जेव्हा स्वाभिमानी फारुख शेख आणि शबानाने दहा रुपये कॉलेजला ‘डोनेट’ केले
पंचवीस तीस वर्षांपूर्वी देशातील तमाम अभिजन नाट्य रसिकांमध्ये ‘तुम्हारी अमृता’ या द्विपात्री नाट्यप्रयोगाने मोठे स्थान मिळवले होते. फिरोज अब्बास खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रयोगामध्ये शबाना आजमी आणि फारुख शेख (Farooq Shaikh & Shabana) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हे दोघे कलाकार नाट्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले होते. मूलतः हे दोघेही चित्रपट कलावंत असताना देखील रंगभूमीची त्यांची आवड त्यांनी जपली होती.
रंगमंचावरील त्यांचं प्रेम हे खूप वर्षापासूनच होते. १९६८ ते १९७० या काळामध्ये शबाना आजमी आणि फारुख शेख हे दोघेही मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजचे विद्यार्थी होते. तिथेच त्यांनी त्यांच्या नाट्य जीवनाची सुरुवात केली होती. हे दोघेही ‘इप्टा’ चे विद्यार्थी! दोघांवरील संस्कार हे साम्यवादी विचारांचे झाले होते. या दोघांना हिंदी आणि उर्दू साहित्याची प्रचंड आवड होती.
त्यावेळी सेंट झेवियर कॉलेजमध्ये पूर्णतः इंग्रजाळलेले वातावरण होते. इंग्रजी साहित्य, इंग्रजी नाटक, इंग्रजी सिनेमे यांचे वेगवेगळे क्लब तिथे होते. या क्लबला कॉलेजच्या मॅनेजमेंटकडून अर्थसहाय्य देखील मिळत होते. कॉलेजमधील विद्यार्थी याच क्लबमधून आपली कला सादर करत होते. परंतु या सर्व प्रकारात हिंदी भाषिक कलाकारांची गळचेपी होत होती. फारुख शेखने ही कोंडी फोडली.
फारूख शेख हा शबाना आझमीला दोन वर्ष सीनियर होता. परंतु दोघांची आवड सारखी होती. त्यामुळे त्या दोघांनी हिंदीतून नाट्यकृती सादर करायला सुरुवात केली. हळूहळू यांच्या ग्रुपमध्ये आणखी काही मुले सामील होऊ लागली. मग वेगवेगळ्या स्पर्धांमधून हिंदी आणि उर्दू नाटके सादर करू लागले. त्याचप्रमाणे हिंदी कविता, मुशायरा अशा कार्यक्रमाच्या आयोजन देखील ते करू लागले. (Lesser known story of Farooq Shaikh & Shabana)
फारुख शेख आणि शबाना आजमी यांनीच सेंट झेवियर कॉलेजमध्ये हिंदी नाट्यमंचची स्थापना केली आणि या मंचातर्फे विविध नाट्य स्पर्धांना आपली नाटके ती सादर करू लागली. कॉलेजच्या वतीने जरी ही नाटकं होत असली तरी कॉलेज कडून एक पैसा देखील त्यांना अर्थसहाय्य होत नव्हते.
एका वर्षी त्यांच्या नाट्यकृतीला एका स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. मोठ्या अभिमानाने त्यांनी ते पारितोषिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दाखवले आणि त्यांना विनंती केली की, “आपण इतकी वर्ष इंग्रजी भाषेतील क्लब्जना अर्थसहाय्य करीत आहात. पण आपल्या देशाची जी राष्ट्रभाषा आहे तिच्या सहाय्यासाठी आपण काहीतरी मदत करायला पाहिजे.”
सेंट झेवियरच्या व्यवस्थापनाने यावर मीटिंग घेतली आणि दर महिन्याला दहा रुपये द्यायला मंजुरी दिली. फारुख शेख आणि शबाना आजमी यांना एवढी तुटपुंजी रक्कम म्हणजे हिंदी भाषेचा अपमान वाटला. त्यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून आम्हाला ‘अशी कुठलीही मदत आपल्याकडून नको’ असे स्वाभिमानाने सांगितले आणि दिलेले दहा रुपये कॉलेजला पुन्हा नुसते परत न करता ‘डोनेट’ केले. त्यांच्या या स्वाभिमानी कृतीने लगेच फरक पडला नाही, पण कालांतराने या दोघांनी स्थापन केलेल्या हिंदी नाट्यमंचला सेंट झेवियरमध्ये चांगले दिवस आले आणि आता तर या महाविद्यालयात हिंदी नाट्यकृतीला मोठा जनाधार देखील लाभला आहे. (Lesser known story of Farooq Shaikh & Shabana)
================
हे ही वाचा: बॉलिवूडमध्ये अपयशी झालेल्या ‘या’ अभिनेत्री सध्या काय करतात?
जेव्हा अभिनेत्री रेखाचा ‘लीपलॉक किसिंग शॉट’ लाईफ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकला होता…
================
शबाना आणि फारुख रंगमंचावर अनेक वर्ष एकत्र होते. या दोघांची सुरुवात रंगमंचावरच झाली होती. पण सिनेमात मात्र ही जोडी काही जमली नाही. शतरंज के खिलाडी, लोरी, एक पल,अंजुमन या सिनेमात हे दोघे एकत्र होते, पण यातल्या एकाही सिनेमाला व्यावसायिक यश नाही मिळाले.