हाचे अभिनंदन करून, “या सिनेमात मी त्याच्या मुलाच्या आईची भूमिका करीन”, असे तिथल्या तिथे आश्वासन दिले. (Untold story of Shatrughan Sinha and Rekha)
२०१० साली शत्रुघ्न सिन्हाचा मुलगा लव सिन्हा याने हिंदी सिनेमाच्या पडद्यावर पदार्पण केले. या सिनेमात त्याची आई झाली होती रेखा. हा सिनेमा होता ‘सदिया’. चित्रपट आणि लव सिन्हा दोघे फ्लॉप झाले, पण तेवीस वर्षाचा अबोला या निमित्ताने मिटला.