‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पाकिस्तान मधील पूजा भट्टचा चाहता भारतातील जेलमध्ये सडतोय!
काही रसिकांना कलाकारांविषयी पराकोटीचे प्रेम आणि आकर्षण असतं. या रसिकांना आपल्या आवडत्या कलावंतांची एक झलक दिसावी यासाठी ते जिवाचे रान करतात. यातून अनेक किस्से घडतात काही गमतीदार असतात तर काही किस्से गंभीर वळण देखील घेतात. हेमामालिनीचा एक चाहता पाकिस्तान हून तिला खास भेटण्यासाठी आला होता आणि सिक्युरिटीने त्याला वारंवार हटकल्यानंतर तो एका रात्री तिच्या बंगल्यामध्ये घुसला होता आणि यातूनच हेमामालिनीच्या वडिलांना हार्ट अटॅक येऊन तिथे जागच्या जागी त्यांचा मृत्यू झाला होता.हा किस्सा मी आपल्याला या पूर्वी सांगितला आहे. सुरैया या गायिका अभिनेत्रीचा एक चाहता असाच अनेक वर्ष नरिमन पॉईंट तिच्या घरासमोर येऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचे केवळ एकदा दर्शन व्हावे म्हणून वर्षानुवर्ष तिथे बसत असे. तो कोणालाही कसलाही त्रास देत नव्हता. त्यामुळे पोलीस कंप्लेंट वगैरे हा असला प्रकार झाला नाही. जवळपास ३०-३५ वर्ष तो रोज सुरैय्याच्या घरासमोर येऊन बसत असे.
असाच एक फॅन अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) हिचा होता. पूजा भट्ट नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटातून रसिकांच्या समोर आली होती. तिच्या मादक अदेने भारतातील आणि भारताबाहेरचे रसिक दिवाने झाले होते. पाकिस्तानमध्ये तिच्या एका रसिकाने तिचा ‘दिल है कि मानता नही’ आणि ‘सडक’ हे दोन चित्रपट पाहिले आणि तो तिचा प्रचंड दिवाना झाला. अक्षरशः पागल झाला. काहीही करून तिला भेटायचेच असा चंग त्याने मनाशी बांधला. त्यावेळी त्याचे वय २० वर्ष होते. ‘जवानी का जोश’ काही औरच असतो. तो चक्क मिलिटरीची नजर चुकवून वाघा बॉर्डरद्वारे भारतात घुसला. तिकडे त्याला पोलिसांनी अटक केली.
त्याच्याकडे कुठलेही ऑफिशियल डॉक्युमेंट नव्हते. त्याचे नाव होते अब्दुल शरीफ. बेकायदा बॉर्डर क्रॉस करणे या कलमाखाली त्याला अटक केली गेली. भारत पाकिस्तानातील संबंध पाहता सुरुवातीला टेरर अँगल चेक केला गेला. त्याची कसून तपासणी केली गेली. वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हाती काहीच लागले नाही. त्याने वारंवार सांगितले “मला या देशातून काहीही नको . मला फक्त पूजा भट्टला (Pooja Bhatt) भेटायचे आहे!” परंतु पोलिसांनी त्याचे काही ऐकले नाही आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली. जेल मध्ये असताना देखील तो कायम पूजा भट्टचा जप करत असे पूजा भट्टशिवाय त्याला दुसरे काहीही दिसत नव्हते. नंतर नंतर त्याची मनस्थिती बिघडली आणि तो फार वेडा झाला.
=========
हे देखील वाचा : आशा पारेख का आग्रह करत होत्या स्वतःवरच चित्रित झालेलं गाणं डिलीट करण्याचा?
=========
त्यामुळे दोन वर्षानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली पण त्याला पाठवायचे कुठे? कारण तो कोणतीही माहिती देत नव्हता. त्याला फक्त दोन नावे माहीत होती एक पूजा भट्ट (Pooja Bhatt) आणि दुसरे त्याच्या वडीलांचे नाव गुलाम मोहम्मद! अब्दुल शरीफ आता फार वेडा झाला होता तो कधी सांगायचं मी पाकिस्तानातून आलो आहे तर कधी सांगायचा मी इराण म्हणून आलो आहे. या नावाचे कोणी पाकिस्तानात किंवा इराणमध्ये आहे का याचा शोध तिथल्या वकीलाती मधून घेण्यात आला अनेक गुलाम मोहम्मद त्यांना सापडले पण कोणाचाही मुलगा अब्दुल शरीफ नव्हता. आता तर तो पूजा भट्टला (Pooja Bhatt) ओळखत नव्हता. ह्युमन राइट्स कमिशनने त्याचा सांभाळ भारतीय देशाने करावा असे सांगितले. मग त्याची रवानगी या तुरुंगातून त्या तुरुंगात होत राहिली. आज देखील हा अब्दुल शरीफ भारतातील कुठल्यातरी जेलमध्ये असेल. त्याचे वर्तन एकदम शांत असते तो कुणालाही त्रास देत नाही. फक्त मुखाने कायम पूजा भट्टचे नाव घेतो. जेलमध्ये इतर कैद्यांनी त्याच्या हातावर पूजा भट्ट (Pooja Bhatt) या नावाचा टॅटू देखील बनवला. आज तो पूर्णपणे स्मृती हरवलेला एक व्यक्ती आहे. एका अभिनेत्रीच्या जुनूनने पाकिस्तानच्या अब्दुल शरीफ यांच्या संपूर्ण आयुष्य घालवले. गालिब इश्क ने निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी थे काम के!
धनंजय कुलकर्णी